वसई-विरार महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर वसई-विरार महापालिकेत आलेले अनेक अधिकारी अद्याप पालिकेत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना केवळ तीन वर्षांची मुदत असताना आठ ते दहा वष्रे ते पालिकेतच काम करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुदत उलटूनही अनेक वर्षे त्याच पदावर काम केल्याने गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या बदलीसाठी संबंधित विभागाकडे अर्ज करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २००१च्या कलम ४५(अ) व ४५(ब) नुसार राज्य सरकार अधिकाऱ्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवत असते. या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना त्याबाबतची अधिसूचना काढून ती राज्याच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करावी लागते. या अधिकाऱ्यांची मुदत तीन वर्षांची असते.
वसई-विरार महापालिकेत असे अनेक अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत. तीन वर्षांची मुदत उलटून गेली तरी अद्याप हे अधिकारी याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना पुन्हा मूळ विभागात परत बोलावून घेण्यात यावे, अशी मागणी वसई भाजपचे अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी केली आहे.

हे अधिकारी अद्याप पालिकेतच
* एम. बी. पाटील
(शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिक रण)-
नियुक्ती- १७ जुलै २००८ सध्या- आस्थापना
* खंडेराव गुरखेल (आरेखक, सिडको)
नियुक्ती- १३ ऑगस्ट २००८ सध्या- आस्थापना विभाग
* बी. एम. माचेवाड (अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)
नियुक्ती- ३१ मे २०१०
सध्या- पाणीपुरवठा विभाग
* संजय जगताप (नगर अभियंता, नगरपरिषद अभियांत्रिकी संवर्ग)
नियुक्ती- २ मार्च २००९
सध्या- आस्थापना
* वाय. एस. रेड्डी (असोसी प्लॅनर, सिडको)
नियुक्ती- १३ ऑगस्ट २०१० सध्या- उपसंचालक, नगररचना

या सर्व अधिकाऱ्यांची त्यांच्या मूळ पदावर बदली करण्यात यावी. या अधिकाऱ्यांना जर मुदतवाढ हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकाराने ती मिळू शकते. परंतु कुणालाही तसे विशेषाधिकार मिळालेले नाहीत. सात ते दहा वर्षे या अधिकाऱ्यांना या पदावर झाल्याने गैरवापर होत आहे.
– मारुती घुटुकडे, भाजप शहराध्यक्ष, वसई.

या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्याचे अधिकार राज्य शासनाकडेच असतात.
– सतीश लोखंडे, पालिका आयुक्त.

मी प्रतिनियुक्तीवर आलेलो आहे, परंतु मला ऑगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर शासन ज्या ठिकाणी बदली करेल, तेथे जाण्यास तयार आहे.
– बी. एम. माचेवाड, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी.