भाजांची आवक वाढल्याने इतरत्र भाज्यांच्या दरात चढउतार येत असले, तरी डोंबिवलीतील भाजीचा एकदा वरती गेलेला भाव सहसा खाली येताना दिसत नाही. डोंबिवली शहरापासून घाऊक मालाची कल्याणमधील बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असूनही येथील भाज्या स्वस्त का नाहीत?, भाज्यांच्या भावात एवढी तफावत का? असा प्रश्न पडत असला तरी या मुद्दय़ावर भाज्यांच्या किमतीत घासाघीस करण्याचे धारिष्टय़ आणि संयम कोणाकडेही नाही. ‘आम्ही दर्जेदार माल विकतो. त्याचे दर जास्त असणारच’ हा विक्रेत्यांचा युक्तिवाद आहे. याशिवाय मालाची वाहतूक, हमाली हा खर्चही दर आकारताना मोजावा लागतो, असे ते म्हणतात. कारणे काहीही असोत, डोंबिवलीत भाज्यांनाही भाव चढतो, हे मात्र नक्की!
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारी कृषी मालाची घाऊक बाजारपेठ कल्याण डोंबिवली शहरास लागूनच आहे. तरीही डोंबिवलीत भाज्या, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव ठाणे व इतर शहरांमधील बाजारपेठांपेक्षा अवाचेसव्वा आहेत. या भाजी भावाच्या तफावतीमध्ये दोन-तीन रुपयांचा फरक असेल तर कोणीही समजून घेईल, परंतु पाच ते दहा रुपयांचा फरक जाणवतो. परंतु ग्राहक मात्र असे का विचारण्याची तसदी घेत नाही. मालाचा उच्च दर्जा मिळतो मग त्यासाठी हवे ते पैसे मोजायला येथील ग्राहक तयार आहेत. उच्च राहणीमान आणि जास्त महाग वस्तू म्हणजे तिचा दर्जा चांगला, असा एक समजही येथील नागरिकांमध्ये आढळताना दिसतो.
याविषयी भाजी विक्रेत्यांना विचारले असता ते म्हणाले, येथील मार्केटमध्ये केवळ कल्याणमधून नाही तर वाशी, ओतूर, आळेफाटा, जुन्नर, मंचर आदी मार्केटमधील माल आणला जातो. हा माल आणण्याचा वाहतूक खर्च, पेट्रोल, डिझेलचे दर, हमाली, मालाचा कर, गोण्यांचे पैसे हा एक खर्चाचा भाग आहे. परंतु यामागेही अनेक खर्च आहे. मार्केटमध्ये आत जायचे म्हणजे गेटपास, बाहेर पडण्याचा पास हे पास मिळविण्यासाठी सत्तर ते ऐंशी रुपये खर्च होतात. त्यानंतर टोलनाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचा काटई येथील जकात नाका भाजीविक्रेत्यांसाठी २०११ साली बंद करण्यात आला. यामुळे जकातीची रीतसर पावती फाडण्यासाठी विक्रेत्यांना कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जावे लागत आहे. तेथे सर्व माल उतरवून त्याची पावती फाडावी लागत आहे. त्यानंतर तो भाजीपाला पुन्हा गाडीत भरून डोंबिवलीत आणावा लागत आहे. यामुळे तीन ते चार किलोमीटरचा प्रवास वाढण्याबरोबरच भाजी विक्रेत्यांना उगाचंच दोन वेळची हमाली द्यावी लागत आहे. ५० किलोमागे २० रुपये हमाली खर्च आहे. तर दुसरी बाजू अशीही आहे की काटई जकात नाका बंद झाला असला तरी बाजार समितीचा तपासनाका मात्र सुरू आहे. येथील अधिकाऱ्यांकडेच जकातीची पावती फाडून काही विक्रेते कल्याणला न जाता डोंबिवलीत प्रवेश करतात.
या सर्व खर्चाचाही ग्राहकांनी विचार करावा. यासोबतच ग्राहकांना ताजीतवाणी आणि स्वच्छ भाजी लागते. यासाठी मार्केटमध्ये पहाटे तीन चारच्या दरम्यान जावे लागते. यावेळी भाजीचा लिलाव हा चढय़ा भावाने होतो. साधारण नऊ नंतर भाजीच्या भावात घसरण होते. परंतु तेव्हा उरलेला खराब माल हा बाजारात असतो, आणलेला माल साफ केला जातो, त्यातील पालापाचोळा व खराब माल बाजूला काढला की मार्केटमधून आणलेला माल तीन ते चार किलोने हमखास कमी होतो. कधीकधी जास्तपण नुकसान होत असल्याचे सांगतात.