मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचण्याची समस्या कायम

थोडासा पाऊस पडला की मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी साचते. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसातही हा महामार्ग पाण्यात गेला. महामार्गावरील मालजीपाडा आणि ससून नवघर येथे तर नेहमीच पाणी साचते आणि वाहनांना पाण्यातून जावे लागते. त्यामुळे हा महामार्ग आहे की जलमार्ग असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. बेकायदेशीर मातभरावामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही समस्या निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले

महामार्गावर पाणी साचून वाहतूक कोंडी होत असल्याच्या प्रश्नावर वाहतूक पोलिसांनीच तोडगा काढला आहे. सुरुवातीला पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता पोलिसांनी आयआरबीच्या माध्यमातून भूमिगत जलवाहिनी टाकली आहे. सलग तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता महामार्गावर पाणी साचणार नाही, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा गुजरात आणि उत्तरेच्या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. मात्र दोन वर्षांपासून या महामार्गावर पाणी साचत आहे. जुलै महिन्यातील मुसळधार पावसात तसेच मंगळवारच्या पावसातही या महामार्गावर पाणी साचले होते या महामार्गाला लागून असलेल्या ससुपाडा या ठिकाणी भूमाफियांनी पालिका प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बेकायदा मातीभराव केल्याने महामार्गावर पाणी साचून पूरजन्य स्थिती निर्माण होऊ  लागली आहे. महामार्गावर पाणी साचत असल्याने या पाण्यातून वाहने चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पाण्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

ससुपाडा येथील कृष्णा ढाब्यासमोर बेकायदा माती भराव करण्यात आला आहे. नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने पाणी महामार्गावर साचत आहे. जुलै महिन्यात वाहतूक पोलिसांनी पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला फारसे यश आले नव्हते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला चर खोदून त्यात भूमिगत जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाणी साचणार नाही, असे वाटले होते, परंतु पुन्हा पाणी साचल्याने वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागला होता.

समस्या का?

  • महामार्गावरील ससुपाडा येथे बेकायदा मातीभराव करण्यात आला आहे.
  • त्यामुळे महामार्गाच्या बाजूच्या जमिनीची पातळी महामार्गापेक्षा उंच झाली आहे.
  • पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले

आयआरबी टोल कंपनी या महामार्गावरून लाखो रुपयांचा दररोजचा टोल गोळा करत असते. त्यांनी महामार्गावर पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

सुनील आचोळकर, स्थानिक नगरसेवक