ठाणे शहराला दररोज ४६० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीपुरवठा केला जातो, असा महापालिकेचा नेहमीचा दावा असतो. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. (सध्याची पाणीकपात यात गृहीत धरलेली नाही) ठाण्याची लोकसंख्या २०११ साली १८,८६,९४१ लक्ष इतकी होती. त्यापैकी निम्मे रहिवासी चाळ व झोपडपट्टीमध्ये राहतात आणि यापैकी काही भागात घरोघरी नळ नाहीत. त्यामुळे सार्वजनिक नळावरून त्यांना पाणी भरावे लागते. याचा अर्थ शहरात सुमारे ७० टक्के रहिवाशांकडे नळाने पाणीपुरवठा होतो. ठाणे महापालिकेचा दावा आहे, की ते प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५० लिटर पाणीपुरवठा करतात. परंतु आपल्या सगळ्यांना घरी दररोज किती पाणी येते ते ठाऊक आहे. थोडक्यात काय तर पाणी चोरी आणि गळतीचे प्रमाण मोठे आहे. तसेच समतोल पाणी वितरणाचा अभाव आहे.
ठाणे शहराच्या वाढत्या नागरीकरणामुळे २०१५ पर्यंत लोकसंख्या अंदाजे २० टक्के वाढलेली आहे. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत ठाण्याला कर्जपुरवठा करताना शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत समतोल राखण्याची अट होती. त्यासाठी महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून ‘स्काडा’ यंत्रणा बसवली आहे. परंतु ती पहिल्या दिवसापासून धक्के खात आता मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. यामध्ये एकाच नियंत्रण कक्षामधून ठाण्यातील सर्व जलकुंभात किती पाणी आहे हे कळणार होते. त्यानुसार त्या त्या विभागातील लोकसंख्येच्या आधारे कोणत्या टाकीत किती पाणी पाठवावे याचे नियोजन केले जाणार होते. दुर्दैव असे की योजनेनुसार झालेच नाही. जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपये जमा झाले, परंतु योजना प्रभावीपणे सुरूच झाली नाही.
सध्या ठाण्यामध्ये ३० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून दररोज होणारा २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा आता १६३ दशलक्ष लिटर इतका करण्यात आला आहे. तसेच एक दिवस संपूर्ण पाणीकपात लागू केली आहे. महापालिकेला स्टेम कंपनीसारख्या निमसरकारी कंपनीकडून पाणीपुरवठा होतो. या कंपनीकडून दररोज ११३ दशलक्ष लिटर होणारा पाणीपुरवठा आता ९२ दशलक्ष लिटर इतका करण्यात आला आहे आणि एक दिवस संपूर्ण पाणीकपात लागू केली आहे. तसेच कळवा, दिवा, मुंब्रा भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा होतो. या महामंडळाकडून दररोज होणारा ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा आता ७७ दशलक्ष लिटर इतका होत आहे. त्यासाठी दोन दिवस संपूर्ण पाणीकपात लागू केली आहे. यात मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठय़ातही कपात झाली असून, ६० दशलक्ष लिटरऐवजी आता ५४ दशलक्ष लिटर इतके पाणी मिळत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा शक्य तितका पुनर्वापर केला पाहिजे. तसेच शहरातील विहिरी, तलाव या नैसर्गिक स्रौतांतील पाण्याचाही योग्य वापर केला पाहिजे. ठाणे महापलिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीच्या आधारे शहरात ८१३ कूपनलिका (बोअरिंग) आणि ५५५ विहिरी आहेत. कदाचित प्रत्यक्षात ही संख्या अधिक असू शकते, परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर घरगुती कामासाठी होतो की नाही याची प्रत्येक ठिकाणी जाऊन माहिती घेऊन त्याचा वापर वाढविणे गरजेचे आहे. यामध्ये काही गुंतवणूक हवी असल्यास महापालिकेने ती करावी. कारण, पाणीकपातीमुळे जलशुद्धीकरणचे ३० टक्के पैसे वाचणार आहेत अथवा नागरिकांना बिलामध्ये ३० टक्के सूट देऊन या स्रोतांची साफसफाई करण्यास उद्युक्त करावे.
शहरात दररोज ५०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त तयार होणाऱ्या मलजलावर प्रक्रिया करून त्याचाही पुनर्वापर केला पाहिजे. शहरात असलेले बस आगार व रेल्वे आगार हे प्रक्रिया केलेले पाणी गाडय़ा धुण्यासाठी तसेच शहरातील बागकामासाठी, बांधकामासाठी वापरू शकतात. शहरातील सांडपाणी अजूनही पूर्णपणे बंदिस्त वाहिन्यांमधून प्रकिया केंद्रांवर नेले जात नाही. शहरातील पाणीपुरवठय़ाचे व वितरण यंत्रणेचे ऑडिट (सर्वेक्षण) झाले नसून ते आता होणे गरजेचे आहे. जेणेकरून वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करता येतील तसेच अर्निबधपणे पाणी वापरावर अंकुश ठेवण्यासाठी मीटरनुसार बिल ही संकल्पना राबवावी लागेल.