२७ गावच्या ग्रामस्थांचा संतप्त सवाल
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमधील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी महापालिकेने सुमारे पाच कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून या परिसरात प्रत्येकी दोन कूपनलिका खोदण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र त्याचा फायदा ग्रामस्थांना होण्यापेक्षा या भागातील ठरावीक राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. या कूपनलिका या भागातील काही राजकीय पुढाऱ्यांच्या अंगणात खोदण्यात आल्याची चर्चा आता रंगली असून यामुळे महापालिकेचा कृती आराखडा वादात सापडला आहे.
डोंबिवली शहरास लागूनच असलेल्या २७ गावांमध्ये पाण्याची तीव्र अशी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिका हद्दीत या गावांचा समावेश झाल्याने टंचाईसदृश परिस्थितीवर उतारा शोधला जाईल, असे ग्रामस्थांना वाटले होते. या गावांमधील टंचाईवर मात करता यावी यासाठी महापालिकेने टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. त्यासाठी काही कोटी रुपयांची रक्कम आरक्षित ठेवण्यात आली आहे. त्यानुसार येथील प्रत्येक गावामधील विहिरींची सफाई, पंपदुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाच हजार लिटरच्या दोन टाक्याही यापैकी काही गावांमध्ये बसविण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येकी दोन कूपनलिका या गावांमध्ये खोदण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असेल त्या गावात तीन ते चार कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. गावात कूपनलिका खोदल्यानंतर टंचाईचा त्रास काही अंशी कमी होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, गावकीचा विचार न करता नातेवाईकांचे भले करण्याची अहमहमिका यानिमित्ताने काही राजकीय नेत्यांमध्ये लागली असल्याचे चित्र आहे.
२७ गावांपैकी काही गावांमधील विहिरी आटल्या आहेत. गावातील चारपैकी तीन कूपनलिका बंद पडल्या आहेत. असे असताना लोकप्रतिनिधींचे नातेवाईक इतर ग्रामस्थांना नव्याने खोदण्यात आलेल्या कूपनलिकांचे पाणी वापरू देत नाहीत, अशा तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. एक कूपनलिका खोदण्यासाठी साधारण ६५ ते ७० हजार रुपये खर्च येतो; परंतु जमिनीखालील पाण्याची पातळीही खालावली असल्याने कूपनलिका खोदण्यातही काही अर्थ नसल्याने गावकरी स्वतंत्र कूपनलिका खोदत नाहीत. गावकीच्या जागेत सार्वजनिक कूपनलिका खोदण्यात यावी, जेणेकरून सर्वाना समान पाणी वापरता येईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.