योग वैभव, सूर्यानगर, बदलापूर (पूर्व)

मध्यमवर्गीयांचे शहर ही बदलापूरची ओळख गेल्या दशकभरातील असली तरी येथे  १९९४ पासून येथे गृहसंकुलांची संस्कृती रुजू लागली. याच काळात बदलापूर पूर्वेकडे सूर्यानगर सोसायटीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. पहिल्यांदा योगवैभव सोसायटीच्या नावे सातबारा नोंद करण्यात आला आणि सूर्यानगरच्या फेज- एकला सुरुवात झाली. रविकुमार या बांधकाम व्यावसायिकांनी या योगवैभव सोसायटीची निर्मिती सुरू केली. मात्र त्याच काळात बदलापुरातून एमआयडीसी हद्दीतून कर्जत महामार्ग प्रस्तावित झाला. नेमका सूर्यानगरच्या मध्यातून हा मार्ग गेला. सोसायटीनेही आपल्या हद्दीतील ३६ गुंठे जमीन या मार्गासाठी दिली. त्यामुळे योग वैभव सोसायटी दोन भागांत विभागली गेली. त्यामुळे एकूण १३ इमारतींपैकी एका बाजूला ७ तर दुसऱ्या बाजूला ६ अशा फेज १ आणि २ मध्ये योगवैभव सोसायटी आहे.

बांधकाम व्यावसायिकाच्या नावातील सूर्याचा उल्लेख या सोसायटीच्या सर्वच नावांमध्ये पाहायला मिळतो. तरुणा, अरुणा, किरण, कांती, आदित्य, भास्कर, प्रभाकर, दिवाकर अशी या इमारतींची नावे ऐकता क्षणीच लक्षात राहतात. सोसायटीतील दोन प्रशस्त उद्याने, एक मंदिर आणि ऐसपैस जागा सोसायटीला श्वास घेण्याची संधी देते.

गेल्या काही वर्षांत २९९ सदनिकांच्या या सोसायटीने अनेक आव्हाने पाहिली आहेत. मात्र सोसायटीच्या सदस्यांमध्ये एकता असल्याने त्यांनी संकटांना यशस्वीपणे तोंड दिले. या सोसायटीत अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी राहतात. देश तसेच राज्याच्या विविध भागातील कुटुंबे येथे राहत असल्याने एक छोटय़ा भारताचे स्वरूप सोसायटीला प्राप्त झाले आहे. सोसायटीतील सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी समिती प्रयत्नशील असते. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. सोसायटीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच एखादी कला जपता यावी यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो, असे सोसायटीचे अध्यक्ष उत्तम कांबळे सांगतात. याचबरोबर सोसायटीतील विविध वयोगटाचे तरुण, ज्येष्ठ, महिला एकत्रित येऊन गणेशोत्सव, दहिकाला, होळी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती असे सणही साजरे करतात. राष्ट्रीय सणांप्रमाणेच सर्वच सोसायटीचे सदस्य यात सहभागी होत असतात. त्यामुळे सोसायटीची एकता वाढत असल्याचे सोसायटीचे उपाध्यक्ष देवजी रोकडे सांगतात.

सूर्यानगरच्या योगवैभव सोसायटीतील प्रत्येक सदस्य हा सोसायटीचा एक पहारेदार म्हणून भूमिका निभावत असतो. सोसायटीत अद्याप सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. इथे असलेला कुत्र्यांचा एक कळप येथील सुरक्षेची जबाबदारी स्वीकारतो. सोसायटीचा प्रत्येक सदस्य या कुत्र्यांच्या कळपाची काजळी घेत असतो. दोन भागांत सोसायटी विभागली गेली असली तरी समिती प्रभावीपणे सर्वच इमारतींशी चांगला संपर्क ठेवून आहे. १४ जणांच्या समितीत दोन महिलांना स्थान असून तक्रार निवारण समिती आणि महिला समितीही स्वतंत्रपणे सोसायटीत कार्यरत आहे. तक्रार निवारण समितीचे कामही प्रभावीपणे सुरू असल्याचे येथील संचालक भगवान कारोटे सांगतात. सोसायटीत कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी सोसायटीचे सदस्य प्रयत्नशील असतात.

पाण्यासाठी दोन्ही फेजमध्ये लाख लिटर पाण्याचा साठा होईल इतक्या मोठय़ा पाण्याच्या टाक्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही पाणीटंचाईची झळ सोसायटीला बसत नाही. २००५च्या महापुरात बदलापूर शहरात आलेल्या पुरामुळे निम्मे बदलापूर पाण्याखाली होते. त्यावेळी सोसायटीने पाण्याच्या माध्यमातून मोठी मदत शहराला केली होती. येत्या काळात सोसायटीला आयएसओ मानांकन मिळविण्यासाठीचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील सचिव अरविंद लासे सांगतात.

अतिक्रमणाचा त्रास

सोसायटीचा डोलारा मोठा असला तरी शहरातील अतिक्रमणाची लागण या सोसायटीलाही मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जत महामार्गाला लागून असलेल्या दुकानांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे अरविंद लासे सांगतात. सोसायटीच्या आवारात शेख चिल्ली नावाच्या हॉटेलनेही असाच अतिक्रमणाचा प्रकार केला आहे. त्यासह हॉटेलच्या किचनचाही मोठा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. याची तक्रार पालिका प्रशासनाला करण्यात आली आहे, मात्र त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असल्याचेही लासे नमूद करतात.