वसईतील पुरातन कुंड यंदा आटल्याने धोका; स्वयंसेवी संस्थेच्या तरुणांचे प्रयत्न
वसई गावातील पुरातन पाण्याचे कुंड या उन्हाळ्यात प्रथमच आटल्याने त्यातील शेकडो मासे आणि दुर्मीळ प्रजातीची कासवे मृत्यूच्या दाढेत सापडली होती. ‘वाइल्ड लाइफ इमेजेस अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन’ संस्थेच्या तीन तरुणांनी ही माहिती मिळताच या कुंडाच्या दिशेने धाव घेतली आणि कुंडात उतरून मासे आणि कासवांना सुरक्षित बाहेर काढले आणि त्यांना जीवदान दिले.
यंदा कडक उन्हाळा असून वसईतील सरासरी तापमान ३५ अंशावर गेले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच वसईतील अनेक विहिरी, तलाव, बावखले आटले असून पाण्याची पातळी खालावली आहे. वसई गाव बसडेपोजवळील गणपती मंदिरात एक पुरातन काळातील पाण्याचे कुंड आहे. या कुंडामध्ये शेकडो कासव आणि हजारो मासे आहेत. मात्र यंदा या कुंडातील पाणी प्रथमच आटले आहे. त्यातील गाळ उन्हामुळे कडक झाला असून त्यात अनेक कासव आणि मासे अडकलेले आहेत. ही माहिती ही संस्था मदतीसाठी धावली आणि त्यांनी या प्राण्यांना वाचविण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या कुंडातील कासवांना बाहेर काढून त्यांना डहाणू येथील राज्य वन विभागाच्या कासव संवर्धन केंद्रात हलविले आहे, तर माशांना वसई गावातील वेगवेगळ्या विहिरींमध्ये सोडण्यात आले आहे.

या कुंडातील पाणी आटल्याने गाळ उन्हामुळे कडक झाला. खाण्या-पिण्यासाठी संचार करता येत नसल्याने अनेक कासव व माशांना जीव गमावण्याची वेळ आली होती. त्यामुळे हा उपक्रम हाती घेऊन त्यांना जीवदान दिले.
– मयूर कामत, वाइल्ड लाइफ इमेजेस अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन

तीन टप्प्यांत मोहीम
’ ६ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात एकूण ८० कासव आणि १०००च्या आसपास लहान-मोठे मासे बाहेर काढले.
’ १६ एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात ४२ कासव आणि ५०० ते ६००च्या आसपास मासे बाहेर काढले.
’ २१ एप्रिल रोजी झालेल्या तिसऱ्या टप्प्यात ४० कासव आणि ५००० मासे बाहेर काढण्यात यश मिळवले.
या प्रकारातील कासव
’ स्पॉटेड इंडियन टर्टल,
’ इंडियन फ्लॅपशेल टर्टल,
’ टेंट टेरापिन,
’ बॉम्बे टेरापिन्स,
’ रेड इयर्ड स्लाइडर.