सिंहगड-तोरणा-राजगड-रायगड या आमच्या तंगडतोड ट्रेकमध्ये तिसऱ्या दिवशी हरपुडवाडीवरुन प्रस्थान ठेवले. काही वेळातच लागलेल्या कच्च्या सडकेवर एक मंदिर आहे. तिथून सरळ पायवाटेने खाली उतरले की मोहरी गाव लागते. आता लिंगाणा आणि रायगड दर्शन देत होते. लिंगाण्याच्या आधीचा जो डोंगर दिसतो त्याच्या पलीकडच्या बाजूला जायचे नसून जी बाजू आपल्याला दिसते त्याच बाजूने सपाटीवरून त्याला वळसा घातला की पोहोचतो बोराटय़ाच्या नाळेत. सरळ गेलो तर दहा मिनिटात रायलिंग पठार. काल हरपुड वाडीच्या पुढे राहिल्याचा फायदा झाला. चटकन मोहरीत पोहोचलो. पुढे बोराटय़ाची नाळ आली.  चिंचोळय़ा नाळेपाशी सॅक्स ठेवल्या आणि रायलिंग पठाराकडे निघालो. लिंगाणा पहावा तर रायलिंगवरूनच.
लिंगाण्याच्या मागून रायगड बोलावत होता. मुक्कामाला पोहोचतोच असे सांगून रायलिंगहून माघारी फिरलो आणि नाळेत परत आलो. नाळीत दगडांचा सागर आहे. आपल्याला सोपे वाटेल तिथून उतरत राहायचे. एका ‘रॉक पॅच’ खाली मधमाशा भुणभुणायला लागल्या. पूर्वी भैरवगडला माश्या चावल्याचा प्रसंग क्षणात डोळ्यासमोर उभा राहिला. यामुळे इथून लवकरात लवकर सटकणे हा एकच मार्ग मला दिसत होता. यावेळी माशीला झटकण्याची किंवा मारण्याची चूक केली नाही. काही वेळाने त्यांच्या भागातून पुढे गेल्यावर मधमाश्या गायब झाल्या. या ‘रॉकपॅच’च्या खाली लगेचच उजव्या डोंगराच्या (रायलिंगच्या) पोटातून अरुंद वाट आहे. या वाटेने लिंगाणा – रायलिंगच्या मधील खिंडीत पोहोचलो.
खिंडीत झाडी आहे, बसायला मस्त दगड आहेत. पाण्याची सोय असती तर अडचणीच्या वेळेत मुक्कामही होऊ  शकतो. पोटपूजा करुन खिंडीतून लिंगणमाचीकडे उतरायला सुरुवात केली. लिंगाण्याकडे तोंड करून उभे राहिले, की उजव्या हाताला एक वाट कारवीत घुसते. वाटेवर प्रचंड घसारा आहे. बाजूला कारवी, मजबूत वेली आहेत. त्यांचा आधार घेऊन, प्रसंगी त्याला लटकत उतरलो. अशा वेळी पुढे राहाणे चांगले. नाहीतर तिरप्या कॅरमबोर्डवरून उतरण्याचे भोग वाटय़ाला येतात. घसारा, कारवी संपल्यावर सुकलेल्या नाला कम ओढय़ातून ही वाट खाली उतरते. खाली झाड दिसते तिथे डावीकडे माचीला जाणारी वाट आहे. खिंड सोडल्यावर तासाभरात लिंगाण्याच्या डोंगरावर डाव्या हाताच्या वाटेला लागलो. अध्र्या तासात लिंगाणा माची गाठली.
पुढचा टप्पा पाने गाव. पान्यात उतरताना सॉल्लिड तापलेले होते, भयंकर हीट जाणवत होती, जणू काही अंगातून वाफा येत होत्या. पायथ्याशी आलो आणि सावली पाहून थांबलो. दम खाऊन, पाणी पिऊन निघालो. कोरडे नदीपात्र पार केले आणि सायंकाळी पान्यात आलो. डांबरी सडकेला लागूनच राम मंदिर आहे. राम मंदिरामागे लिंगाणा उठावलेला आहे. लिंगाणा आणि मंदिर एकाच फ्रेममधे घेतले. ‘भाविकांचा देव मंदिरात, आपला डोंगरात.’ अशी एक कविकल्पना डोक्यात चमकून गेली.
 संपूर्ण ब्लॉगपोस्ट वाचण्यासाठी –  http://rajanstrekdiary.blogspot.in/2012/02/blog-post.html