पावनखिंड म्हटले, की बाजीप्रभू देशपांडे यांचे स्वराज्यासाठीचे ते हौतात्म्य आठवते. आषाढ वद्य प्रतिपदेच्या दिवस-रात्री हा सारा प्रसंग घडला. त्याचेच स्मरण करत दरवर्षी याच तिथीला आणि वेळेला मुंबईच्या ‘शिवशौर्य ट्रेकर्स’तर्फे पन्हाळा ते विशाळगड अशी मोहीम काढली जाते. यंदाही ती ३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान नुकतीच पार पडली. साहस, निसर्ग आणि इतिहासाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या या मोहिमेबद्दल..

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार शिवशौर्य संस्थेच्या वाटचालीत ‘नेमेचि येतो मग पन्हाळा’ ही पन्हाळगड-पावनिखड-विशाळगड अशी पदभ्रमण मोहीम असते. शिवाजीमहाराज सिद्धी जोहरच्या वेढय़ातून आषाढाच्या भरपावसात ज्या दिवशी, ज्या वेळी, ज्या मार्गाने आपल्या निवडक साथीदारांसह निसटले, त्याच मार्गाने सर्वसामान्य माणसांनी जाऊन आपल्या या जाज्वल्य इतिहासाची त्याच थरारक वातावरणात अनुभूती घ्यावी म्हणून ‘शिवशौर्य ट्रेकर्स’ संस्था गेली अनेक वर्षे या ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करत आली आहे. दरवर्षी तीन टप्प्यांत होणारी ही मोहीम, दर पाच वर्षांनी मात्र महाराजांच्या पालखीसह चालत सलग विशाळगडापर्यंत जाते. यंदाच्या वर्षी अशीच पालखीसह मोहीम निघाली होती. शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे स्वराज्यासाठीचे बलिदान लक्षात घेत या मोहिमेला ‘शिवमृत्युंजय’ असे नाव देण्यात आले होते.
या मोहिमेची तयारी गेल्या वर्षीपासूनच सुरू झाली होती. मोहिमेचा दिवस जवळ येत गेला तसा तयारीचा जोम वाढत गेला. प्रमाणपत्र, ओळखपत्र, सदस्यांची यादी, सामानाची यादी, कामाचे वाटप अशी अनेक कामे सुरू झाली. संदेश िशदे यांनी पालखी बनवून दिली. या मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी सईशा फाउंडेशन यांनी शिवचरित्रावर आधारित गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पालखीच्या नियोजित मार्गावर मदतीसाठी बिनीचे शिलेदार आधीच २९ तारखेला कोल्हापुरात दाखल झाले. मोहीम फक्त २१ तासांची होती, परंतु त्याच्या तयारीला मात्र किमान २१०० तास लागले असावेत. अखेर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक अनेक थोरामोठांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेत बरोबर ३० जुलैला मोहिमेला सुरुवात झाली.
महाराष्ट्रातूनच नव्हेतर गोवा, बंगलोर, भोपाळ येथूनही अनेक मावळे पन्हाळय़ावर डेरेदाखल झाले. यामध्ये बाजी आणि शिवा काशीद यांचे वंशजही होते. या साऱ्या जमलेल्या दुर्गप्रेमींना युवापिढीचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पन्हाळगडावर त्या वेळी घडलेल्या घटनांचे कथन केले. महाराज पन्हाळय़ाच्या वेढय़ातून बाहेर पडले त्याच क्षणाला हे सारे दुर्गप्रेमी तयार झाले. रात्रीचे ८ वाजले. शिवा काशीद यांच्या समाधीला फुले अर्पण करून पालखी संभाजीमहाराजांच्या मंदिरातून जल्लोषात निघाली. ३५५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या गर्भात मोहीम शिरत होती. प्रत्येकाच्या हातात भगवे ध्वज होते. ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा निनादत होत्या. प्रत्यक्ष शिवाजी महाराजच गडावर असल्याचा भास होत होता. पाऊसधारा चालू असताना मावळय़ांच्या अश्रुधाराही सुरू होत्या. सारे वातावरण भावुक झाले होते.
संपूर्ण पन्हाळगडावरील रहिवासी, पर्यटक सामील झाले होते. पन्हाळय़ाच्या तहसीलदारांच्या हस्ते शिवाजीमहाराजांच्या मंदिरात आरती झाली. जत्था बाजी प्रभूंच्या पुतळय़ापाशी आला. ३५५ वर्षांपूर्वी अशाच दोन पालख्या पन्हाळगडाहून निघाल्या होत्या. एक महाराजांची तर दुसरी शिवा काशीद यांची! एक स्वराज्याचा जीव वाचवण्यासाठी, तर दुसरी स्वराज्यासाठी जीव देण्यासाठी. जणू आज इतिहासाची पुनरावृत्ती सुरू होती. देशपांडे कुटुंबीयांनी बाजींच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. आनंदा काशीद यांनी श्रीफळ वाढवला आणि २१५ मावळे राजिदडीच्या दिशेने निघाले. गडावर अंधार आणि धुकं यांचेच साम्राज्य पसरले होते. धुक्याचा पडदा भेदणारा तो केवळ एक भगवा होता. राजिदडी उतरताना सर्व आबालवृद्ध ३५५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची अनुभूती घेत होते.
तुरुकवाडी गावात रात्री ११ वाजता सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले. आता मात्र आमची तीन तुकडय़ांमध्ये विभागणी झाली. पहिली तुकडी म्हसाई पठार चढून मार्गाला लागली आणि उर्वरित तुकडय़ा खोतवाडी आणि माळेवाडी गावात मुक्कामाला गेल्या. म्हसाई पठारावर पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ट्रेक सुरू होता. स्वत:जवळ असलेल्या विजेऱ्याची गरज भासत नव्हती. म्हसाईदेवीला नमन करून पालखी पुढे मार्गस्थ झाली. शहरी मावळय़ांना ना थकवा ना शीण. निघाल्यापासूनचा जोम टिकून होता. म्हसाई पठाराचे पौर्णिमी रूपसुद्धा विलक्षण होते. पठार सोडून जंगलातील उतरण सुरू झाली. ही उतरण थेट कुंभारवाडी गावात येऊन संपली. त्यानंतर मात्र सपाट चाल असूनही चिखल वाट बिकट करत होता.
पालखी अपेक्षित वेळेत मध्यरात्री ३ वाजता खोतवाडीत पोहोचली. लगेचच दुसरी तुकडी पालखी घेऊन मार्गाला लागली. हा टप्पा सतत चढउताराचा, शेताच्या बांधावरून चालण्याचा, जंगलाचा असा होता. चिखल तुडवत जंगल पार करेपर्यंत सकाळचे ६ वाजले होते. माळेवाडीत स्थानिक शिक्षकांनी, गावकऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. ‘शिवशौर्य’च्या अध्यक्षांना गावकऱ्यांच्या वतीने कोल्हापुरी फेटा बांधला गेला. संस्थेतर्फे स्थानिक शाळांना दरवर्षी शैक्षणिक व खेळाच्या साहित्याचे वाटप केले जाते.
माळेवाडीतून तिसऱ्या तुकडीतील मंडळी पालखी घेऊन मार्गाला लागली. छोटी छोटी गावे, तिथली कौलारू घरे, शाळा सारे आठवणीत जमा होत होते. दिवसाउजेडी निसर्गाचे चतन्यमयी रूप डोळय़ांत साठवले जात होते. शेतीची सुरूअसलेली कामे जवळून पाहात होती. नांगर हातात धरण्याची हौस भागवली जात होती. म्हाळसवडे गावाआधी लागणाऱ्या ओढय़ात कल्ला करून पालखी पांढरपाणी येथील डांबरी रस्त्यावर आली. सिद्धी जौहरच्या फौजेबरोबर बांदल सेनेची इथेच पहिली चकमक उडाली होती. या गावातून दोन रस्ते फुटतात. एक सरळ अणुस्कुरा घाटाकडे जातो, तर दुसरा उजवीकडे विशाळगडाच्या दिशेने. दुपारी २ वाजता मालाईवाडय़ात सर्व जण जेवायला एकत्र जमले. जेवून झाल्यावर पावनिखडीच्या दिशेने निघाले. देशपांडे कुटुंबीयांकडून युद्धभूमीची पूजा झाली. श्रीदत्त राऊत यांनी युद्धाचा प्रसंग विशद केला. पालखी कासारी ओढा पार करून विशाळगडाकडे मार्गक्रमण करत होती.
सूर्य अस्ताला जाताना पालखी विशाळगडावर पोहोचली. पालखी गडाच्या पायथ्याशी पोहोचली तोवर खबऱ्यामार्फत पालखीच्या आगमनाची वार्ता गडावर जाऊन थडकली होती. शिवाजीराजांची पालखी विशाळगडावर आली याचे स्थानिकांना केवढे अप्रूप! ढोलताशाच्या गजरात गडावर पालखी फिरवली गेली. काहींनी त्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला. दोनचार घरांमधून पालखीचे औक्षण झाले.
इतिहासात जसे विशाळगडावर राजे पोहोचल्याचा आनंद होता. तसेच महाराजांना घेऊन निघालेली ही पालखी गडावर पोहोचल्याचा साऱ्यांना आनंद होत होता. २१५ मावळय़ांनी ही ‘शिवमृत्युंजय पालखी मोहीम’ फत्ते केली होती. गेल्या २१ तासांत कुठेही न थकता, न थांबता ही मोहीम इतिहासातील त्याच वाटेवरून, त्याच दिवशी आणि त्याच क्षणांच्या आठवणी जागवत गडावर पोहोचली होती. या साऱ्यातून त्यांचे घडलेले ‘ट्रेकिंग’ हे शब्दांच्या पलीकडचे होते. जमलेल्या या प्रत्येक दुर्गयात्रीच्या चेहऱ्यावर हाच भाव दिसत होता.