सह्यद्रीची मुख्य धार सोडून देशावर सरकू लागलो, की नगर, खर्डा, करमाळा, परांडा, सोलापूर, नळदुर्ग, औसा, उदगीर, कंधार, नांदेड, माहूर, धारूर अशी बुलंद भुईकोटांची मोठी साखळीच भेटू लागते. यातीलच परांडय़ाच्या वैभवशाली स्थापत्याची
ही मुशाफिरी.सहय़ाद्रीची मुख्य धार सोडून देशावर सरकू लागलो, की किल्ल्यांचे रूप गिरिदुर्गाकडून भुईकोटांकडे वळते. उस्मानाबाद ऊर्फ धाराशिव जिल्हय़ातील परांडा तालुक्याच्या गावीही असाच एक बुलंद भुईकोट आहे. गावात शिरेपर्यंत त्याचे हे रूप ध्यानी येत नाही, पण एका वळणावर अचानक होणारे त्याचे दर्शन धडकी भरवून जाते!
मूळची ही प्रत्यंडक नगरी! काही ठिकाणी याचा उल्लेख परमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांचीच ही दुर्गनिर्मिती, ज्याला पुढे मुस्लीम राजवटींनी अधिक बुलंद केले. कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ातील हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६ म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे, ज्यामध्ये या पलियंड गावचा उल्लेख आला आहे. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला!
सोलापूर जिल्हय़ातील कुर्डूवाडी शहरापासून २५, तर बार्शीपासून २३ किलोमीटरवर हे परांडा गाव आणि किल्ला! या परांडय़ाला येण्यासाठी पुणे, मुंबई, सोलापूरहून थेट बससेवाही उपलब्ध आहे. याशिवाय भूम, बार्शी आणि कुडरूवाडीतूनही इथे येण्यासाठी ठराविक अंतराने बससेवा आहे. पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावरील कुर्डूवाडी स्थानकावर उतरूनही परांडा जवळ करता येते. कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! एका मागे एक तीन दरवाजे. या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह आपले स्वागत करतो. आत यावे तो सर्व बाजूने तट-बुरुजांचे बांधकाम अंगावर येते. वर निमुळते होत गेलेले ते अर्धगोल-अष्टकोनी बुरूज, त्याच्या टोकाकडील ते गवाक्ष, तोफांच्या खिडक्या, अंगावर बाण सुटावेत त्याप्रमाणे त्या तटातून विविध कोनांतून बाहेर येणाऱ्या जंग्या (मारगिरीची छिद्रे), संपूर्ण तटातून जागोजागी डोकावणाऱ्या तोफा.. हे सारेच दृश्य एका बुलंद वास्तुची दहशत निर्माण करते. या दहशतीच्या छायेखालीच पुढे दुसऱ्या दरवाजाची कडी वाजवावी. याचाही दरवाजा अद्याप शाबूत. त्याला ओलांडून पुन्हा एक वळण घेत तिसऱ्याच्या दारात उभे ठाकावे. या दरवाजाच्या दारात एक चौकोनी आकाराची छोटीशी विहीर आहे. या विहिरीला आजही पाणी आहे. जणू हे पाणी पायांवर घेतच प्रवेश करायचा.
या दरवाजाच्या लाकडी फळय़ा, त्यावरील पोलादी सुळे, साखळदंड अद्याप शाबूत आहेत. याच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक फारसी लिपीतील शिलालेख बसवलेला आहे. याचे वाचन झाले नसल्याने त्याचा अर्थ लागत नाही, पण बहुधा या परांडय़ाला हे बुलंद रूप देणाऱ्या कुठल्यातरी शाही राजवटीचाच यावर उल्लेख असणार!
हा गड मूळचा हिंदू राजवटीचा! त्याच्या खाणाखुणा आजही इथल्या बांधकामावर जागोजागी दिसतात. त्याची पुनर्उभारणी केली बहमनी सत्तेचा प्रधान महमद गवान याने. पुढे निजामशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या गडाने बराच काळ मुस्लीम राजवटींचाच अनुभव घेतला. यामुळे इथल्या स्थापत्यशैलीवरही त्यांचाच प्रभाव जाणवतो. हा सारा इतिहास लक्षात ठेवत दुर्गदर्शन सुरू करावे.
वाटेत उजव्या हाताला दारूगोळा आणि तोफांनी भरलेले एक कोठार दिसते. दारूगोळय़ासह हजरतीस असलेले आज हे एकमेव दारूकोठार. काही वर्षांपूर्वी गडावर करण्यात आलेल्या सफाईमध्ये मिळालेले दारूगोळे आणि छोटय़ा तोफा इथे हारीने लावून ठेवल्या आहेत. या कोठारालाच लागून एक छोटासा चौकोनी आड आहे.उजव्या हाताची वाट एका छोटय़ा दरवाजातून गडातील पूर्वाभिमुख मशिदीत जाते. चाळीस खांबांची ही मशीद! तिचे खांब, उत्तरेकडील भिंतीतील दगडी जाळी हे सारेच स्थापत्यातील सौंदर्य दाखवणारे! खरेतर हे स्तंभ किंवा अन्य भाग हे यादवकालीन हिंदू शैलीतील आहेत. ते अन्य ठिकाणचे वाटतात. त्याचीच जुळणी करत ही मशीद उभारल्याचे दिसते. इतिहासात सत्ताबदलानंतर होणाऱ्या सांस्कृतिक आक्रमणाचा हा एक भाग आहे. पण आता या साऱ्याच गोष्टींकडे एक इतिहास म्हणून पाहिले पाहिजे! अशी दृष्टी तयार केली म्हणजे इतिहास समजणे आणि जपणे सोपे जाते.
या मशिदीमागे एका पडक्या खोलीत गडावरील साफसफाईत मिळालेली काही शिल्पे, शिलालेख, देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. नागफण्यांची प्रभावळ घेतलेला पाश्र्वनाथ, शेषावर आरूढ झालेला विष्णू, गद्धेगाळचे शिल्प, एक फारसी लिपीतील शिलालेख, वीरगळ आणि अन्य बरेच काही इथे आहे. पण यामध्येही लक्ष जाते ते सहा हातांच्या गणेशमूर्तीकडे. विविध आयुधे, कमळ, मोदक घेतलेल्या सहा हातांच्या गणेशाचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच आला आहे.
देखा षड्दर्शने म्हणिपती। तेचि भुजांची आकृती।
म्हणऊनि विसंवादे धरिती। आयुधे हाती।।
तरी तर्क तोचि फरशु। नीतीभेदु अंकुशु।
वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे।।
एके हाती दंतु। तो स्वभावता खंडितु।
तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा।।
मग सहजे सत्कारवादु। तो पद्मकरू वरदू।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु।।
ही मूर्ती डोळे भरून पाहावी आणि मध्यभागी असलेल्या राजवाडय़ाच्या भागात यावे. १९६० साली गडाची राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा होण्यापूर्वी इथे या राजवाडय़ाच्या काही भागांत सरकारी कचेरी आणि न्यायालय भरत होते. या राजवाडय़ाचा बराचसा भाग आता कोसळला आहे. या भागातच एक तलाव आणि नृसिंहाचे मंदिरही आहे. हे मंदिर आदिलशाही सरदार मुरार जगदेवने बांधल्याचे बोलले जाते. बाहेरच्या परकोटालगतही एक महादेवांचे मंदिर आहे. अन्य एका मंदिरात गरुडावर स्वार लक्ष्मी-नारायणाची मूर्तीही दिसते. या भागातच कमानींची रचना असलेली बहुमजली अष्टकोनी विहीर आहे. एका कमानीखालील भुयारी मार्गातूनच या विहिरीत आपण उतरतो. प्रत्येक मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली. या जिन्यांनी या मजल्यावर आलो, की अष्टकोनातील प्रत्येक भागातील कमानींच्या त्या रचनेतून विहिरींचे सौंदर्य निराळे भासू लागते. आजही या विहिरीला भरपूर पाणी आहे. असे म्हणतात, या विहिरीचे पाणी हत्तीद्वारे उपसले जाई. कमानींची रचना, बांधकामातील जिने, खोल्या, गच्ची, गवाक्ष या साऱ्यांमुळे गुजरातमधील शिल्पजडित विहिरींची आठवण होते. गडाचा आतील भाग पाहून मग त्याच्या तटावर चढावे. परांडय़ाचे खरे वैभव हे या बुलंद तटबुरूज आणि बुरुजांवरील त्या प्रचंड तोफांमध्ये! गडाला २६ बुरूज आणि या प्रत्येक बुरुजावर धडकी भरवणाऱ्या २६ मोठाल्या तोफा! यातील सहा तर पंचधातूच्या, उर्वरित पोलादी! यांची नावेही दहशत बसवणारी- मलिक-मैदान ऊर्फ रणरागिणी, अझदहपैकर ऊर्फ सर्परूप, लांडा कासम, खडक अशी एकापेक्षा एक! निजामशाहीची शान असलेली ‘मलिका-ए-मैदान’ (जिचा आपण सारे ‘मुलूख-ए-मैदान’ असा चुकीचा उल्लेख करतो.) ही तोफ या गडावर काही काळ होती. इथून ती मुरार जगदेव याने आदिलशाहीच्या संरक्षणासाठी विजापूरला नेली. गडावरील या तोफांवर ती ओतणाऱ्या, घडवणाऱ्यांचे लेखही आहेत. दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावरील पंचधातूची तोफ अशीच बलदंड, आक्रमक! सारा बुरूज तिने व्यापलेला आहे, जिच्यावर तीन ठिकाणी लेख कोरलेले आहेत. तसेच मध्यभागी वीतभर उंचीची सिंहांची एक जोडीही विसावलेली आहे. पश्चिम तटाच्या कोपऱ्यावरील बुरुजावरील तोफेला मगरीचा चेहरा दिलेला असून तिच्या त्या अक्राळविक्राळ जबडय़ात तो तोफेचा गोळाही दाखवला आहे. या तटावरच एका तोफेवर ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम आणि १६२७ सालचा उल्लेख आहे. पोलादी तोफाही अशाच भल्यामोठय़ा आकाराच्या आहेत. यातील उत्तरेकडील बुरुजांवरील दोन अजस्र पोलादी तोफा पाहूनच दडपण यायला होते. त्यांचा आवाज, विध्वंस वृत्ती याची कल्पनाही करवत नाही. परांडय़ाचा हा बुलंद दुर्ग पाहताना त्याच्या या धडकी भरवणाऱ्या तोफा कायमच्याच लक्षात राहतात.
परांडय़ातील या तोफा, तोफगोळे, हिंदू देवतांची शिल्पे, प्राचीन शिलालेख या साऱ्या ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वस्तू आहेत. पण हा सारा ऐवज आज ऊन-वारा-पावसात धूळ खात पडून आहे. चोरा-लुटारूंचे त्याला भय आहे. यातील काही तोफांच्या कडय़ा, छोटेमोठे भाग कापून चोरल्याचेही दिसते. तेव्हा, या सर्व वस्तूंना संरक्षण आणि आश्रय देण्यासाठी या किल्ल्यातच एखादे संग्रहालय उभारले तर परांडय़ाच्या श्रीमंतीत भर पडेल आणि लाखमोलाच्या या ठेव्याचेही संरक्षण होईल. परांडय़ाच्या तटावरून फिरताना गडाच्या अन्य स्थापत्याकडेही लक्ष जाते. भल्या जाडजूड रुंदीच्या या तटावरून खालीवर करण्यासाठी जागोजागी जिने, भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. या गडाच्या प्रत्येक बुरुजापुढे अन्य एका बुरुजाचे चिलखत घातलेले आहे. या तटाला वरच्या बाजूने पाकळय़ांची झालर लावलेली आहे. ही खास मुस्लीम स्थापत्यशैली!
या तटावरून फिरत असतानाच त्याच्या लगतच्या खंदकाकडेही आपले सतत लक्ष जात असते. पाण्याने भरलेला खंदक हा कुठल्याही भुईकोटाची पहिली संरक्षक फळी असते. परांडय़ाला असा हा संपूर्ण किल्ल्याभोवतीने भला लांब-रुंद खंदक आहे. पण तिथे आज गावभराचे गटार सोडले आहे. उकिरडा आणि वेडय़ा बाभळीच्या झाडांचे जंगल माजलेले आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणेही घुसलेली आहेत. पश्चिम तटाच्या कडेने तर अनधिकृत टपऱ्यांची एक नवी तटबंदीच उभी राहिलेली आहे. एरवी कुठल्याही ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धन-विकासाचा मुद्दा आला, की कायदा दाखवणाऱ्या पुरातत्त्व विभागाला या गोष्टी दिसत नाहीत याचे आश्चर्य वाटते. तसेच फुटकळ धार्मिक गोष्टींसाठी अभिनिवेश बाळगणारी आमची जनता आणि लोकप्रतिनिधींचेही उत्तरदायित्व या वेळी कुठे जाते हेही कळत नाही. जातिधर्माच्या गोष्टींना संरक्षण मिळते, पण राष्ट्रीय वारशाला कुणीच वाली उरत नाही असेच काहीसे..!    
अभिजित बेल्हेकर
bhijit.belhekar@expressindia.com

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Ichalkaranji
कोल्हापूर : इचलकरंजी पाणी योजनेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, निर्णयावर टीका आणि स्वागत
Village to JNPT Rajendra Salves successful journey
वर्धानपनदिन विशेष : गाव ते जेएनपीटी… राजेंद्र साळवेंचा यशस्वी प्रवास
Cleanliness Mission at Panchganga Ghat by Sant Nirankari Satsang Mandal
संत निरंकारी सत्संग मंडळाचे पंचगंगा घाटावर स्वच्छता अभियान