प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या छतावर प्रवास न करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. ओव्हरहेड वायरच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण असे असताना काहीजण जाणूनबुजून या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावतात. रविवारी टिळक नगर रेल्वे परिसरात असाच प्रकार पाहायला मिळाला. स्टंट करण्याच्या नादात रेल्वेच्या छतावर चढलेला एक तरुण ओव्हरहेड वायरचा धक्का लागून ६५ टक्के भाजला आहे. कुर्ल्याहून गोवंडीला जायला निघालेल्या अब्दुल अन्सारीने पनवेल लोकल पकडली पण रेल्वेमध्ये  न चढता तो छतावर चढला. रेल्वे टिळक नगर स्टेशनवर आली असताना या तरुणाचा ओव्हर हेड वायरला स्पर्श झाला. यावेळी ओव्हर हेडवायरमधून २५ हजार व्होल्टेज प्रवाहित होत होता. वायरला स्पर्श होताच स्फोट होऊन त्याने पेट घेतला. मात्र रेल्वेमधल्या प्रवाशांना बॉम्बस्फोट झाल्याचे वाटल्याने त्यांनीही रेल्वेमधून खाली उड्या मारल्या. त्यानंतर अब्दुलला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले.