मकबूल अहमद हे नाव भोपाळमधल्या गरिबांसाठी देवापेक्षा कदाचित कमी नसेल. कारण रोज उपाशीपोटी झोपणाऱ्या कित्येक गरिबांचे मकबूल पोट भरतात. मकबूल यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसली तरी आपल्या व्यवसायातून जे काही पैसे त्यांना मिळतात ते गरिबांवर खर्च करतात. मकबूल चहा विक्रेते आहेत. या व्यवसायातून त्यांना जो काही नफा होतो तो ते गरिबांसाठी खर्च करतात. नफ्यातून येणाऱ्या पैशांतून ते अन्न शिजवतात आणि गरजूंना पोटभर जेवू घालतात. त्यांच्या दुकानाबाहेर अनेक गरीब लोक आशेने उभे असतात. मकबूल यांच्यामुळे एकवेळचं का होईना त्यांना पोटभर जेवायला मिळतं.

२०१३ पासून ते हे पुण्यांचं काम करत आहेत. अनेकदा गरिबांसाठी अन्न तयार करण्याकरता त्यांच्याकडे पैसे नसतात. कधी कधी घरखर्चातून ते यासाठी रक्कम खर्च करतात. पण दारी आलेला एकही उपाशीपोटी जाता कामा नये, असं मकबूल यांना वाटतं. म्हणूनच प्रत्येकाला जेवण मिळेल याची दक्षता ते घेतात. अनेक जण त्यांना या कामात मदत देखील करतात. आज त्यांच्याकडे दररोज ३०० हून अधिक गरीब लोक पोटभर जेवतात.