राज्यातील सर्व शहरांमध्ये न्याहरी आणि भोजन स्वस्त दरात मिळण्यासाठी अम्मा उपहारगृहे उघडण्यात आली आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर दुखवटा म्हणून जवळपास तामिळनाडू बंद आहे. अशात कोणाचीही गैरेसोय होऊ नये यासाठी राज्यातील अम्मा उपहारगृहे सुरू ठेवण्यात आली आहेत.

वाचा : जयललितांच्या निधनामुळे गडकरींच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शन साधेपणाने

एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयललिता यांच्या निधनाने तामिळनाडूमध्ये शोककळा पसरली आहे. ‘अम्मा’चे निधन झाल्याने त्यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मरिना बीचवर जयललिता यांना अंतिम निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. एमजीआर स्मारकाजवळ जयललिता यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला आहे. सोमवारपासून अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. पण अम्माच्या योजनेतून सुरू झालेली अम्मा उपाहारगृहं मात्र यावेळी सुरू ठेवण्यात आली. अम्मांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर आला होता. खाण्यापिण्याच्या बाबातीत त्यांची अबाळ होऊ नये यासाठी ही उपाहारगृहं सुरु ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्यांना स्वस्त दरात न्याहारी आणि भोजन उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात अम्मा उपाहरगृह सुरु करण्यात आले होते.