हा अतरंगी प्रकार चीनमध्ये घडलाय म्हणजे ‘उल्का’हे या फोटोमधल्या मुलीचं नाव असण्याची शक्यता शून्य!

आम्ही बोलतोय ते खऱ्याखुऱ्या उल्केविषयी.फोटोमध्ये लाल कपड्याखाली कारसारखी दिसणारी वस्तू म्हणजे आकाशातून पडलेली खरीखुरी उल्का आहे! आणि या उल्केसमोर असणारे दोघंजण म्हणजे एक प्रेमीयुगुल आहे.

आकाशातून पृथ्वीवर पडलेल्या या उल्केच्या साक्षीने प्रेमात पडलेल्या या तरूणाने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं!

आपल्या गर्लफ्रेंड, बाॅयफ्रेंडला प्रपोज करताना ९९ टक्के लोकं काय करतात? एखादं रोमँटिक ठिकाण शोधतात.चाॅकलेटचा डबा किंवा फुलांचा गुच्छ वगैरे आणतात.रोमँटिक ठिकाण पण कोणतं? समुद्रकिनारा किंवा महाग हाॅटेल.अगदीच झालं तर ‘आपण पहिल्यांदा भेटलेलो/पाहिलेलो/भांडलेलो/खोकलेलो ती जागा’ नेहमी मदतीला धावून येतेच.कुछ नया सोचो यार!

तर हा भाई आकाशातच गेला!

चीनच्या जिनजियांग प्रांतामधल्या उरूमकी नावाच्या शहरात या तरूणाने आपल्या गर्लफ्रेंडकडून जेन्युईन “अय्या” मिळवण्यासाठी ही ३३ टन वजनाची उल्का विकत घेत या शहराच्या मध्यभागी असलेल्या एका चौकात ठेवली आणि त्याच्याबाजूला रोमँटिक स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. ती अर्थातच ‘हो’ म्हणाली.

आजूबाजूच्या लोकांना या प्रकाराची जाम मजा वाटली आणि त्यांनी या दोघांचे या सगळ्यांनी पटापट फोटो काढले. प्रपोझलच्या या नव्या पध्दतीची सगळ्यांना मजा वाटतेय. इंटरनेटवरसुध्दा हा फोटो व्हायरल झाल्यावर सगळ्यांनी “कित्ती गोड” वगैरे केलं. काही झालं तरी शेवटी आपल्या खऱ्या प्रेमाचं रूपांतर नात्यात करायला या तरूणाने दहा लाख युअान खर्च केले होते.

दहा लाख युआन म्हणजे किती डाॅलर्स हे गूगलवर सर्च करून झाल्यावर मात्र सगळ्यांची सटकली.

“त्यात आणखी दहा लाख टाकून याने तिला एखादी डायमंड रिंग द्यायला पाहिजे होती”

आणि “ही उल्का आहे? या माणसाने ही विकत घेण्याआधी ती ‘नासा’ने हडप का केली नाही?” अशा प्रकारचे अनेक खडूस प्रश्न नेटवर सगळ्यांनी विचारले.

या दोघांमधलं प्रेम खरं असेल तर आपण त्यांना आडकाठी करणारे आपण कोण? त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात घुसायचा आपल्याला काय अधिकार?

पण तरी, लग्नानंतर ही उल्का ती बाई आपल्या घरात कुठल्या भिंतीवर लावणार?