भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे वाक्य आपण शाळेपासून वाचत आलेले आहोत. भारतात फक्त शेती होते म्हणून हा कृषिप्रधान देश नाही तर शेतिविषयी इथे मोठ्या प्रमाणात संशोधनही होतं. पिकांच्या नव्या नव्या प्रजाती इथे शोधल्या जातात. या नव्या प्रजातींमध्ये अनेकदा कीटकरोधक, जास्त उत्पन्न देणाऱ्या अशा अनेक चांगले गुण असतात. देशातल्या अनेक संस्था, कॉलेज आणि संस्थामधून शेतीच्या संदर्भात संशोधन चालतं. आणि या संशोधनात महिलांचाही मोठा वाटा आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या काही महिला शास्त्रज्ञांविषयी..

कमला जयंती

कमला जयंती
कमला जयंती

कमला जयंती या कीटकशास्त्रज्ञ आहेत. पिकांचं किडीपासून संरक्षण करण्याच्या क्षेत्रात त्या काम करतात. त्यातही आंब्यावर पडणाऱ्या किडीविषयी त्या संशोधन करतात. भारत जगामध्ये आंब्याच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असतानाही आंब्याच्या निर्यातीमध्ये भारताचा क्रमांक मागचा लागतो आहे. याचं कारण म्हणजे भारतीय आंब्याचा काहीसा हलका दर्जा. काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. आंब्यातल्या एका रसायनामुळे काही किडे त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्या आंब्यामध्ये ते अंडी घालतात. त्यामुळे आंबा खराब होतो. कमला जयंतींनी त्यावर एक उपाय शोधून काढला. किडे ज्या रयासनाकडे पाहून आकर्षित होतात त्या रसायनाचा लेप दिलेला एक कागद आंब्यांच्या झाडांवर लावला. यामुळे या किड्यांनी त्या कागदावर आपली अंडी घातली आणि आंबा खराब होण्याचं प्रमाण घटलं. आता हे रसायन बाजारातही उपलब्ध होणार आहे.

माधवी रेड्डी

माधवी रेड्डी
माधवी रेड्डी

या मिरचीच्या पिकाच्या तज्ज्ञ आहेत. भारताला मिरच्यांच्या निर्यातीमधून जास्तीत जास्त फायदा होतो. दरवर्षी ३५०० कोटी रूपयांचं उत्पन्न भारताला मिळतं. माधवी रेड्डी याचसंदर्भात संशोधन करत असतात. मिरच्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्या प्रयत्न करतात. आपल्याला माहीत असलेल्या बेडगी मिरच्यांची प्रत सुधारण्याकडेही त्या विशेष लक्ष देतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक मिरच्यांच्या वाणाची प्रत सुधारल्याने त्यांचा आता औषधनिर्मितीमध्येही वापर होऊ लागला आहे.

डॉ. रेखा ए.

डाॅ रेखा ए.
डाॅ रेखा ए.

डॉ.रेखा ए. या केळ्यांची प्रत सुधारण्याकडे लक्ष देतात. केळ्याच्या पिकावर बुरशी पडल्याने त्याचं मोठं नुकसान होतं. या बुरशीला दाद न देणाऱ्या केळ्यांच्या प्रजाती विकसित करण्यासाठी डॉ. रेखा देतात. त्याचप्रमाणे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किडीला दाद न देणारी चिकूची प्रजाती तयार केली आहे.

शेतीशास्त्र असो की अंतराळविज्ञान, भारतासारख्या पुरूषप्रधान देशामध्ये राहूनही या सगळ्या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने सगळ्याच क्षेत्रात आपला झेंडा रोवला आहे. भारतातल्या तरूण पिढीसाठी त्या एक आदर्शच आहेत.