मोबाईलच्या माध्यमातून सगळे जग हातात आले असताना काही बड्या कंपन्यांनी इंटरनेटच्या जगात वर्चस्व निर्माण केले आहे. ग्राहकांना आपल्या वेगवेगळ्या सुविधांनी भुरळ पाडणाऱ्या या कंपन्यांचे उत्पन्न किती असेल? इतके उत्पन्न या कंपन्यांना कसे मिळत असेल याचा विचार तुम्ही कधी केलाय? नाही ना, मग जाणून घ्या या कंपन्यांचे उत्पन्न आणि ते मिळण्यासाठी त्या करत असलेल्या खटाटोप…

जगातील मोठ्या कंपन्या म्हटले की आपल्या तोंडात नकळत गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, अॅमेझॉन, अॅपल यांची नाव येतात. या कंपन्या दरवर्षी अब्जावधी डॉलर कमावतात. त्यांचे काम कशापद्धतीने चालते हे समजून घेणे नक्कीच औत्सुक्याचे ठरु शकते. मायक्रोसॉफ्टच्या महसुलातील २८ टक्के रक्कम ही एमएस ऑफीसमधून मिळते. विंडोज सर्व्हर आणि विंडोज अझ्युरमधून २२ टक्के तर कंपनीला एक्सबॉक्समधून ११ आणि विंडोज ओएस आणि बिंगमधून ९ टक्के फायदा होतो. बाकी १८ टक्के रक्कम इतर ठिकाणहून येते.

अॅपल कंपनीला सगळ्यात जास्त फायदा आयफोनमधून मिळतो. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ६३ टक्के भाग हा केवळ आयफोनमधून मिळतो. इतर अॅक्सेसरीजमधून अॅपलला ५ टक्के उत्पन्न मिळते तर बाकी ११ टक्के उत्पन्न अॅपल म्युझिक, आयट्यून्स आणि आयक्लाऊडमधून मिळते. गुगलची पॅरेंट कंपनी असणाऱ्या अल्फाबेटचे मोठे उत्पन्न गुगल अॅडवर्डस आणि यूट्यूबमधून मिळते. हे उत्पन्न ८८ टक्के इतके आहे. तर गुगल प्ले सर्व्हिस आणि पिक्सलमधून कंपनीला ११ टक्के उत्पन्न मिळते.
सोशल मीडियावर राज्य करणाऱ्या फेसबुकला सर्वाधिक उत्पन्न जाहिरातींमधून मिळते. हे उत्पन्न ९७ टक्के इतके आहे. तर अॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या शॉपिंग कंपनीकडून कंपनीला ७२ टक्के उत्पन्न मिळते. इतर उत्पन्न कंपनीला अॅमेझॉन प्राईम आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसमधून मिळते.