फोटो किती बोलके असतात ना! जे शंभर शब्दातून व्यक्त होऊ शकत नाही त्या भावना तो संदेश एका फोटोतून व्यक्त होतो. म्हणूनच अशा फोटोंची ताकद ही प्रत्येकाला विचार करायला लावणारी आणि नवी दृष्टी देणारी असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो याचे उत्तम उदाहरण आहे. ‘महिलांना कधीही कमी लेखू नका त्यातूनही त्या एखादं काम करू शकत नाही असा गैरसमज तर अजिबात बाळगू नका’ हा संदेश अत्यंत प्रभावीपणे या एका फोटोमधून पसरत आहे. गाळात अडकून पडलेली बस महाविद्यालयीन मुलीने दोरीच्या मदतीने ओढून काढतानाचा हा फोटो आहे. एका ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

ईशान्य भारतातत्या लोकटक तलाव परिसरात इथल्या महाविद्यालयीन मुलींची शैक्षणिक सहल गेली होती. पण रस्ता कच्चा आणि निसरडा असल्याने त्यांची बस गाळात रुतून पडली. आजूबाजूला कोणतीही मदत मिळत नव्हती. ना बस चालकाला गाळातून ही बस बाहेर काढता येत होती. तेव्हा याच विद्यार्थ्यांनीने दोरीच्या साहाय्याने खेचून ही बस गाळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महिला फक्त चूल आणि मूलचं सांभाळू शकतात, त्या पुरूषांसारखी अवघड कामे करू शकत नाही असा पूर्वग्रह या मुलींनी मोडून काढत गाळात रुतून बसलेली बस बाहेर काढून दाखवलीच.