शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोरील आदर्श असतात. विद्यार्थी अनेक बाबतीत त्यांचे अनुकरणही करत असतात. लहानपणी शाळेतील शिक्षक हेच सर्वस्व असतात. शाळेमध्ये विविध कारणांनी विद्यार्थ्यांमध्ये होणारी भांडणे सोडविण्याचे काम शिक्षक दिवसभरातून अनेकदा करत असतात. मात्र शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यातच जुंपली तर? आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल पण पंजाबमध्ये ही घटना घडली आहे. पंजाबच्या डेरा बासी भागातील एका सरकारी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांमध्ये चांगलीच जुंपली होती. वीणा बासी या मुख्याध्यापिका तर विज्ञानाच्या प्राध्यापिका कैलाश रानी यांच्यात भांडण झाले. हे केवळ साधेसुधे भांडण नाही तर मुख्याध्यापिकेने या शिक्षिकेला मारले.

आता यांच्यात ही भांडणं नेमकी कशामुळे झाली? तर शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेचे फंड स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींसाठी वापरतात असा आरोप अनेक शिक्षकांनी केला होता. तेथील अनेक शिक्षिकांना ती मुख्याध्यापिका म्हणून नको होती तसेच तिची दुसरीकडे बदली व्हावी अशीही त्यांची इच्छा होती. तर दुसरीकडे विज्ञानाच्या शिक्षिकेपासून इतर शिक्षकांना धोका होता असे त्या मुख्याध्यापिकांचे म्हणणे आहे. त्यांचे भांडण इतके थराला गेले की त्यांनी एकमेकांना वर्गातच मारहाण करायला दोघींनी सुरुवात केली. सुरुवातीला हाताने आणि मग आपल्या हातातील पर्सने त्यांनी एकमेकींना मारले. हे भांडण करत त्या वर्गाच्या बाहेर आल्या तेव्हा बाहेर शाळेतील विद्यार्थीही होते. या वर्गाच्या खिडक्या उघड्या असल्याने शिक्षकांमध्ये सुरू असलेली मारामारी अनेक विद्यार्थ्यांनी पाहिले.

सौजन्य – हिंदुस्तान टाइम्स

ही भांडणे शाळेचा दहावीचा निकाल म्हणावा तसा लागत नसल्याने झाली असल्याचे शाळेचे चेअरमन मनजीत सिंग यांनी सांगितले. याविषयी सखोल चौकशी सुरु असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि गावातील स्थानिक यांच्याकडून त्यांच्या तक्रारी लिहून घेण्यात येतील आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले. हिंदुस्तान टाइम्स, पंजाबने अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.