आधुनिक तंत्राज्ञानाने सज्ज असलेले सिंगापूर जगात अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. फार कमी कालावधीत सिंगापूरने प्रगती केली. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती या शहराला आहे. याचवर्षी जगातील महागड्या शहरांच्या यादीत सिंगापूरचे नाव असल्याने हे शहर चांगलेच चर्चेत होते. पण पुन्हा एकदा हे शहर चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे या शहरांच्या रस्त्यावर सध्या विनाचालक टॅक्सी धावत आहेत. सिंगापूरच्या नुटोनोमी कंपनीने या विनाचालक टॅक्सी तयार केल्या आहेत. सध्या या कंपनीने फक्त सहाच टॅक्सी रस्त्यावर उतरवल्या आहेत. पण २०१६ पर्यंत या जास्तीत जास्त टॅक्सी सिंगापूरच्या रस्त्यावर उतरवण्याचा या कंपनीचा मानस आहे.  इतकच नाही तर २०१८ पर्यंत संपूर्ण  सिंगापूर शहरातच  विनाचालक टॅक्सी उतरवण्याचा कंपनीचा हेतू आहे. सुरुवातीचे काही दिवस या टॅक्सीचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. या टॅक्सी सेवांचा लाभ घेण्यासाठी मात्र प्रवाशांना आधी नोंदणी करुन घेणे  गरजेचे आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत हजारो प्रवाशांनी नोंदणी केली आहे. पण ज्यांना गाडी चालवता येते त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार असल्याची अटही या कंपनीने घालून दिली आहे. भविष्यात या टॅक्सी सिंगापूरच्या रस्त्यावर आल्यात तर अॅप्सद्वारे त्यांची बुकिंग करुन त्यांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती या कंपनीने दिली. सध्या या शहराच्या रस्त्यावरून ९ लाखांच्या आसपास टॅक्सी धावत आहे. जर या वर्षभरात हा प्रयोग यशस्वी झालाच तर सिंगापूरच्या रस्त्यावर फक्त ३ लाखांच्या आसपास टॅक्सी उरतील. याआधी गेल्याच महिन्यात नेदलँडच्या रस्त्यावर विनाचालक बस धावली होती. मर्सडिज कंपनीने ही बस तयार केली आहे.