दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध शिकारी ट्युनस बोटा याचा शिकारी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या हत्तींच्या कळपाची शिकार करण्यासाठी ते गेले होते त्यातलाच एक हत्ती अंगावर कोसळून बोटा यांचा मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना वांजे राष्ट्रीय उद्यानात घडली.

बोटा हे त्यांच्या धाडसी आणि तितक्याच रोमांचकारी जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहेत. व्यावसायिक शिकारी म्हणूनही ते प्रसिद्ध होते. अनेक मोठ मोठ्या हौशी पर्यटकांना घेऊन शिकारीला निघणे हा त्यांचा व्यवसाय तर होताच पण त्याचबरोबर छंदही होता. अचूक निशाणा साधून त्यांनी कित्येक मोठ्या प्राण्यांची शिकार केली. गेल्या आठवड्यातच ते आपल्या सहकाऱ्यासोबत शिकारीसाठी गेले होते. यावेळी हत्तीच्या कळपाने बोटा यांच्या शिकारी चमूला घेराव घातला. एका हत्तीणीने आपला मोर्चा बोटा यांच्याकडे वळवत त्यांना आपल्या सोंडेत पकडण्याचा प्रयत्न केला. बोटा यांचे प्राण वाचावे यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एकाने बंदूक चालवून हत्तीणीवर निशाणा साधला. हत्तीण गोळी लागून नेमकी शेजारी उभ्या असलेल्या बोटा यांच्या अंगावर कोसळली आणि तिथेच बोटा यांचा मृत्यू झाला.

काही महिन्यांपूर्वी बोटा यांच्या शिकारी चमूमधील त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याचा देखील असाच मृत्यू झाला होता. झिंबाब्वेमध्ये शिकारीसाठी गेले असताना एका मगरीने त्याच्यावर हल्ला केला होता आणि यातच त्याचा मृत्यू झाला.