जगातील सगळ्यात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणा-या इमान अहमद अब्लदुलाती या महिलेला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत करायचे ठरवले आहे. तिच्यावर एम्समध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येईल असेही स्वराज यांनी सांगितले आहे. पण जवळपास ५०० किलो वजन असलेल्या या महिलेला विमानातून आणायचे कसे असा प्रश्न समोर आला आहे. कारण वजनाची मर्यादा असल्याने अनेक विमान कंपन्यांनी इजिप्त ते भारत असा तिचा प्रवास नाकारला आहे.

वाचा : हजार किलोमीटरची पायपीट करणा-या ‘त्या’ भारतीयाला स्वराज आणणार मायदेशी

इजिप्तमधल्या अलेक्झॅड्रीयामध्ये राहणारी ३६ वर्षीय इमान ही जगातील सगळ्यात लठ्ठ महिला आहे. या महिलेचे वजन तब्बल ५०० किलो म्हणजे अर्धा टन असल्याचे नोंदवण्यात आले आहे. इमान ही गेल्या २५ वर्षांपासून घरातून बाहेरच पडली नाही. ‘डेली मेल’ने दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे वजन इतके अधिक आहे की तिला बिछान्यावरुन हलताही येत नाही. आपल्या दैनंदिन क्रियेसाठी ती पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयापेक्षा अधिक होते. जन्माच्यावेळीच तिचे वजन जवळपास ५ किलोच्या आसपास होते. इमान ही ११ वर्षांची झाली तेव्हा तिच्या वजनामुळे तिला नीट उभे राहता यायचे नाही. त्यामुळे खेळण्या बाडगण्याच्या वयात इमानला घरातच राहावे लागायचे. त्यातूनच अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला शाळाही सोडावी लागली. गेल्या २५ वर्षांपासून तिची आई आणि बहिण तिची सेवा करत आहे. इमान पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसीकडे वैद्यकिय साहाय्य मागितले होते. यासाठी त्यांनी ऑनलाइन याचिका देखील दाखल केली होती.

अशातच एकाने स्वराज यांना ट्विट करत या महिलेची मदत करण्याची मागणी केली होती. स्वराज यांनी देखील या ट्विटची दखल घेत. तिला भारतात येण्यासाठी वैद्यकिय व्हिसा देऊ केला आहे. एम्स रुग्णालयात तिच्यावर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु या महिलेला भारतात आणयचे कसे असा प्रश्न आता पडला आहे. कारण विमान प्रवासासाठी  कंपन्यांनी वजनावर मर्यादा घालून दिल्या आहेत. जेट एअरवेजने प्रवास करताना वजनाची मर्यादा ही १३६ किलोग्रामपर्यंत आहे. पण ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार एअर इंडियाच्या विमान सेवेने तिला भारतात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासंबधीची बोलणी सुरू आहे.