एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत असताना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँडने पाकिस्तानी राष्ट्रगीत आणि ‘जन-गण-मन’ हे भारतीय राष्ट्रगीत सादर केले होते. दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण व्हावेत यासाठी ‘व्हॉईस ऑफ राम’ नावाच्या ग्रुपमधील दोन्ही देशांच्या सीमेवर राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन ही राष्ट्रगीते म्हटली होती. एकत्रितरित्या गायलेल्या या राष्ट्रगीतांना ‘शांतता गीत’ असे नावही देण्यात आले आहे.

या बँडविरोधात विविध घटकांतून टीकेची झोड उठली होती. मात्र या व्हिडिओला उत्तर देत पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी ‘जन-गण-मन’ आणि ‘पाक सरजमीन’ या दोन राष्ट्रगीतांची जुगलबंदी सादर करुन याला अतिशय सकारात्मक उत्तर दिले आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर वेगवेगळ्या प्रकाररच्या प्रतिक्रिया येत आहेत. लाहोरमधील ‘फोरमन ख्रिश्चन विद्यापीठा’तील विद्यार्थ्यांनी भारतीयांना हे रिटर्न गिफ्टच्या स्वरुपात दिले आहे.

हा व्हिडिओ व्हॉईस ऑफ रामकडून फेसबुकवर शेअर करण्यात आला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ १ लाख ३२ हजार जणांनी पाहिला आहे. तर २, ४७३ जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.