कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मग त्यासाठी आपण अनेक वर्षे बचतही करतो. काही जण डाऊन पेमेंट करुन लोन काढतात. तर काही मोठ्या रकमेचा चेक देतात. मात्र चीनमधील एका महिलेने कार घेण्यासाठी गेल्यावर काय केले हे ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चीनमध्ये एका स्थानिक डिलरकडे कार घेण्यासाठी गेलेल्या या महिलेने कारसाठी किती रोख नेली असेल याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. इतकी रोख रक्कम पाहून याठिकाणी काम करणारे कर्मचारीही चाट पडले. या महिलेने ४ सॅक भरुन तब्बल १२ लाख ५१ हजारांहून अधिक रक्कम नेली होती. गंमत म्हणजे कार डिलरकडील २० कर्मचारी अडीच तासांहून अधिक काळ ही रक्कम मोजत होते. महिलेने १ येनच्या नोटा बॅगमध्ये भरुन आणल्या होत्या.

ही महिला बांधकाम व्यवसायात असून शोरुमकडून तिची ही रोख रक्कम स्विकारणार असल्याचे सांगितल्यानंतर तिने कार घेण्याचे नक्की केले. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार त्या महिलेने आपल्याला बोलावून तिच्या कारमधील पैशांचे बॅग न्यायला सांगितले असे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. या महिलेने १९ लाख २५ हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीची कार खरेदी केली. यावेळी महिलेने आपल्याकडे असलेली रोख रक्कम भरली आणि उर्वरीत रक्कम तिने मोबाईल बँकिंगद्वारे भरली. अशाप्रकारे इतकी रोख रक्कम आणणारी ही पहिलीच महिला नव्हती तर २०१६ मध्ये टेक्सासमधील एका व्यक्तीनेही आपला वाहतूकीचा दंड भरण्यासाठी २ बादल्या भरुन रक्कम नेली होती.