रस्त्यावरील लहानग्यांना पाहून आपल्या मनात काहीतरी हलतं नक्की. यांच्यासाठी आपण काय करु शकतो असा विचारही डोक्यात अनेकदा घोळतो. मग आपण घरातले जुने कपडे आणून या थंडीत कुडकुडणाऱ्या आणि उन्हाचा चटका अंगावर झेलणाऱ्यांना देतो. अगदी असे प्रत्यक्ष नाही तरी कोणत्यातरी स्वयंसेवी संस्थेत आपले जुने कपडे नेऊन देतो. मात्र हे कपडे जुने झाल्याने कधी त्यांचा रंग गेलेला असतो तर कधी ते भरपूर वापरलेले असल्याने जुनाट दिसत असतात. आता यासाठी काय करायचे यावर उपाय शोधत एका तरुणीने अनोखी संकल्पना राबवली आहे.

२० वर्षाच्या अंचल सेवानी हिने आपल्यातील कलेचा अतिशय उत्तमरितीने वापर केला आहे. घरात जुन्या झालेल्या कपड्यांवर उत्तम पेंटींग्ज काढत तिने या लहान मुलांना खूश करायचे ठरवले आणि ती कामाला लागली. नोएडामध्ये एका खासगी विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेणारी ही तरुणी आपल्यातील समाजाबाबतच्या भावना जागृत असल्याचे दाखवते. अंचल म्हणते, मी लहानपणापासून गरीब मुलांना खराब कपडे घातलेले पहाते. लोकही दान करण्याच्या नावाखाली या मुलांना अतिशय खराब कपडे देतात. मात्र त्यांनाही आपल्याप्रमाणे चांगले कपडे वापरण्याचा अधिकार आहे असे मला कायम वाटते.

वंचित घटकांना कपडे दान करण्याच्या गोष्टीबाबत लोकांचा माईंडसेट बदलणे गरजेचे असल्याचे ती म्हणते. लोक आपल्या घरातील कपडे देतात तेव्हा ते घालण्याच्या अवस्थेत आहेत की नाही हे पण पाहीले जात नाही. आपल्याला त्या कपड्यांची गरज नाही म्हणून केवळ हे कपडे अशा ठिकाणी आणून दिले जातात. लोकांचा हा अॅटीट्यूड बदलायचा असून कपडे देण्याआधी ते छान रंगवून द्यावेत असे मला वाटते.

यातील आणखी आश्चर्याची बाब म्हणजे कपड्यांवर चित्रे काढण्याआधी अंचल या मुलांना त्यांच्या आवडीचे कार्टून विचारते. यातील काही जण आपल्याला आवडणाऱ्या आणि गाजलेल्या डोनाल्ड डक, मिकी माऊस आणि मर्मेड यांची नावे सांगतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अतिशय महत्त्वाचा असून त्यांची आवड समजून घेण्यासाठी मी हे करते असे ती म्हणाली. हे सगळे मी माझ्या खर्चाने करत असून माझे आई-वडिल मला यासाठी मदत करतात असेही तिने सांगितले. त्यांची जावनशैली मी फारशी सुधारु शकणार नाही पण त्यांचे लहानपण सुंदर करण्याचा प्रयत्न मी करत असल्याचे ती म्हणाली.