संधिवाताने आखडलेली पायाची बोटं सरळ करणं, मनगटावर शस्त्रक्रिया करून अडकलेल्या नसा मोकळ्या करणं, तुटलेले कूर्चेचे तुकडे काढून टाकणं अशा विविध शस्त्रक्रियांचं तंत्र आता खूपच प्रगत झालं आहे आणि रुग्णाचं जीवन सुसह्णा व्हायला यामुळे निश्चित मदत होते आहे.
चार पायांवर चालणाऱ्या प्राण्यांपासून माणूस उत्क्रांत झाला, तेव्हापासून कदाचित संधिवात म्हणजे स्नायू आणि सांध्यांची दुखणी त्याच्या मागे लागली असावी. इ.स. पू. १५ व्या शतकापासून इजिप्शियन पपिरसमध्ये संधिवाताची वर्णनं आढळतात, तसंच ‘ममीज्’मध्ये संधिवाताने आखडलेली बोटंही दिसतात. इ.स. पू. दुसऱ्या- तिसऱ्या शतकात रचल्या गेलेल्या चरकसंहितेत संधिवाताची सविस्तर वर्णनं आहेत, तसंच हिप्पोक्रेटिसनीसुद्धा ‘गाउट’ या संधिवाताबद्दल लिहिलं आहे.
असं असलं तरी आधुनिक वैद्यकात संधिवाताला विशिष्ट स्थान मिळालं अगदी अलीकडे. १९४० मध्ये संधिवातशास्त्र म्हणजेच ह्य़ुमॅटॉलॉजी ही स्वतंत्र वैद्यकशाखा म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतात गेल्या ३५ वर्षांत या विषयाचं पदव्युत्तर शिक्षण मिळण्याची सोय झाली. आजच्या या लेखात ह्य़ुमॅटॉलॉजीच्या ३५ वर्षांतल्या वाटचालीची माहिती देणार आहे.
पूर्वी अंगदुखी-सांधेदुखीचे रुग्ण थेट अस्थिरोगतज्ञांकडे (सर्जन्स) पोहोचत. पण वेदनाशामक गोळ्यांखेरीज त्यांच्या हाती काहीच लागत नसे. आता मात्र सांधेदुखीचे डॉक्टर ‘वेगळे’ असतात हे लोकांना समजू लागलं आहे. संधिवात हा सांध्यांपुरता मर्यादित नसतो तर ताप, वजनात घट, रक्तक्षय, त्वचेवर पुरळ, डोळे-मूत्रपिंड-फुप्फुसं इत्यादी अवयवांत होणारे बदल हाही संधिवाताचाच एक भाग असू शकतो याची माहिती लोकांना होऊ लागली आहे. १९९६ साली महाराष्ट्रात भिगवण परिसरात डॉ. अरविंद चोप्रा यांनी संधिवाताच्या संदर्भात भारतातली पहिली सामाजिक पाहणी केली. त्यानंतर आजवर १३ राज्यांत अशी पाहणी झाली आहे. या सर्वेक्षणातून आपल्याला संधिवाताच्या समस्येचं रूप स्पष्ट होतं. शहरांपेक्षा ग्रामीण भागात आणि पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये संधिवात जास्त आहे. संधिवाताच्या प्रकारात झीजजन्य संधिवात सर्वात जास्त ३४ टक्के, दाह झाल्याने होणारा १० टक्के, सांध्यांव्यतिरिक्त नुसती स्नायुदुखी १० टक्के आणि कोणतंही लेबल लावता येणार नाही अशा तक्रारी उरलेल्या रुग्णात दिसून येतात. बऱ्याचदा एखादी तक्रार कालांतरानं आपलं स्वरूप बदलते असंही नंतर लक्षात येतं.
संधिवाताच्या निदान प्रक्रियेतही प्रगती झाली आहे. पूर्वी रुग्णाच्या तक्रारींचं वर्णन ऐकून आणि शारीरिक तपासणी करून निदान केलं जाई. काही मोजक्या रक्त तपासण्यांमधून जुजबी माहिती मिळे. संधिवाताचे बदल एक्स रे तपासणीत जेव्हा लक्षात येतं तोपर्यंत बरीच हानी झालेली असायची. आता अगदी सुरुवातीच्या स्थितीचं निदान सोनोग्राफी, पॉवर डॉप्लर किंवा प्रसंगी एमआरआय स्कॅन, पेट स्कॅन या तपासण्यांतून होऊ शकतं. शिवाय उपचार सुरू केल्यावर रुग्णाचा प्रतिसाद कसा आहे हे समजण्यासाठी सोनोग्राफी उपयोगी पडते.
ज्या संधिवातात सांध्यांमध्ये दाह होतो त्यात ऑटो इम्यून हा गट महत्त्वाचा आहे. अशा रुग्णाच्या शरीरात त्याच्या स्वत:च्या सांध्याच्या पेशीविरुद्ध काम करणारी घातक द्रव्यं ऊर्फ अँटीबॉडीज तयार होतात. विशेष म्हणजे त्यातील काही द्रव्यं संधिवाताची लक्षणं पूर्ण उद्भवण्याअगोदरच रक्तात दिसून येतात. अशा प्रकारची सगळ्यात जुनी चाचणी म्हणजे ह्य़ुमॅटॉइड फॅक्टर : (आर. एफ.). आता मात्र अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडी, अँटी सीसीपी अँटीबॉडी अशा कित्येक नवनवीन चाचण्या आल्या आहेत आणि नेमकं रोगनिदान करायला मदत करीत आहेत. याशिवाय संधिवाताचा जोर किती आहे याची कल्पना ईएसआर आणि सीआरपी या चाचण्यांवरून येते, तसंच पुनर्तपासणीच्या वेळी रोगाची वाटचाल कोणत्या दिशेनं चालली आहे हेही या चाचण्यांवरून कळू शकतं. अलीकडे रेणवीय जीवशास्त्रावर आधारित एचएलए बी २७ आणि एचएलए डी आर या नव्या तपासण्या आल्या आहेत, त्या संधिवाताचा विशिष्ट प्रकार आणि त्याची तीव्रता याविषयी माहिती देतात.
सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा ऑटो इम्यून संधिवाताचा प्रकार म्हणजे ह्य़ुमॅटॉइड आरथ्रायटिस. याचे योग्य उपचार झाले नाहीत तर सांधे आखडतात, वेदना होतात आणि प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापन केलेल्या संधिवात संशोधन संस्थांतर्फे वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वं प्रसारित होतात. ही तत्त्वं थोडक्यात अशी- त्वरित रोगनिदान आणि प्रभावी औषधं पूर्ण मात्रेत वापरून लवकरात लवकर रोगावर नियंत्रण मिळवणं महत्त्वाचं. कारण त्यामुळे कायमस्वरूपी नुकसान टाळलं जातं. या औषधांचे तीन गट आहेत. त्यापैकी पहिल्या गटात येतात वेदनाशमनाची औषधं, तसंच दाह कमी करणारी औषधं. यात विविध प्रकारचे रेणू उपलब्ध आहेत. खास उल्लेख केला पाहिजे कॉर्टिसोन औषधांचा. प्रभावी असं हे दुधारी शस्त्र. याचे दीर्घकालीन दुष्परिणाम टाळण्यासाठी यांचा वापर जरूर तेव्हाच आणि तितकाच केला पाहिजे.
दुसरा गट महत्त्वाचा, कारण यामुळे संधिवाताची वाटचाल तिथल्या तिथे रोखली जाते. सांध्याची कार्यक्षमता जास्तीत जास्त शाबूत राहते. या गटात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन, मेथोट्रेक्सेट, सल्फा सॅलँझिन इत्यादी औषधं येतात. यापैकी प्रत्येक औषधाचे काही न काही दुष्परिणाम आहेतच. औषधामुळे होणारा फायदा आणि नुकसान यांचा ताळमेळ सांभाळण्याचं काम डॉक्टरांचं आहे.
१९९० च्या सुमारास संधिवाताच्या उपचारात झालेली क्रांती म्हणजे जैविक औषधं! सांधे खराब होण्याच्या प्रक्रियेसाठी शरीरात तयार होणारी अनेक रसायनं जबाबदार असतात. या रसायनांना निष्प्रभ करण्याचं काम ज्या औषधांनी केलं जातं असा हा गट आहे. ही औषधं बहुधा शिरेतून किंवा त्वचेखाली देण्याच्या इंजेक्शनच्या रूपात असतात. अलीकडे यात तोंडाने घेण्याच्या औषधांची भर पडली आहे. अत्यंत परिणामकारक पण महाग अशी ही औषधं रोगप्रक्रिया नियंत्रित करतात. जंतुसंसर्गाच्या जोडीला इतरही अनेक दुष्परिणाम होत असल्याने यांचा वापर तज्ज्ञ डॉक्टरांनीच करायला हवा.
झीजजन्य संधिवात हा फार मोठा गट. वाढतं वय आणि वजन ही मुख्य कारणं. मार बसणं, विशिष्ट क्रीडाप्रकार किंवा व्यवसाय यामुळेही कमी वयात सांध्याची झीज होते. हाडांची झीज भरून येत नसली तरी त्या सांध्याशी संलग्न स्नायू व्यायाम करून मजबूत करता येतात. सशक्त स्नायूंच्या मदतीने झिजलेले सांधेही दीर्घकाळ सेवा देतात. मात्र झीज प्रमाणाबाहेर झाल्यास रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होऊन रुग्ण अगदी त्रासून जातो. अशा वेळी शस्त्रक्रियेला पर्याय नसतो. लहानसहान दोष दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून काढता येतात. यामध्ये लहानशा छिद्रातून केली जाणारी मणक्याची शस्त्रक्रिया मुद्दाम उल्लेखावी लागेल. पण गुढघा किंवा खुब्याच्या सांध्याची रचना अगदीच बिघडून गेली असेल तर संपूर्ण सांधाबदल हा आजचा प्रचलित उपाय आहे. आता यात रुग्णाच्या काळजीची पद्धत आणि शल्यतज्ञांचं कौशल्य इतकं विकसित झालं आहे की शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचं प्रमाण फारच उत्तम आहे. त्याचप्रमाणे संधिवाताने आखडलेली पायाची बोटं सरळ करणं, मनगटावर शस्त्रक्रिया करून अडकलेल्या नसा मोकळ्या करणं, तुटलेले कूर्चेचे तुकडे काढून टाकणं अशा विविध शस्त्रक्रियांचं तंत्र आता खूपच प्रगत झालं आहे आणि रुग्णाचं जीवन सुसह्णा व्हायला यामुळे निश्चित मदत होते आहे.
संधिवात कोणताही असो, उच्च पोषणमूल्य असणारा आहार, विशिष्ट व्यायाम (फिजिओ थेरपी), वजन नियंत्रण आणि मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन यामुळे निश्चित फायदा होतो.
रुग्णावर सुरू केलेले उपचार कितपत प्रभावी आहेत याची आता पद्धतशीर नोंद ठेवली जाते. कोणकोणते सांधे दुखतात, वेदना ‘शून्य ते दहा’मध्ये कोणत्या पायरीवर आहे, दैनंदिन जीवनात उठणं, बसणं, चालणं, शारीरिक स्वच्छता, जेवण, घरकाम, वाहन चालवणं, इत्यादी सर्व गोष्टींविषयी प्रश्न विचारून रुग्ण प्रत्येक बाबतीत समर्थ आहे की असमर्थ हे नोंदतात. त्यानंतर पुनर्तपासणीच्या वेळी या सर्व गोष्टीत काय फरक पडला हे बघितलं जातं. या पद्धतीमुळे आता उपचार करणं, औषधांची मात्रा ठरवणं अधिक शास्त्रशुद्ध झालं आहे.
संधिवातशास्त्राकडून आपल्याला काय
हवं आहे? संधिवाताचे प्रतिबंधक उपाय,
लक्षणं दिसण्यापूर्वीच रोगनिदान, दुष्परिणाम कमीत कमी होतील अशी सुरक्षित औषधयोजना, परवडेल अशा दरात सांधारोपण शस्त्रक्रिया आणि आयुर्वेद किंवा इतर ‘पथीं’मधील संधिवाताच्या औषधांचा शास्त्रीय कसोटय़ांवर अभ्यास आणि यथोचित उपयोग, या आपल्या संधिवातशास्त्राकडून
अपेक्षा आहेत, आशा आहे की पुढे शास्त्र अधिक उत्क्रांत होईल.

drlilyjoshi@gmail.com
या लेखासाठी विशेष साहाय्य :
डॉ. वैजयंती लागू-जोशी,
एम डी, संधिवाततज्ज्ञ,
rvaijuvardhan@rediffmail.com