भ्रष्टाचारनिर्दालक, आम आदमी उद्धारक श्री श्री अरविंदजी केजरीवालजी यांस झालेल्या कफविकाराचे निदान अखेर झाले आहे. अनेकांचा आजवर समज असा की, आप-ल्या या दिल्लीपतींस डांग्या खोकला नामक भयंकर बिमारी जडलेली आहे. परंतु ताज्या वैद्यकीय अहवालानुसार त्यांस आरोप्या खोकला झाला आहे. ही जात तशी अगदीच आम. संसर्गजन्यही. तिची बाधा एकदा झाली की मनुष्यास सतत कोणावर ना कोणावर आरोप करण्याची उबळ येत राहते. अरविंदजींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ताजा, साधारणत: एक हजार ३३७वा आरोप हा याच आरोप्या खोकल्यामुळे आला आहे. त्यामुळे त्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. त्याचे म्हणजे आरोपाचे नव्हे, खोकल्याचे. या खोकल्यामुळे अरविंदजींच्या सरकारला अन्य आनुषंगिक आजारही झाले आहेत. त्यातील सर्वात मोठा आजार म्हणजे तुरुंगीसाथ. आपचे आमदार आणि नेते एकामागोमाग एक पोलिसी कोठडीत जाताना दिसतात ते या साथीमुळेच. यामुळे म्हणे तिहार कारागृहात डोकेदुखीची साथ आली आहे. म्हणजे त्यांना चिंता ही की, दिल्ली विधानसभेचे पुढील अधिवेशन तिहार तुरुंगात तर भरवावे लागणार नाही ना? तर ज्या अनारोग्यातून ही तुरुंगीसाथ आली आहे त्याला कारणीभूत अरविंदजींचे सरकार आहे की मोदींचे हा गहन प्रश्नच आहे. पण त्याच्या उत्तरादाखल, पंतप्रधान आपल्या जिवावर उठले आहेत, ते आपणांस मारू शकतील असा आरोप करणे म्हणजे आरोप्या खोकला गांभीर्याच्या तिसऱ्या ‘स्टेज’लाच गेला आहे असे म्हणावे लागेल. मोदी भक्तांनीही हे आजारपण लक्षात घ्यायला हवे. पण तेही बिचारे पुन्हा आजारीच. त्यातील अनेक मेंदूज्वराने आजारी. अनेकांच्या बुद्धीस पक्षाघाताचा झटका आलेला. त्यामुळे ते अरविंदजींवर तुटून पडले. पूर्वी ते अरविंदजींना मफलरमॅन म्हणत असत. आता ड्रामा क्वीन म्हणू लागले. अरविंदजींना नाटकी म्हणणे हे जरा अतीच झाले. सुप्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी याही त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस अमिताभ बच्चन प्रभृतींवर असेच आरोप करीत असत. परंतु म्हणून काही कोणी त्यांनासुद्धा नाटकराणी म्हटले नाही. त्यांच्याकडे रुग्ण म्हणूनच पाहिले गेले. तोच न्याय वस्तुत: अरविंदजींना लावायला हवा. कोणत्याही आजारी व्यक्तीकडे तेवढय़ा सहानुभूतीनेच पाहिले पाहिजे. किमान असा आरोप्या खोकला ज्यास झाला आहे त्यास माणुसकीच्या भावनेतून ‘कुछ लेते क्यूं नही’, असा सवाल तरी विचारला पाहिजे. अरविंदजी एवढे हट्टी की, ते काही घेणार नाहीत. कारण आपण काही घेत नाही याचाच त्यांना मोदीजींएवढाच अभिमान! पण त्यांनी किमान पथ्ये तरी पाळली पाहिजेत, कारण त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. भ्रष्टाचारनिर्दालन करायचे आहे, गल्लीगल्लीत लोकपाल आणायचे आहेत. तेव्हा आता त्यांनी पथ्ये पाळावेत यासाठी आम आदमीनेच काही तरी, म्हणजे किमानपक्षी धरणे, चार-दोन तासांचे उपोषण वगैरे मार्ग चोखाळले पाहिजेत. अगदीच काही नाही, तर घरोघरी मेणबत्त्या लावून अरविंदचरणी प्रार्थना केली पाहिजे, की सरजी, गेट वेल सून जी!!