तुम्ही महानगरात राहता? म्हणजे तुम्ही नक्कीच श्रीमंत असणार.. तुमच्याकडे नक्कीच दुचाकी किंवा चार चाकी स्वयंचलित वाहन असणार. नसेल तर तुम्ही रिक्षा-बसचे नियमित प्रवासी असणार. तसेही नसेल, तर तुम्ही गरीब असाल. मग झगमगलेल्या महानगरांमध्ये तुम्हाला तुमच्या गल्लीबाहेर पडण्याचाही हक्क नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. देशाच्या विकासाचा वेग झपाटय़ाने वाढतोय. तो वेग रस्त्यावर आणि हमरस्त्यांवर दिसला पाहिजे. विकासाच्या वेगाशी स्पर्धा करायची असेल, तर तुम्हाला तुमचा वेग वाढवावा लागेल. चालल्याने, पळण्याने किंवा धापा टाकत सायकलीसारख्या कालबाह्य़ वाहनांची पायदळे घुमवत विकासाच्या वेगाशी स्पर्धा करू म्हणाल, तर तुम्हीही मागे पडाल आणि नव्या, आलिशान आणि देशाच्या प्रतिष्ठेची प्रतीके बनणाऱ्या झगमगाटी वाहनांच्या वेगातही अडथळे आणाल. म्हणूनच, मुख्य रस्त्यांवर किंवा हमरस्त्यांवर चालण्याचा किंवा सायकल चालविण्याचा तुमचा हक्क हिरावून घेण्यात येणार आहे. संसदेच्या एका स्थायी समितीचा, म्हणजे, तुमच्याआमच्या लोकप्रतिनिधींचाच तसा आग्रह आहे. देश झपाटय़ाने पुढे सरकत असताना पायी चालण्याचे किंवा सायकल चालविण्याचे बुरसट विचार करणाऱ्यांना गल्लीबाहेरच्या रस्त्यांवर प्रवेश नाही म्हणजे नाही. आता तुम्ही काही तरी पर्यावरणीय किंवा आरोग्यवर्धक कारणे पुढे करून चालणे किंवा सायकल चालविण्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी सरसावून पुढे व्हाल, पण मुद्दा केवळ विकासाचाच नव्हे, तर वेगवान विकासाचा आणि वाहतुकीच्या शिस्तीचादेखील आहे. तुमचे आरोग्य आणि तुमचे पर्यावरण या तुमच्या खासगी बाबी.. त्या कशा जोपासायच्या ते तुमचे तुम्ही पाहायचे आहे. तुमच्या गल्लीत मनसोक्त सायकल चालवा, आरोग्यसंवर्धनासाठी चालायचेच असेल, तर जेवणानंतर गल्लीत चकरा मारून हजार वेळा शतपावली करा, घराच्या ग्यालरीत एकदोन तुळशीची रोपटी लावून घरातल्या घरात मनसोक्त प्राणवायू मिळवा, पण रस्त्यावरच्या किंवा हमरस्त्यावरच्या वेगाला वेसण ठरू नका. तुमचे हक्क तुमच्याकडे शाबूत राहतील याची हमी सरकार तुम्हाला देत असले तरी ते सार्वजनिक ठिकाणी वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण त्या हक्कांपेक्षा वेगवान विकासाची फळे चाखणे महत्त्वाचे आहे. तुम्ही चालणे सोडा, सायकल चालविणेही सोडा आणि हमरस्त्यावरच्या विकासाच्या वेगावर स्वार व्हा. तुम्हाला त्या वेगाची चटक लागेल. ती नको असेल तर घरी बसा, अथवा महानगरे सोडून बाहेर निघून जा. वेगवान विकासाच्या वाटेत येऊन उगीच अडथळे निर्माण करू नका. कारण विकासाच्या वेगाआड येणारे कोणतेही अडथळे सहन करायचे नाहीत ही सरकारची प्रतिज्ञा आहे. त्याला साथ द्या. तुम्ही सायकलचा किंवा पायी चालण्याचा हट्टच धरलात तर विकासाचा वेग कसा गाठणार? विकास पाहायचा असेल, तर पायाला यांत्रिक भिंगरी बांधा आणि मगच रस्त्यावर उतरा. मग बघा, सगळीकडे विकासच विकास!!

Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
businessman should understand loan its aspect and complexity
उद्योजकाने कर्ज आणि गुंतागुंत समजून घ्यावी
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा