फुटबॉल या खेळाचे मूळ कुठे आहे, या प्रश्नाचे एक धड उत्तर मिळत नाही. पण एक नक्की. आपल्या भारतदेशी या खेळाचा शोध लागला नसावा. आपला देश हिंदू संस्कृती, परंपरांनी नटलेला. या संस्कृतीत कुणावरही लाथेने प्रहार करणे निषेधार्ह. साध्या केरसुणीला पाय लागला तरी दोन्ही गालांवर थपडा मारून नमस्कार करणारी संस्कृती आपली. अशा संस्कृतीत, ज्या खेळात एखाद्या वस्तूला सातत्याने लाथा मारणे हीच कौशल्याची गोष्ट असते तो खेळ निपजणे अशक्यच. या खेळाचे मूळ नक्की विलायती. अशा या खेळाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देशप्रेमी संघटनेस एकाएकी ममत्व का निर्माण झाले असावे? मुळात हा खेळ अवसानघातकी. चेंडूला लाथ मारताना पायांतील बूटही कधी कधी दूर भिरकावला जातो. कधी लाथ मारताना ती मारणाऱ्याचाच तोल जातो. (अनुक्रमे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुनील तटकरे याबाबत अधिक सांगू शकतील.) असे असताना संघाला त्या खेळाविषयी प्रेम का? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये संघाने ११ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धा. आपल्या म्हणण्याचा चेंडू इकडून-तिकडून फिरवत फिरवत पुढे नेण्याची आणि त्या चेंडूस अनपेक्षित लाथ मारण्याची ममतांची हातोटी बघूनच संघाने पश्चिम बंगालची निवड केली की कसे, हे ठाऊक नाही. पश्चिम बंगाल म्हणजे फुटबॉलप्रेमींचे आणि फुटबॉलपटूंचेही माहेरघर. ईस्ट बंगाल, मोहन बागान असे तेथील संघ विख्यात. पण संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेत हे संघ खेळणार नाहीत, तर ज्यांचे वय मतदान हक्कवयापासून केवळ एकच वर्ष दूर आहे, अशा १७ वर्षांखालील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असेल. त्यातील विजेत्यांना ‘फिफा’च्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची तिकिटे देण्यात येतील. खरे तर हा एक जबर सांस्कृतिक धक्का आहे. संघाकडून या असल्या विदेशी खेळांच्या स्पर्धा अपेक्षित नाहीत. लाठय़ाकाठय़ा, दंड, वेत्रचर्म, नियुद्ध, मामाचं पत्र हरवलं, लंगडी अशा अस्सल भारतीय संस्कृतीशी नाळ जुळलेल्या खेळांच्या स्पर्धाच त्यांनी भरवायला हव्यात. तरुण पिढीशी नाळ जोडायची असली म्हणून काय झाले, ही तरुण पिढी आपल्याच राष्ट्रातील आहे, हे संघाच्या धुरीणांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांच्यावर चांगलेच संस्कार व्हायला हवेत. लाथा मारण्यास उत्तेजन देणाऱ्या फुटबॉलसारख्या खेळांच्या स्पर्धेने ते कसे होणार? महत्त्वाचे म्हणजे, ‘माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो..’, अशी आपल्या भाषणाची सुरुवात करून अमेरिका जिंकणारे स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील त्या ऐतिहासिक भाषणाला स्पर्धेच्या दिवशी १२५ वर्षे होत आहेत. कुणी म्हणेल, विवेकानंद होण्याआधीच्या नरेंद्राला फुटबॉल आवडत असे. पण कुणाकडून काय शिकावे, हे न कळण्यास संघ काही डावा नव्हे. हल्ली विवेकवादी संघाबद्दल जुन्या-जुन्या गोष्टी काढून उगाळत बसतात, तसे संघाने करणे शोभणारे नाही. विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीच्या आधारे अमेरिका जिंकले आणि इकडे संघाची मंडळी लत्ताप्रहाराचा विदेशी खेळ जवळ करीत आहेत. स्वदेशी जागरण मंचाच्या पदाधिकाऱ्यांनो, हे काय चालले आहे? तुमचे लक्ष आहे कुठे? सगळ्या आशा आता तुमच्यावर आहेत बरे..