आनंद, दुख या मानसिक अवस्था आहेत, या समजुतीतून आता बाहेर पडलेले चांगले! या दोन्हीही ‘भौतिक’ भावना आहेत, त्यांना ‘जडत्व’ आहे आणि ते दृश्यरूप असल्याने, त्याचे मोजमापही शक्य आहे. आनंदी माणूस त्याच्या पुष्ट देहयष्टीवरून तर दुखी माणूस त्याच्या खंगलेल्या देहावरून ओळखता येतो. म्हणूनच, आता आनंदाचा इंडेक्स मोजणे शक्य होणार आहे. म्हणूनच, महाराष्ट्राचा आनंदस्तर मोजण्याचा घाट राज्याच्या सरकारने घातला आहे. राज्याचा ‘सकल घरेलू आनंद’ (जीडीएच) मोजून प्रादेशिक आनंदस्तर निश्चित करण्याची व त्यानुसार अनुशेषाचे मोजमाप करून तो भरून काढावयाच्या उपाययोजनांचा अभ्यास करणेही शक्य होणार आहे. राज्याच्या मंत्रालयात वेगवेगळ्या प्रादेशिक आनंदस्तरांची मोजमापे बसवून त्यानुसार राज्याच्या जनतेची आनंदावस्था ठरविण्याकरिता सज्ज झालेले हे देशातील बहुधा पहिलेच सरकार आहे, त्यामुळे या प्रयत्नांस मुक्तकंठाने दाद द्यावयास हवी. आनंदाचे मोजमाप करणे शक्य नसते, असे उगीचच म्हटले जाते. आनंद हा भावनेचा आविष्कार असतो, त्यामुळे कोणत्याही एकाच बाबीसंदर्भात अनेकांचे आनंदस्तर भिन्न असू शकतात, असेही मानले जाते. काही अंशी ते खरेच आहे. सरकारच्या कोणत्याही एखाद्या निर्णयामुळे राज्याच्या विदर्भ कोपऱ्यात ज्या तीव्रतेने आनंदलहरी उमटतील, तेवढी त्या आनंदलहरींची तीव्रता पश्चिम महाराष्ट्रात जाणवणार नाही, हेही खरेच आहे. त्यामुळे, आनंदाचे समान वाटप अशक्य होऊन एका भागात आनंदाच्या अतिरिक्त लहरी तरी दुसरीकडे आनंदाचे अवर्षण अशी स्थिती निर्माण होऊ शकते. अनुशेषाचा जन्म यातूनच होत असल्याने, आनंदाचा अनुशेषही भविष्यात निर्माण होण्याची चिन्हे असतात. साहजिकच, अनुशेषग्रस्त भागांत आनंदाचे अतिरिक्त वाटप करण्याची जबाबदारीही शासनावर पडणार आहे, आणि त्याचे पुरेपूर भान शासनास असेल हे या निर्णयामुळे स्पष्ट झाल्याने राज्य शासनाच्या आनंदाच्या खात्याकडे कौतुकानेच पाहिले पाहिजे. येत्या काही दिवसांत मंत्रालयात ‘आनंदाचे खाते’ स्वतंत्रपणे कार्यान्वित होईल, अशा बातम्या आहेत. राज्य सरकारच्या निर्णयांविषयीचा जनतेच्या मनातील विश्वास हे आनंदाच्या मोजमापाचे सूत्र राहणार असल्याने, समतोल आनंदनिर्मितीची जोखीम उचलावयास राज्य सरकारने सिद्ध झाले पाहिजे, आणि सर्वाना आनंदाचे समान वाटप होईल याची काळजीही घेतली पाहिजे. नाही तर, विधिमंडळांच्या अधिवेशनांमध्ये, आनंदाच्या अनुशेषावर चर्चा झडतील, आणि अनुशेषग्रस्त भागांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलने उभारावी लागतील. राज्यात सर्वत्र आनंदाचे झोके झुलत आहेत, आणि जनता आनंदाच्या हिंदोळ्यांवरून जगण्याचा आनंद उधळत आहे, असे स्वप्न कधीपासून सारे पाहात आहेत. सरकारने आनंदमार्गाचा अधिकृत स्वीकार केला, तर कोण किती आनंदात हे तरी समजत राहील. तेव्हा हे करावेच!