मा. श्री. मनोहरजी पर्रिकरजी, मुख्यमंत्री, गोवा राज्य यांचे शतकोटी अभिनंदन करणे हे एक सभ्य नागरिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य समजतो. यापूर्वी ते भारताचे संरक्षणमंत्री म्हणून अतिशय कार्यरत होते. त्यामुळे संपूर्ण देश अल्पावधीतच संरक्षित झाला. परंतु दरम्यान गोवा असंरक्षित झाला. तो हातातून जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच माननीय पंतप्रधानांनी त्यांना गोव्याचे संरक्षणमंत्री म्हणून गोव्यात पुन्हा पाठविले. नंतर ते मुख्यमंत्री झाले. परंतु अभिनंदन याकरिता नाही. ते यासाठी, की मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी गोव्याचे संरक्षण हे जे आपले प्रधानकार्य त्याचे विस्मरण पडू दिले नाही. गोव्याच्या प्रतिमेचे, संस्कृतीचे, पर्यटन व्यवसायाचे आपणांस पुरेपूर संरक्षण करायचे आहे हे त्यांनी बरोब्बर ध्यानात ठेवले. रोज सकाळी उठून योगा करण्याचे फायदे हे असे असतात. तर मुद्दा असा, की गेल्या सत्तर वर्षांत गोव्याची प्रतिमा फारच खालावली होती. संस्कृती लयाला चालली होती. त्याचा परिणाम शेजारील महाराष्ट्रावरसुद्धा होऊ लागला होता. म्हणजे येथील सज्जन सज्जन माणसे गोव्यावरून येताना चक्क दारूच्या बाटल्या आणत होती. आता महाराष्ट्राचे असे, तर थेट गोव्यात काय घडत असेल? तेथील अर्थव्यवस्था ही तर पर्यटनावर आधारित. देशविदेशातून तेथे गोरेगोरेपान लोक येतात. ते कशासाठी येतात हे पर्रिकरजी यांना चांगलेच माहीत होते. ते गोव्यातील समुद्र, त्याच्या शेजारी ठेवलेले किनारे, तेथील सन्सेट नावाचा सूर्यास्त, नारळी-पोफळीची झाडे, तेथे राहणारी साधीभोळी माणसे हे सर्व पाहायला येतात. परंतु त्या पर्यटकांना काय दिसते, तर नुसता धिंगाणा. लोक चक्क मद्य पितात गोव्यात येऊन. हे बंद करायलाच हवे हे ओळखून पर्रिकरजी यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचा पहिला भाग म्हणून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी घालण्याचा विचार चालविला आहे. अत्यंत योग्य असा हा निर्णय आहे. लोक सार्वजनिक ठिकाणी पितात व िधगाणा घालतात. असार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास ते धिंगाणा घालणार नाहीत. शिवाय त्यामुळे त्या असार्वजनिक ठिकाणांचा व्यवसायही वाढेल. पर्यटनास प्रोत्साहन देणारा असाच हा निर्णय आहे. याचे यश पाहून कदाचित यापुढे मद्यपानास बंदीही घालण्यात येईल. त्याऐवजी दूध, ताक विक्रीची केंद्रे सुरू करता येतील. त्याकरिता गोव्यात गोमाता पालनाचा नवा व्यवसाय सुरू करता येईल. मग गोमूत्र विक्रीतूनही पैसे मिळतील. गोव्याच्या नावातील गो या शब्दाला तेव्हा खरा अर्थ येईल.. केवढी ही दूरदृष्टी. केवढे हे संस्कृती संरक्षण. (गो)व्वा पर्रिकरजी. या ‘सोबर’ निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदनच.