डोळा हा अवयवच धोकादायक. तो कधी झुकतो, कधी दिपतो, कधी अचानक उघडतो, तर कधी लागतो. काही काही नतद्रष्ट तर त्याचा वापर मारण्यासाठीही करतात. तो मारल्यानंतर कुणाला तरी लागणारच. ज्यांना तो लागतो त्या व्यक्ती कधी पापण्या लववून त्याचा स्वीकार करतात, कधी स्वत: लवून पादत्राणांस हात घालतात, तो भाग वेगळा. कधी कधी मात्र तो स्वत:च स्वत:ला लागतो. त्यात तसे काही गैर नाही. उलट रात्री मंचकावर पडल्या-पडल्या शांतपणे डोळा लागावा यासाठीच तर समस्तांची धडपड सुरू असते. धीरे से आजा  री अखियों में  निंदीया.. ही प्रार्थना अवतरली ती यातूनच. ज्यांचा असा बघता-बघता डोळा लागतो ते भाग्यवानच. पण डोळा मारण्याचे असो वा लागण्याचे काही नियम असतात. तो कुठेही, कधीही लागून चालत नसतो. तसे झाले तर लगेच ते लोकांच्या डोळ्यांवर येते आणि हसू होते. जसे ते चि. राहुलबाबांचे झाले. नको तेथे, म्हणजे संसदेच्या भर सभागृहात भर चर्चेत त्यांचा डोळा लागला. अगदी डुलकलेच ते. राहुलबाबा ही काही साधी असामी नाही. डोळे उघडे ठेवून देशाच्या कारभारावर नजर ठेवायची हे त्यांचे निहित कर्तव्य. पण त्यात ते चुकले आणि कॅमेऱ्याच्या डोळ्याने ते नेमके टिपून जनतेच्या डोळ्यांसमोर नेले. बरे तो प्रसंगही गंभीर चर्चेचा. त्या वेळी तरी राहुलबाबांनी निद्राराणीवर डोळे वटारायचे. पण त्यांनी तिला पापण्यांच्या मिठीत घेतले. सोनियांच्या नजरेचा धाक कमी पडत असल्याचे हे लक्षण मानावे की, संसदेतील दृष्टिआडच्या सृष्टीचा हा परिणाम असावा, हा प्रश्न मात्र आता सर्वाच्याच डोळ्यांत तरळत आहे. याचे कारण संसदेत झोपणारे राहुल हे काही पहिले नाहीत. याआधी भाजपच्या डीअर मिनिस्टर पं. स्मृती इराणींपासून काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंग यांच्यापर्यंत अनेकांचे मिटलेले डोळे या संसद भवनाने पाहिले आहेत. कधी कधी तर अख्खे सरकार झोपलेले त्याने पाहिले आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा हे तर निद्रादेवीचे वरदान घेऊनच आले होते. ही संसदीय झोपु योजना अशी पक्षनिरपेक्ष असेल, तर अशा गोष्टींकडे किंचित काणाडोळा करून त्याच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. मग कोणाच्याही लक्षात येईल की, अखेर तीही माणसेच असतात आणि संसदेतील रूक्ष-रटाळ भाषणांनी तीही कंटाळतात. लागते मग डुलकी. त्या चर्चामध्ये हा गुण नसता, तर लोकसभा टीव्ही हा पहिल्या क्रमांकाचा चॅनेल नसता बनला? तेव्हा ते टाळण्यासाठी संसदेतील वातावरण कसे उत्फुल्ल राहिले पाहिजे. घोषणा, गदारोळ, सभात्याग हे नित्याचे झाले पाहिजे. किंबहुना या अधिवेशनात त्याचा सहसा अभाव असल्यानेच राहुलबाबांच्या डोळ्यांवर ही वेळ आली. तसे करायचे नसेल, तर मात्र संसदीय कामकाजात शून्य प्रहराप्रमाणे निद्रा प्रहराचा समावेश केला पाहिजे. देशातील राजकारणाने सर्वसामान्यांच्या झोपेचे खोबरे तर झालेच आहे. किमान सामान्यांच्या या प्रतिनिधींना तरी शांतचित्ताने तेथे हक्काने झोपता येईल.