सारखे हिणवत असतात ना लोक मानवी हक्क कार्यकर्त्यांना, आयोगांना, आयोगांवरील अधिकाऱ्यांना.. की यांना मुसळ दिसत नाही, पण कुसळ दिसते. मानवी हक्कवाल्यांना बहुसंख्याकांच्या अडचणींची, मुख्य प्रवाहातील मंडळींच्या अडचणींची तमाच नसते म्हणून, ही नेहमीची तक्रार असते ना. मानवी हक्कवाल्यांना आपल्या देशातील उच्च प्रथा, परंपरा, संस्कृती यांचे वावडेच असते, अशी टीका होत असते ना सतत. तर आता हे घ्या त्या टीकेस सणसणीत उत्तर. हे उत्तर दिलेले आहे राजस्थान मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. प्रकाश टाटिया यांनी. विषय आहे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा.. बंधमुक्त सोयरिकीचा. खरे तर न्या. टाटिया यांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नामक गोष्टीचा बुरखा ज्या रीतीने फाडला आहे ते पाहता या असल्या संबंधांस ‘बंधमुक्त’ नव्हे, तर ‘बेताल सोयरीक’ असेच म्हणणे सयुक्तिक ठरेल. असल्या अनैतिक, अपवित्र गोष्टींना खरे तर थाराच असता कामा नये आपल्याकडील पवित्र, सद्भावी समाजात. ‘ही असली नाती म्हणजे एक प्रकारचा सामाजिक दहशतवादच..’ हे आम्ही म्हणत नाही, न्या. टाटिया म्हणत आहेत. न्या. टाटिया म्हणजे कुणी साधीसुधी असामी नाही. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते ते आणि आता राजस्थानच्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. इतकी मोठी पदे भूषवूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. इथल्या मातीतील कणाकणाशी त्यांचे नाते जुळलेले आहे. म्हणूनच या मातीतील माणसांच्या नैतिक कल्याणासाठी त्यांचा जीव तीळतीळ तुटत असावा. ‘अशी सोयरीक जुळलेली जोडपी ज्या भागांत राहतात तेथे एक दहशतच असते.. सामाजिक दहशतवादच तो’, असे टाटियांचे म्हणणे. किती नेमके निदान केले आहे त्यांनी. असे एखादे जोडपे ज्या इमारतीत राहत असेल तेथील इतर रहिवाशांना आपल्या मुलांना त्या जोडप्याच्या घरी कसे पाठवायचे बरे, असा प्रश्न पडतो. नीतिमूल्यांची चाड नसलेल्या अशा घरी आपला मुलगा गेला तर तोही बिघडू शकतो, अशी रास्त भीती लोकांना वाटते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या अशा जोडप्यांनाच मुले झाली तर त्या मुलांचे ‘नैतिक स्टेटस’ काय, हा महत्त्वाचा प्रश्नच की. म्हणूनच अशा नात्यांवर काही बंधने हवीत, मर्यादा हव्यात, असे न्या. टाटियांचे सांगणे आहे. बरोबरच आहे त्यांचे. बंधमुक्त सोयरिकीतील जोडप्यांनी किती काळ एकत्र राहावे, त्यांचे संबंध कसे असावेत, त्यांनी एकमेकांशी कसे बोलावे, त्यांनी इतरांशी कसे बोलावे अशा गोष्टींबाबत काही मर्यादा पाहिजेतच. वाटल्यास अशा जोडप्यांच्या घरांच्या दारांवरील पाटय़ांवर ‘सदरहू घरातील जोडपे तसले आहे’, असा उल्लेख करणे सक्तीचेही करता येईल. मग आसपासचे रहिवासी त्या घरांत आपली मुले पाठवणार नाहीत. त्यातून या सामाजिक दहशतवाद्यांच्या घरांत जाण्याचा धोका टळेल आणि समाजाचे पावित्र्यही कायम राहील.