23 August 2017

News Flash

‘रेड-ए-फेम’ मलिष्का!

ए मुंबई की रानी, ‘रेड-ए-फेम’ मलिष्का, तू मुंबैत परतून आलीस का?..

लोकसत्ता टीम | Updated: July 21, 2017 4:01 AM

ए मुंबई की रानी, ‘रेड-ए-फेम’ मलिष्का, तू मुंबैत परतून आलीस का?.. तुझ्या गाण्यानं लावलीया हितं वाट, आता बीएमसीनं घातलाय घाट.. तू गाऊन अमेरिका गाठली, हितं आमची मनं कशी फाटली.. तू गालाला पाडलीस खळी, आणि तुझ्या घरात गावली अळी.. डेंग्यूचा मच्छर पाळलास घरी, आता कचाटय़ात गावलीस बरी.. तुझ्या गाण्याचा भरवसा नाय नाय, अशी इज्जत काढतात काय काय?.. तुझ्या थट्टेचा भरलाय घडा, तुला बीएमसी शिकवेल धडा.. आमचा वाघोबा खवळलाय भारी, आता बघतोच तुला कोण तारी.. तुझ्या गाण्याचा बसला फटका, त्याच्या मनाला लागला चटका.. हितं मुंबईकर मनात हसला हसला, पण वाघोबा तुझ्यावर रुसला.. ए ‘मुंबई की रानी’ मलिष्का, आल्यावर पुन्हा तू बोल बोल, मुंबईच्या रस्त्याचा झोल झोल.. असतील खड्डे खोलखोल, पण एकही नाही गोलगोल.. खड्डय़ाला आकार नसतो, तुझा आरोप बेकार असतो.. तुझ्या गाण्यानं वाघोबा चिडला, पाय आपटत घरात रडला.. त्याच्या पिलांना आलाय राग राग, आता खेळत्याल तुझ्याशी वाघवाघ.. तू त्याचीच इज्जत काढली, मग वाघाची गुरगुर वाढली.. तुला दावतोय चांगलाच इंगा, आता धोक्याचा वाजतोय भोंगा.. तुला कळंना राजाच्या रीती, त्यो दावतोय जनतेला भीती.. आता घाबरून चांगलं बोल बोल, नको करू मुंबैची पोलखोल.. मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा हाय ना?.. मलिष्काच्या गाण्यावर नाय ना? तसं आत्ताच सांगून टाक ना.. तुझ्या मनात कायपण असलं, तरी वाकडं बोलणं कसलं.. जरी दावशील जादा खाज, तर तुझा बी उतरंल माज.. तू घेतलास वाघाशी पंगा, आता गावभर होणार दंगा.. लई वंगाळ वाघाचा राग राग, त्याच्यापुढं नरमून वाग.. अळ्या डेंग्यूच्या त्याच्या हातात, कशा अलगद सोडेल घरात.. तुला कोर्टाची नोटीस धाडतो धाडतो, तुझ्या घराचं बांधकाम पाडतो पाडतो.. तुझ्या गाण्यानं ‘मनोबल’ खच्ची खच्ची, आता बीएमसी आवळंल गच्ची गच्ची.. ए ‘मुंबै की रानी’ मलिष्का, तू मुंबैची नको करू पोल खोल, तू मुंबैवर सारं सारं गोड बोल.. हितं पाऊसच मोठा पडतो पडतो, तसा मुंबईकर नेहमीच रडतो रडतो.. त्याला बीएमसी काय बरं करणार, तुला एवढं कवा बरं कळणार.. तुझ्या गाण्यानं झोंबल्या मिरच्या, बुडाखाली ढिल्या झाल्या खुच्र्या.. तुझा कोण बोलविता धनी, ते वाघाला ठावं हाय मनी.. आम्ही केला किती जरी झोल झोल, तुझं काय बिघडतंय बोल बोल.. कुणी वाघाला नाही वाकवलं, तू मिनिटात करून दाखवलं.. आता वाघाला आलाय राग आणि म्याव म्याव करतुया वाघ.. आता जरा श्यानपणानं वाग.. त्या वाघाची ऐकून म्याव म्याव, तुला भेटलाय नवीन भाव भाव.. तो उभा पाठीशी जरी, तू सावध असलेली बरी!..

 

 

First Published on July 21, 2017 3:47 am

Web Title: rj malishka mocked bmc cut to notice for mosquitoes
 1. C
  Chetan
  Jul 21, 2017 at 2:13 pm
  I was waiting so much for Loksatta to come up with something on this issue. As always it's great!
  Reply
 2. शैलेश
  Jul 21, 2017 at 9:18 am
  का वाघाला उगाच डिवचताय... खरेच रागावेल हा आणि मग हाहाकार होऊन जाईल ... भयंकर उत्पात घडेल, कोण आहे रे तिकडे ... आमच्या राज्यात ( भले उपकार म्हणून का मिळालेली असेना !!) असे घडूच कसे शकते ... ते रस्ते आहेत त्यांच्ये गुणगान करायचे सोडून हा काय भलताच संशय ...खांडेकरांच्या पण घरी बघा रे जरा .. स्वछता करून या ...
  Reply