निवडणुकीच्या प्रचारामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंडा येथील प्रचारसभेत सत्ताधारी समाजवादी पक्ष, काँग्रेस व बसपवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचा विकास विरोधकांमुळेच रखडल्याचे सांगत येथे चोरीही लिलाव पद्धतीने होते. त्यासाठी टेंडर काढावे लागतात, असा टोला लगावला. इथे परिक्षेचे केंद्र सुरू केले तर सरकारी नोकरांना (बाबू) भरपूर पैसे मिळतात, असा आरोप केला.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी महाराष्ट्रातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशाची माहिती सभेत जमलेल्या नागरिकांना दिली. महाराष्ट्राने त्यांच्या राज्यातून काँग्रेसला संपवले आहे. त्यांनी भाजपला कौल दिला. आता तुम्ही द्या, असे आवाहन त्यांनी केले.

अखिलेश यादव यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. अखिलेश यादव हे ऑस्ट्रेलियात शिकायला गेले. पण माझ्या गोंडा येथील गरीब नागरिकांचे काय होणार याची मला चिंता आहे. अखिलेश यांचा शेतकऱ्यांवर राग आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यात १४ टक्क्यांपेक्षा जास्त विमा दिला नाही, असा आरोप केला. निवडणुकीच्या मागील चार टप्प्यात काय झालं आहे हे, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा चेहरा पाहिल्यानंतरच स्पष्ट होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीत एअरकंडिशनमध्ये बसून राजकारणावर चर्चा करणाऱ्यांना इकडे काय वादळ सुरू आहे, याचा अंदाज नाही. आपल्या देशात काहीही बोलणाऱ्यांची कमतरतानाही. दररोज नवीन खोटं बोलण्यात माहीर असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे, असे त्यांनी म्हटले.
मोदी यांनी या वेळी ओआरओपीचा (वन रँक वन पेनश्न) मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, यांना जवानांची समस्या काय आहे याची माहितीच नव्हती. जाता-जाता त्यांनी देशातील शूर जवानांची मस्करी केली. यापेक्षा जवानांचा अपमान होऊ शकत नाही.