ओक म्हणाले, ‘‘माझे वडील मला सांगायचे, ‘मनाचे समाधान हेच धन. समाधान मिळविण्यासाठी पैसा लागत नाही. नजर खाली ठेवावी लागते, वर पाहणं टाळायला पाहिजे. आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच्याकडं पाहावं, मग आपण उंचावर आहोत असं वाटतं. झोपडीत राहणाऱ्याकडं पाहिलं की आपला ४०० चौरस फुटांचा ब्लॉक महाल वाटतो. उगाच वरच्याकडं पाहाच कशाला, वर पाहायचं आणि आपण गरीब आहोत याचा खेद करत बसायचं व असमाधानी व्हायचं; हे सांगितलंय कोणी? मी वडिलांचे शब्द ध्यानी ठेवले आहेत.’’

‘‘मोकाशी, भारत सरकारनं फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर केला. त्या घटनेला कितीतरी आठवडे झाले. मोफत वाचनालयातील सर्व वृत्तपत्रे वाचून, आपण काहीतरी ठाम, पण चुकीचं मत बनवलं असणार. तुम्ही ते आम्हाला ऐकवलं कसं नाही?’’ पंचाऐंशी वर्षांच्या, ओक या बालपणापासूनच्या माझ्या मित्रानं मला विचारलं. ओकांच्या वाकडय़ा बोलण्याची मला सत्तरएक वर्षांची सवय आहे. ‘ठाम पण चुकीचं आहे.’ हे शब्द ऐकल्यावर परब हसले. त्याचं मला वाईट वाटलं. ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणणाऱ्या, परबांसारख्या संत प्रवृत्तीच्या व्यक्तीने आमच्याप्रमाणे वागता कामा नये.

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Cyber Crime
कंबोडियात पाच हजार भारतीयांवर सायबर अत्याचार, ५०० कोटींची फसवणूक, सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात!
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

मी शांतपणे म्हणालो, ‘‘मी सर्व वृत्तपत्रे वाचली. सर्व वृत्तपत्रे मोफत वाचनालयातच वाचता येतात. विकत घेऊन किती वाचाल? एकदोनच; मात्र सर्व वृत्तपत्रे वाचताना मी अर्थसंकल्पाची पानं पूर्णपणे गाळली. कोणत्या वस्तू स्वस्त होणार व कोणत्या महाग याबाबतची चौकट पाहिली. स्वस्त व महाग या वस्तूंपैकी एकही माझ्या कामाची नव्हती. मला पैसा, हा विषयच आवडत नाही, त्यात जेवढी वृत्तपत्रे तेवढी वेगळी मतं!’’

परबांनी दुजोरा दिला, ‘‘ठाम मत बनवायचं तर एकच वृत्तपत्र वाचावं त्यात एकच मत मुद्देसूदपणे मांडलेलं असतं. ते मत आपण आपलं म्हणून मांडायचं. मत संपादकाचे, ठामपणा आपला. व्यक्तिश: मी पैशाला महत्त्व देत नाही, अर्थसंकल्पालाही किंमत देत नाही. तुकोबा म्हणतात,

धन मेळवून कोटी। सवे न ये लंगोटी॥

पलंग न्याहाल्या सूपती। शेवटी गोवऱ्या संगती॥

तुका म्हणे राम । एक विसरता श्रम॥

कोटी कोटी रुपये मिळवाल, पण हे जग सोडताना, बरोबर लंगोटीही नेता येत नाही. पलंगावर गाद्यावर गाद्या बदलाल, पण शेवटी काय? गोवऱ्यांवरच जळावं लागणार. प्रभू रामाला विसरू नका, विसरलात तर श्रमच श्रम.’’

ओकांनी परबांना अडवलं, ‘‘सूपती म्हणजे गादी हा अर्थ कोठून आणलात?’’

परब जराही न गडबडता म्हणाले, ‘‘माझ्या आईनं मला सांगितला. ती कीर्तनं, निरूपणं, प्रवचनं, सर्व ऐकायची.’’

परबांच्या मातोश्री मराठी चार इयत्ता शिकल्या होत्या. बी. ए. झालेल्या ओकांना राहवलं नाही. ते म्हणाले, ‘‘मूळ संस्कृत शब्द आहे स्वापवत्. अर्थ आहे बिछाना, गादी त्याचं मराठी रूप आहे सूपती.’’

परब केवळ, ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणाले. म्हणजे परबांना ओकांचा अवघड शब्द मान्य नव्हता! कधी नाही ते मीही ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणालो. माझ्या मनाच्या ‘सूपतीवर’ ओकांचे ‘ठाम पण चुकीचे’ हे शब्द जागे होते!

मी मूळ विषयाशी आलो, ‘‘लग्न झाल्यावर, मी एका ठाम मताशी आलो. देशाचा अर्थमंत्री स्त्रीच हवी. सर्व मार्गी लागेल.’’

ओक व परब यांच्या चेहऱ्यांवर, एकाच वेळी आश्चर्याचं उद्गारचिन्ह व काहीही न समजल्यामुळं प्रश्नचिन्ह होतं. मी खुलासा केला, ‘‘लग्नापूर्वी माझा पगार मला एकटय़ाला सहज पुरत असे. लग्नानंतर व मुले झाल्यावर, पगाराचे पैसे आधी संपायचे व महिन्याचे बक्कळ दिवस बाकी उरायचे! खरं तर, महिना संपला व भरपूर पैसे शिल्लक आहेत असं घडायला हवं होतं. मी शहाणा झालो. पगार झाल्या झाल्या, मी पूर्ण पगार पत्नीला द्यायचो व म्हणायचो, ‘हे पैसे आणि हा तुझा संसार; तू सांभाळ.’ आणि काय? तिनं सांभाळलं की सर्व! म्हणून मी म्हणतो की स्त्रीलाच देशाचं अर्थमंत्रीपद द्या.’’

‘‘मोकाशी, वहिनींचं तर कौतुक आहेच, पण तुमचं जास्त कौतुक करायला हवं. संसार आपल्याला जमणार नाही हे तुम्हाला वेळीच उमजलं!’’ हे कोण बोललं असेल? ओकांचंच तोंड उघडं होतं.

परब म्हणाले, ‘‘मोकाशी, मी तुमच्याशी सहमत आहे. कोंडय़ाचा मांडा कसा करावा, काटकसरीनं संसार कसा निभावून न्यावा हे स्त्रियांना  जन्मत:च माहीत असतं.’’ मी खवचटपणे म्हणालो, ‘‘ओक, तुमच्या संस्कृतात पैसा – स्त्री याविषयी काही म्हटलं असेलच की!’’

ओक म्हणाले, ‘‘माझे वडील मला सांगायचे, ‘मनाचे समाधान हेच धन. समाधान मिळविण्यासाठी पैसा लागत नाही. नजर खाली ठेवावी लागते, वर पाहणं टाळायला पाहिजे. ‘अध: अध: पश्यत: कस्य महिमा न उपचीयते।’ (आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच्याकडं पाहावं, मग आपण उंचावर आहोत असं वाटतं. झोपडीत राहणाऱ्याकडं पाहिलं की आपला ४०० चौरस फुटांचा ब्लॉक महाल वाटतो.)

‘उपरि उपरि पश्यन्त: सर्वे एव दरिद्रति॥’ (उगाच वरच्याकडं पाहाच कशाला, वर पाहायचं आणि आपण गरीब आहोत याचा खेद करत बसायचं व असमाधानी व्हायचं; हे सांगितलंय कोणी? आपण राजवाडय़ाकडं पाहिलं की आपला ब्लॉक फार लहान आहे याचं दु:ख होणारच!) मी वडिलांचे शब्द ध्यानी ठेवले आहेत. अर्थसंकल्पामधील हजारो कोटी रुपयांचे आकडे मी पाहत नाही व त्यामुळे मी मनानं तृप्त राहतो.’

परब म्हणाले, ‘‘खोडसाळ मनाला समाधानी ठेवण्याचा तुमचा मार्ग उत्तम आहे, सोपाही आहे. तुकोबा मनाला उद्देशून म्हणतात : ‘काय काय करितो या मना। परि न आयके नारायणा। करू नये त्याची करी विवंचना। पतना नेऊ आदरिले॥ ओक, मन नको त्या विवंचना मागे लावते आणि आपली प्रतिष्ठापना अधोगतीत होते! धन महत्त्वाचं नाही, मनाचं समाधान हेच खरं धन.’’

ओक सांगू लागले, ‘‘निदरेष, अव्यंग तन म्हणजे धन, स्वच्छ विवेकी मन हे धन, टवटवीत यौवन हे धन, निरोगी जीवन म्हणजे धन. यामुळं पैसे या धनाचा मी विचारच केला नाही.’’

मला ओकांचं म्हणणं पूर्णपणे समजलं व आवडलंपण. मी घाईघाईनं म्हणालो ‘‘ओक, तुम्ही छान सांगितलंत. मला कळलं. आता संस्कृत सुभाषित सांगून माझा गोंधळ उडवू नका.’’

सारांशाने बोलायचं तर आम्ही तिघा आजोबांनी पैशाविषयीची आपली विरक्ती परस्परांना स्पष्ट शब्दात सांगितली. माझी छाती अभिमानानं फुलून आली. मी पैशाला तृणसमान समजतो ही भावनाच आपली उंची आकाशाएवढी वाढवते!

तेवढय़ात परब अपराधी स्वरात म्हणाले, ‘‘खरं म्हणजे मीही अर्थसंकल्पाकडं पाहायलाच नको होतं. पण मला राहवलं नाही. मी माझ्यापुरतं बजेट पाहिलं. अडीच लाख ते पाच लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स फक्त पाच टक्के आहे. त्याचा मला फायदा मिळणार. आज माझी वेळ नाही तरी मी चहाचे पैसे देईन.’’

मी ओरडलो, ‘‘परब, तुम्ही चांगलेच

संत आहात! ‘पलंगावर गाद्या घालून आज झोपाल, पण शेवटी गोवऱ्यांवरच जळावं लागणार हे तुम्ही आम्हाला सुनावणार; पण पैशाची व्यावहारिक ऊब तुम्ही ओळखून आहात!’’

परबांना त्यांची चूक समजली. ओकांप्रमाणे, माझ्यासारखे ते पैशाबाबत उदासीन नव्हते. ते ‘विठ्ठल! विठ्ठल!’ म्हणत राहिले.

ओक मुद्दय़ाचं बोलले, ‘‘परब, एका चहावर तुमची सुटका नाही. ओळीनं दोन दिवस तुम्हाला दंड म्हणून चहा द्यावा लागेल.’’

परबांनी ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणणं न थांबवता होकारार्थी मान हलवली.

पैशाविषयीच्या विरक्तीच्या विचारामुळे फुगलेली माझी छाती या अनपेक्षित लाभामुळे, पुन्हा फुगण्याची खटपट करू लागली.

भा.ल. महाबळ chaturang@expressindia.com