संतसाहित्य आणि तत्त्वज्ञान परंपरेचा अभ्यास 

‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’ असे म्हणत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा गजर करीत दरवर्षी नित्यनेमाने विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी जाणारी पंढरीची वारी परदेशी अभ्यासकांच्या अभ्यास आणि संशोधनाचा विषय ठरली आहे. अमेरिका, जपान, चीन, जर्मन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, बेल्जियम अशा वेगवेगळ्या देशांतील अभ्यासक श्रीविठ्ठल, पंढरपूर, वारकरी संप्रदाय आणि वारीची परंपरा यांचा अभ्यास करत त्यांचे संशोधन त्यांनी आपापल्या भाषेत प्रकाशितही केले आहे.

स्टुटगार्ड येथील जर्मन संशोधक प्रा. कॅथारिना किन्ले यांनी  ज्ञानदेवांच्या अभंगांचा चिकित्सक अभ्यास ग्रंथरूपाने प्रकाशित केला आहे. त्यांनी संस्कृत आणि चिनी भाषेचा तौलनिक अभ्यासही केला आहे. रशियाच्या प्रा. इरिना ग्लुश्कोव्ह या श्रीविठ्ठलाच्या दैनंदिन उपचारांचा अभ्यास करत आहेत. हे नित्योपचार त्यांनी चित्रितही केले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या अभंगांचे त्यांनी रशियन भाषेत अनुवाद केले आहेत. प्रा. ग्लुश्कोव्ह यांची महाराष्ट्राच्या रशियातील सांस्कृतिक दूत (कल्चरल अ‍ॅम्बेसिडर) म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली आहे. प्रा. इवावो शिमा या जपानी अभ्यासकांनी ज्ञानेश्वरीच्या सहा अध्यायांचे जपानी भाषांतर केले असून श्रीविठ्ठलावर लेखही लिहिले आहेत.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील ख्रिश्चन नोवेट्स्की यांनी संत नामदेव, महानुभाव आणि ज्ञानेश्वर यांच्या तत्त्वज्ञानावर ग्रंथ लिहिला आहे. फादर जी. ए. डलरी या फ्रेंच संशोधकांचे ‘ दि किल्ट ऑफ विठोबा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी तुकोबांच्या १०२ अभंगांचे फ्रेंच भाषांतर केले आहे. तर, शालरेट  वोदविले या विदुषीने ज्ञानदेवांच्या हरिपाठाचे फ्रेंच भाषांतर केले आहे. त्यांनी जर्मन भाषेत संत चोखामेळा यांचे चरित्रही प्रसिद्ध केले. डेन्मार्कच्या डॉ. एरिक सँड यांनी पायी वारी करून िदडय़ांची परंपरा, पांडुरंगमाहात्म्य, भक्त पुंडलिक, गोपाळपूर याविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.

पंढरपूरचा श्रीविठ्ठल, वारकरी संप्रदाय, वारीची परंपरा, संत मांदियाळी याविषयी परदेशी अभ्यासकांना कुतूहल आहे. आपली जिज्ञासा अभ्यास आणि संशोधनातून परिपूर्ण करण्याची त्यांची वृत्ती कौतुकास्पद आहे. हे सारे अभ्यासक जगाच्या पाठीवरच्या विविध देशांचे प्रतिनिधित्व करतात. पण संस्कृत-मराठी भाषा अवगत करून, भरपूर प्रवास करून, आधुनिक साधनांचा विपुल वापर करत त्यांनी आपल्या परंपरा, तत्त्वज्ञानाचे केलेले विश्लेषण लक्षणीय आहे, अशी माहिती संतसाहित्याचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.