तुकोबांच्या पालखी सोहळ्यात उत्साही धावा

आषाढी यात्रेसाठी मैलोन्मैल पायी चालत निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रमुख पालख्यांसह इतर सर्व संतांच्या पालख्या शनिवारी पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या असून आता पंढरपूर अगदी जवळ आल्याचा आनंद अवघ्या वारकऱ्यांना वाटत आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वाचीच मने आसुसली आहेत. त्याची प्रचिती ठाकूरबुवा समाधीजवळ माउलींच्या पालखी सोहळ्यातील तिसऱ्या गोल रिंगणात आली. टाळ-मृदुंगाच्या तालावर ज्ञानबा-तुकारामाचा गजर आणि विठ्ठलनामाने वातावरण भक्तीच्या उच्च शिखरावर पोहोचले होते. टप्पा येथे संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव या दोन्ही बंधूच्या भेटीचा सोहळा अवर्णनीय ठरला.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी वेळापूर येथील मुक्काम हलवून पंढरपूर तालुक्यात दाखल होण्यापूर्वी माळशिरस तालुक्यात ठाकूरबुवा विहिरीजवळ पोहोचला. तेथे सोलापूर जिल्ह्य़ातील तिसरे रिंगण पार पडले. तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील मुक्काम हलवून माळखांबी येथे दाखल झाला. तेथे विसावा झाल्यानंतर पुढे सायंकाळी टप्पा येथे पालखी सोहळा पोहोचला. तेथे पारंपरिक ‘धावा’ कार्यक्रमात भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते.

माउलीचा पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता वेळापूरचा मुक्काम हलवून पुढे मार्गस्थ झाला. नंतर दोन तासांनी पालखी सोहळा उघडेवाडी येथे पोहोचला. तेथील ठाकूरबुवा समाधीजवळ आखून ठेवलेल्या रिंगणात एकामागून एक दिंडय़ा येत होत्या. माउलींची पालखी दाखल झाल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करून मंडपात विसावली. प्रत्येक दिंडीतील पताकाधारी माउलींच्या पालखीच्या सभोवती उभे होते. त्यानंतर माउली पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंदवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रिंगणाची पाहणी केली. तोपर्यंत माउलींचे दोन्ही अश्व मैदानावर येऊन थांबले होते. राजाभाऊ चोपदार यांनी इशारा करताच गोल रिंगण सुरू झाले आणि दोन्ही अश्वांनी चौखुर उधळत एक रिंगण पूर्ण केले. त्यापाठोपाठ वीणेकरी, मृदुंगधारी, पखवाजधारी, मस्तकावर तुळशी वृंदावन धरलेल्या महिलांनी धावत रिंगण पूर्ण केले तेव्हा त्याठिकाणी एकच जल्लोष सुरू झाला. टाळ-मृदुंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा आणि ज्ञानबा-तुकारामाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले. वारकऱ्यांनी उडीच्या खेळासह उंच मनोऱ्यांचे खेळ, फुगडय़ा खेळणे व धावणे अशा खेळात वारकरी तन-मन विसरले होते. महिला वारकरीही फेर धरून आनंदाने नाचू लागल्या. झिम्मा- फुगडय़ांचा खेळ बराच रंगला होता.

चैतन्यदायी वातावरण झालेल्या गोल रिंगणानंतर दुपारी संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा पुढे तोंडले-बोंडले गावाजवळ नंदाचा ओढा येथे येऊन विसावला. त्याठिकाणी दुपारचे भोजन झाले. त्यासाठी एकाचवेळी हजारो वारकऱ्यांच्या पंगती बसल्या होत्या.

जेवण उरकल्यानंतर पालखी प्रमुखांनी पुढे जाण्यासाठी तयार राहण्याचे संकेत दिले. त्याप्रमाणे सर्व वारकऱ्यांनी शिस्तीने पुढची पायवाट सुरू ठेवली. पालखी सोहळा टप्पा येथे आला, तेव्हा संत ज्ञानोबा व संत सोपानकाका या दोन्ही बंधूंच्या भेटीची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. दोन्ही बंधूंच्या भेटीचा सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहताना वारकरी भारावून गेले होते. माउली व सोपानकाकांच्या बंधुप्रेमाचे क्षण नेत्रात साठविताना अनेकांचे नेत्र पाणावले होते. संतबंधू सोपानकाकांची भेट घेतल्यानंतर माउलींचा पालखी सोहळा पुढे भंडी शेगाव येथे मार्गस्थ झाला.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सकाळी बोरगाव येथील मुक्काम हलवून माळखांबी येथे येऊन विसावला. तेथे वारकऱ्यांनी न्याहरी उरकली. ग्यानबा-तुकारामाचा गजर करीत विठुनामाचा घोष करीत पालखी सोहळा हळूहळू पुढे मार्गस्थ झाला. टप्पा येथे दुपारी उशिरा पोहोचल्यानंतर तेथे वारकऱ्यांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. टप्पा येथे उंच भागावर वारकऱ्यांनी धावत जाण्याचा खेळ खेळला. यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही तेवढय़ाच उत्साहात धावा केल्या. धावांचा खेळ खेळताना अवघ्या वारकऱ्यांचे भान हरपले होते. पंढरपूर समीप आल्याचे संकेत धावा करताना मिळत होते. त्याचा आनंद काही वेगळाच होता. सायंकाळी तुकोबांचा पालखी सोहळा पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी पोहोचला.