उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम, शहराच्या चार बाजूला चार दरवाजे- वरतेज, खार, रुआपरी, धोधा- कोणत्याही दरवाजातून भावनगरच्या वास्तूत येता येते. दिवाणपरा भागात निवासी विभाग, दाणापीठ येथे व्यावसायिक विभाग, बंदर रोड येथे औद्योगिक विभाग अशा भौगोलिक रचनेने आजही भावनगर त्याच दिमाखात उभे आहे.

भावनगर हा सौराष्ट्रातील पाचव्या स्थानावरचा मानाचा जिल्हा. भावनगर जिल्हाच एक वास्तू आहे. ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. राजा भावसिंहजी यांनी ती वसविली.

गोहिल वंशाच्या या राजांनी, वारसदारांनीही भावनगरवर अतोनात प्रेम करून भावनगर वास्तूला आगळेवेगळे स्थान निर्माण करून दिले आहे. राजा तख्तसिंहजी व शेवटचा राजा कृष्णकुमार यांचे कार्य भावनगरची जनता आजही लक्षात ठेवून आहे. स्वातंत्र्यानंतर राजा कृष्णकुमार यांनी महात्मा गांधींच्या चरणी आपली राजवट अर्पण केली.

वीरता, धीरता, गंभीरता, सृजनता, सभ्यता, सांस्कृतिकता असे भावनगरचे वर्णन करता येते. भावनगर समन्वयाची गाथा आहे.

उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम, शहराच्या चार बाजूला चार दरवाजे- वरतेज, खार, रुआपरी, धोधा- कोणत्याही दरवाजातून भावनगरच्या वास्तूत येता येते. दिवाणपरा भागात निवासी विभाग, दाणापीठ येथे व्यावसायिक विभाग, बंदर रोड येथे औद्योगिक विभाग अशा भौगोलिक रचनेने आजही भावनगर त्याच दिमाखात उभे आहे.

राजेशाही थाटाची ही वास्तू अतिशय योजनाबद्ध रीतीने तयार केलेली आपल्याला आढळते. त्याची स्मृती, प्रतीके आजही दिमाखाने आपल्याला राजवंशाची आठवण करून देतात. भावनगरच्या स्टेशनवर उतरल्यानंतर प्रथम दरबार गड ही वास्तू दिसते. राणीवसा राहत होता, असे सांगितले गेले. हत्ती जातील एवढाले मोठे दरवाजे, त्यावरील दगडी गवाक्ष, अवाढव्य अशी ही वास्तू तितक्याच चांगल्या, उत्तम स्थितीत आढळते.

भावनगरमध्ये अडीच किलोमीटर लांबीचा व्हिक्टोरिया पार्कचा नजराणा लाभला आहे. इंग्रजी राजवटीच्या प्रतीक खुणा असलेले सिंह भल्यामोठय़ा लोखंडी दरवाजावर दिसतात. सकाळ, संध्याकाळ चालणाऱ्याला ही बाग मनोमन उत्साहित करते. एका बाजूला दाट झाडी, विविध पक्ष्यांचे कुंजन, पाण्याचे झाड, नितळ पाण्याचा मोठा तलाव, चालणाऱ्याच्या साथीला असेल तर! म्हणूनच भावनगर ही एक शांत वास्तू आहे. इथे अजूनपर्यंत मारामारी, भांडाभांडी मी बघितली नाही. व्हिक्टोरिया पार्क तर आहेच, पण पील गार्डन, सरदार बागसुद्धा प्रसिद्ध आहे.

गौरीशंकर तलाव म्हणजे बोर तलाव. कोजागिरी पौर्णिमेला उंधियो, दहीवडे सर्वत्र मिळतात. स्वत:चे डबे घेऊन यायचे, या चांदण्या रात्री बोर तलावापाशी. हा पिकनिक पॉइंट आहे.  तलाव व शंकराचे मंदिर यामुळे हा पॉइंट सजला आहे.

भावनगर वास्तूची वस्ती ६ लाखांच्या वर आहे. स्त्री साक्षरतेचा दर ४४ टक्के असून १६६ अंगणवाडय़ा आहेत. प्राथमिक शाळा ९३ आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा १९ असून ३ इंजिनीअरिंग कॉलेज व १ मेडिकल कॉलेज आहे. अन्य कॉलेजही २८ आहेत. दक्षिणामूर्ती ही १०६ वर्षांची गिजुभाई बधेका यांचे नाव कोरलेली शाळा आपली शान टिकवून आहे.

शामळदास कॉलेज- कला महाविद्यालय अत्यंत महत्त्वाचे महाविद्यालय. महात्मा गांधी इथे शिकले आहेत. याचा पुरावा क्रिसेंट सर्कलजवळ असलेल्या गांधी स्मृतीमध्ये गांधी दर्शनी आहे, त्यात मिळतो. २१२ चित्रे असलेली ही दर्शनी दिमाखात गांधीजींच्या जीवनचरित्राचा परिचय करून देते. इथे आपल्याला त्या कॉलेजमधील हजेरी प्रत मूळ स्वरूपात बघायला मिळते.

दोन-तीन घुमट असलेली अलुरिया चौकात दिसणारी ही जुनी आल्फ्रेड शाळा. आता तिचे नाव शांतीलाल शहा असे आहे. अत्यंत पुरातन म्हणजे भावनगर स्थापन झाल्यापासून जगदिशाचे मंदिर आहे. आजही सकाळी १०.३० वाजता हंडी फुटण्याचा ‘चमत्कार’ बघण्यासाठी त्या छोटय़ा देवळात अनेक जण येतात. त्या देवळापासून थोडय़ा अंतरावर जुनी कन्याशाळा आहे.

कन्याशाळेवरून सरळ दिवाणपरा रस्त्यावर आपल्याला बार्टन वाचनालय आढळते. टॉवर असलेली ही इमारत १५० वर्षांपूर्वीची आहे. तख्तसिंहजी महाराज आणि त्या वेळचे राजकीय एजंट कर्नल बार्टन यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांची आठवण राहावी म्हणून हे बार्टन वाचनालय.

गांधी स्मृती इमारतीत तळमजल्यावर आपण बार्टन म्युझियम बघायला जाऊ शकतो. गांधी स्मृती याचे शिलारोपण १५ जानेवारी १९४८ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, पण १९५५ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केले. गांधीजींची रक्षाही इथे आणली गेली होती.

भावनगरवर महात्मा गांधींचे विशेष प्रेम होते. दक्षिण आफ्रिका सत्याग्रह आंदोलनात महात्मा गांधींना भावनगर रियासतने मदत केली आहे. १९१५ साली गोखले स्मारक निधीसाठी महात्मा गांधींनी इथल्या पुरातन जशोनाथ मंदिरात व्याख्यान दिले होते. हे मंदिर तलाव या भागात आपल्याला बघता येते.

बार्टन म्युझियममध्ये काठेवाडमधील नाणी, स्टॅम्प, विविध शस्त्रास्त्रे, पुतळे, लोककला (यात मण्यांचे तोरण, कलश) ठेवले आहे. लक्ष वेधून घेणारा तांब्याचा बंबासारखा दिसणारा राजेशाही थाटाचा अजस्र Big Metal Dowry Box पाहायला मिळतो. लहान आकारातील मात्र खुद्द राजवाडय़ातदेखील पाहायला मिळतो. समोरच्या दालनात, राणीवसा वापरत असलेला आयताकृती नक्षीदार आरसा ठेवला आहे व नक्षीदार मोठा देव्हाराही.

गांधी स्मृतीमध्ये पहिल्या मजल्यावर मोठे वाचनालय आहे. निवृत्त जनांचे भावनगर असे भावनगरचे वर्णन करतात, ते खोटे नाही. वाचनालय गुजराती भाईंमुळे फुललेले असते. अनेक गुजराती नियतकालिके आणि लाखाच्या वर असलेली ग्रंथसंपदा. क्रिसेंट सर्कलपाशी आल्यावर गांधी स्मृतीची वास्तू नजरेत भरतेच, पण तिथेच असलेल्या सरदार स्मृतीवरही आपले लक्ष जाते.

स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही भावनगरची ऐट कमी झालेली नाही. भक्तिप्रेमी जनता इथल्या मंदिरांवर बेहद्द प्रेम करते. मंदिर, देरासर, गुरुद्वार, चर्च, मशीद उभी आहेत.

शंकराचे मंदिर राजा तख्तेश्वरसिंहजी यांनी स्थापन केलेले. वळण-वळसे घेत अशा उंचीवर पोहोचतो की सर्वसंपन्न भावनगरचे दर्शन होते.

प. पू. संतश्री हरिहरमुनी महाराजांच्या कृपेमुळे स्थापन झालेल्या ॐ श्रीराममंत्र मंदिर ट्रस्ट यांचे सामाजिक कार्य दखल घ्यावी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आहे. राममंत्र मंदिर, अक्षरवाडीचे स्वामीनारायण मंदिर (यांचीही शाळा), झांजीबार हनुमान, १३५४ मधील माळनाथ मंदिर (जंगलात लपलेले).

गौतम ऋषींनी स्थापन केलेले गौतमेश्वर शंकराचे मंदिर प्रचंड खडकाखाली आहे. गोपनाथ येथे समुद्रकिनारा असून पुरातन कोरीव मूर्ती असलेले शिवमंदिर आहे. प्रसिद्ध संत नरसी मेहता यांची संगमरवरी मूर्ती दिसते. भल्यामोठय़ा छत असलेल्या हॉलमधून आपण लांबवरचा निसर्ग, समुद्र डोळ्यांत साठवून ठेवू शकतो. इथे काठेवाडी जेवणाची उत्तम व्यवस्था आहे.

पाच पांडवांनी पाच शिवपिंडी स्थापन केलेली  सर्वात वैशिष्टय़पूर्ण जागा म्हणजे ‘निष्कलंक महादेव’. भरती असल्यास फक्त झेंडय़ाचे दर्शन घ्यावे, ओहोटी असल्यास मुलायम गालिचावर चालण्याचा अनुभव घेत आपण पिंडीपर्यंत पोहोचतो.

गोळीबार हनुमान असे ऐकताच हसू येत होते. गोळ्या देतो की काय? पण लोककथेनुसार शत्रूला पळवून लावण्यासाठी स्वत:च्या शरीरातून गोळ्या झाडणारा हा हनुमान.

भावनगरवासीयांचे हृदय असलेली, जिचे वाहन  मगरआहे अशी खोडियार माता. भाविक लांबून लांबून चालत येतात. सुंदर परिसर. एकदा तरी दर्शन घ्यावेच लागेल. कारण कथेनुसार राजाने मागे वळून पाहिले आणि वेशीवर थांबलेली ही माता. रुआपरी देवीबाबत हीच लोककथा आहे. हे मंदिर पुरातन समुद्रापाशी आहे.

तळाजापाशी असणारे जैन मंदिर, जैन गुफा उंच डोंगरमाथ्यावर आहेतच. पण पालिताणा येथे जैन धर्माचे पवित्र ठिकाण आहे.

सुदाम्याने स्थापन केलेले सांदिडा महादेव मंदिर तिथल्या खास पेढय़ाने लक्षात राहिले. दारात मोठा नंदी आहे. बापा सीताराम इथले संत. बगदाणा येथे त्यांचे सुंदर मंदिर असून गुरुपौर्णिमेला मोठा उत्सव होतो. गावातसुद्धा बापा सीताराम यांचा फोटो असलेल्या ‘मदुली’ जागोजागी दिसतात.

सर्वात मोठे उद्योग जहाज ब्रेकिंग, हिरा उद्योगात सुरत नंतर भावनगरचा क्रमांक लागतो. जहाज ब्रेकिंग बघण्यासाठी अलंग येथे पोहोचलो. १७२ प्लॉट असलेला अवाढव्य उद्योग. आशियातील जुनी झालेली जहाजे येथे येतात. पण लोखंड वितळवून पुन्हा त्याच्या कांब्या करणारा एक अजस्र कारखाना बघायला मिळाला.

राजा कृष्णसिंग हे भावनगरचे शेवटचे राजे. त्यांचे वारसदार आहेत. पण राजवाडा आता नीलमबाग पॅलेस हॉटेल म्हणून परिचित आहे. राजवाडय़ाच्या आत विविध पक्ष्यांची सुरेख चित्रे दिसतात. राजवंशीय अनेक वस्तू इथे आहेत. वास्तूही भावनगरला देखणेपणा आणते.

लेखाच्या शेवटी भावनगरमध्ये दिसणारी सर्कल, त्याभोवती असणाऱ्या बागा यांच्यासंबंधी सांगावेच लागेल. क्रिसेंट सर्कलजवळच गांधी स्मृती असून इथे ही मोठी बाग आहे. विश्वकर्मा सर्कलमध्ये विश्वकर्माची प्रतिकृती आहे. जशोनाथ सर्कलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून मोठी बाग आहे. अखिलेश, रुपाणी, मेघाणी, विराणी अशी नावे आहेत.  शिवाजी सर्कलला छान कारंजे आहे. प्रत्येक सर्कलजवळ अशी बाग व बसायची सोय आपल्याला दिसते.

निवृत्त लोकांचे गाव असे भावनगरचे दुसरे नाव

आहे. या वास्तूमधील भूमिगत गटारे सर्वत्र नावाजली जातात. भावनगरची आखणी अत्यंत दूरदृष्टीने, शिस्तबद्ध रीतीने केलेली आहे. म्हणूनच भावनगरचे महत्त्व आहे. आपल्यालाही या वास्तूत राहताना आपलेपणा वाटतो.

दीपाली कात्रे dkkata.katre@gmail.com