जाणाऱ्या गणपतीला बघून तिचे डोळे भरून यायचे. तिच्या केसांवरून हात फिरवत आजी म्हणायची, ‘‘अगं येणारा माणूसही कधीतरी जातोच, त्याचीच उजळणी गणेशाच्या आगमनाने आणि विसर्जनाने होते. पण पुन: परतही तो येतोच. शिवाय जाताना तो स्वत:चं काही ठेवूनही जातो. त्याची प्रसन्नता, शांती, समाधान मांगल्य.. आहे ना इथेच!

तसे तिचे आजोबा चांगलेच सधन. ठाकूरद्वार नाक्यावर त्यांचं एक टोप्यांचं आणि एक शिवणकामाचं दुकान. सर्वकाही अगदी स्वकष्टाचं. त्यामुळे थोडा अहंकाराकडे झुकणारा अभिमान! सर्वोत्तम तेच खरेदी करायचं ही वृत्ती! पण राहायचे मात्र चाळीत.

चाळ म्हणजे नेहमीसारखीच! लांबलचक आगगाडीसारखी. मध्यभागी जिना आणि त्याच्या दोन्ही बाजूंना १२/१२ बिऱ्हाडं. मागच्या बाजूच्या गॅलरीच्या अगदी टोकाला सार्वजनिक शौचालय आणि जिन्यासमोरच सार्वजनिक नळ. तिथेच रामागडय़ांचं धुणं-भांडी चालूच असे. जिना त्याला ‘दादर’ म्हणत. याच्या पायऱ्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या. काही ठिकाणी जास्त झिजलेल्या, त्यामुळे पायरी उंच-सखल. जिन्याचे कठडेही तसेच. चाळीला कुठे कुठे टेकू लावलेले.

प्रत्येकाच्या खोल्याही २/२ च्याच. पुढची खोली थोडी मोठी. तिचे कपाटं वगैरे ठेवून २ भाग केलेले. त्यामुळे आडोशाचा भाग बेडरूम म्हणून वापरला जाई आणि त्याच्यापुढे स्वयंपाक खोली. तिला बसायची ओटी. तिच्या लगत मोरी. तिच्या कट्टय़ावर हंडे-कळशा. नळ लावलेलं एखादं पिंप. कारण पाणी दिवसभरात एकदाच यायचं. मागल्या पुढल्या बाजूला अरुंद गॅलरी. पण मागच्या गॅलरीत भिंतीला टेकवून प्रत्येकानेच काहीतरी सामान ठेवलेलं असे. माणसं खूप, जागा लहान आणि २-३ पिढय़ा एकत्र नांदत म्हणून सामानाची गर्दी!

चाळ तशी म्हातारीच! अगदी पाऊणशे वयमान, पण एक मोठाच चमत्कार होई. चाळ अचानक देखणी दिसू लागे. श्रावण येताच ‘गणपती’चे वेध लागत. शक्य असेल तशी थोडी फार रंगरंगोटी केली जाई. दिवाळीत एकसारखे कंदील लावून चाळीची एकता दाखवली जाई. पण गणपतीची सजावट प्रत्येकाच्या मनाप्रमाणे.

इकडे तिची सासरी घालमेल होई. तिला आजीचं घर सारखं डोळ्यांसमोर दिसायला लागायचं. ‘यावर्षी नवीन जागी गणपती बसवू या’ असं सगळे कसं म्हणत असतील, मग सगळे कोपरे, चारही भिंतींचा विचार होऊन दरवर्षीचीच जागा नक्की झाली असेल. तिला मनातच खुद्कन हसू येई, पण ते चेहऱ्यावर चमकेच. मग तिच्या सासूबाईही मान डोलवत स्वत:शीच हसत आणि म्हणत, ‘‘सूनबाईला आजोळ दिसायला लागलंय.’’

घरातलं काही सामान शेजारी हलवलं जाई तर काही कॉटखाली सारलं जाई. तीच खोली अचानक मोठी प्रशस्त वाटायला लागे.

खरं तर आनंदमामा लहानपणी खूप आजारी पडल्यामुळे हा नवसाचा गणपती आजीने मागून घेतला होता. तो बहुतेक इतरांनाही पावतो अशी समजूत असल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याकडे अनोळखी माणसंही साकडं घालायला येत. तर काही जण आपलं मागणं मान्य झालं म्हणून नवस फेडायला येत. त्यामुळे आजोबांचा गणपती म्हणून तो चार लोकांत प्रसिद्ध होता.

‘इको फ्रेंडली’ पर्यावरण हे शब्द अस्तित्वात नसल्याच्या त्या काळात सगळी आरास फुला-पानांचीच असे. गणेशमूर्ती शाडूची असे.

मग आजीचं पेन्सिलने लिहिलेलं पत्र येई. ‘‘उगाच घाईघाईने कामासाठी म्हणून येऊ नकोस. घरात सुना आहेत. तू माहेरवाशीण आहेस. घरी काही अडचण नसेल तर वडिलधाऱ्यांना विचारून चार-आठ दिवसांसाठी ये. लगेच जायची घाई करू नये.’’

पत्र आल्यावर ती जशी अधांतरीच चालायला लागे. सासरची परवानगी असेच. मग ती सासूबाईंना सांगे, ‘‘आई सुभद्रेला निरोप पाठवा केवडा घेऊन ये म्हणाव.’’

ती ठाण्याहून केवडा आणि प्राजक्ताची फुलं ओलसर फडक्यात, केळीच्या पानात सैलसर बांधून नेई. मग त्या केवढय़ाचा नुसता मान-सन्मान केला जाई. गणपतीच्या मागे हिरव्यागर्द पानांची पाश्र्वभूमी असे. त्यावर केवडय़ाच्या अगदी आतल्या छोटय़ा पाती सूर्यकिरणांसारख्या मागच्या बाजूंनी मांडल्या की मूर्तीभोवती प्रकाशाचं वलय भासायचं. सगळेजण वेगवेगळ्या कोनांतून हनुवटीवर हात ठेवून म्हणायचे, ‘‘आत्ता खरं तेज आलं मूर्तीला. मग तिला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटे. धाकटी मामी आणि तिच्या हाताशी ३-४ मुली. मुली केवडय़ासारख्या आकाराच्या पट्टय़ा काढून त्यांना त्रिकोणी आकार देत. कार्डपेपरला चंद्रकोरीसारखा आकार देऊन त्यावर मामी ते नाजूक त्रिकोण शिवून त्याची वेणी बनवत असे आणि मग त्या वेण्या बायकांच्या आंबाडय़ावर विराजमान व्हायच्या. काहींचे चौफुले बनवले जात आणि काही गोलाकार कार्ड पेपर कापून त्याला चांदी लावली जाई आणि त्यावर केवडय़ाच्या पातीचे त्रिकोण जडवून राखडय़ा बनवल्या जात आणि भरत नाटय़म्च्या राधेसारख्या मुलींच्या लांबसडक वेण्यांवर उतरत्या क्रमाने लावल्या जात. मग तो केवडा मिरवत त्या शेजारी-पाजारी आमंत्रणाला जात त्या एक सुगंधी झुळूक बनूनच. उरलेल्या केवडय़ाची पाती आल्या गेल्यांना दिल्या की त्या त्या पातीला वळवून, पातीचा टोकदार भाग वर करून आकडय़ाने अंबाडय़ात खोचत. केवडा गिरगावात जरा अपूर्वाईचा होताच, पण गणपतीच्या दिवसात खूप महागही मिळे. त्यामुळे आपण ठाण्याला राहतो हे तिला भाग्याचं वाटे.

मध्येच आजी तिच्याकडे अगदी प्रेमळ नजरेनं पाहायची. त्यात हे सगळं सुख हिच्यामुळे शिगेला पोहोचलं हा एक कृतज्ञतेचा धागाही मिसळलेला असायचा.

शिवाय फुलबाजारातून आणलेली फुलंही असत, जास्वंद, तुळशीपत्र, दुर्वा आणि सुवासिक फुलं मोगऱ्यासारखी. काहीजणी त्यांच्या माळा-गजरे बनवत. त्या गणपतीच्या मागच्या खिडकीवर सोडत.

आजीच्या-मामींच्या तलम चंदेरी-रेशमी साडय़ांच्या छान बारीक एकसारख्या निऱ्या घालून त्या भोवती सोडल्या जात. काहींचे पंखे बनवत तर काहींच्या कमानी. त्या साडय़ांच्या रंगाची एक आभाच तिथे पसरली जाई. काहीतरी विलक्षण तेज पसरल्यासारखं वाटे. ते तेज, सुगंधाच्या त्या लहरी यांनी सगळं घर चैतन्यानं सळसळू लागे. त्याची लागण सर्वानाच होई.

हा उत्सव सर्वाच्या कलागुणांना वाव देणारा. केवडय़ाच्या वेण्या, चौफुले, राकडय़ा बजवणं, ताटा-पाटा भोवतीच्या रांगोळ्या, मोदकाला जास्तीत जास्त कळ्या पाडणं, एकावर एक मोदक रचणं, रंगीबेरंगी मोदक, राजेली केळ्याच्या अलवार केळोप्या, अळुवडय़ा, मखराची सजावट, फळा-फुलांची मांडणी, एखादीची दाट कडक कॉफी, आरत्यांची ईर्षां, कधी मैफल जमली की कुणाच्या नकला, गाणी म्हणणं, कधी प्रत्येकानं गणेशाचं वेगळं वेगळं नाव सांगणं; कोणी कशात तर कोणी कशात पारंगत असायचं. रोज दोन चाळीतल्या पटांगणात सार्वजनिक गणपती असायचा. तिथे मुलांचे नाटय़ प्रवेश, फॅन्सी ड्रेस, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असायचे, त्या सर्वाचं मनापासून कौतुक व्हायचं.

संध्याकाळी दर्शनाला आलेल्या सर्वाना प्रसाद म्हणून वाटीत तुपाची धार सोडलेला मोदक, खिरापत, अळुवडय़ा, फळं दिली जात.

तिच्या सासरची माणसं आली की त्यांचं विशेष स्वागत होई. त्यांची ऊठबस कशी करू नि कशी नको असं होई. सगळंच सढळ हातानं दिलं जाई. जाताना पुन: डब्यातून काही काही दिलं जायचं. सुखानं अशी न्हात असतानाच ती ‘येतेच मी २ दिवसांनी,’ असं म्हणून त्यांना निरोप द्यायची.

जाणाऱ्या गणपतीला बघून तिचे डोळे भरून यायचे. तिच्या केसांवरून हात फिरवत आजी म्हणायची, ‘‘अगं येणारा माणूसही कधीतरी जातोच, त्याचीच उजळणी गणेशाच्या आगमनाने आणि विसर्जनाने होते. पण पुन: परतही तो येतोच. शिवाय जाताना तो स्वत:चं काही ठेवूनही जातो. त्याची प्रसन्नता, शांती, समाधान मांगल्य.. आहे ना इथेच!

जसं माझं काही काही तुझ्यात आहे आणि तुझं काही काही तुझ्या दोन्ही मुलांमध्ये आहे, तसंच! सृष्टीचं चक्रही असंच चालू असतं.

मीरा गुर्जर meenagurjar1945@gmail.com