घरातल्या सगळ्यांच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्या अंगाखांद्याला चिकटलेल्या कपाटातून सांभाळायला भिंतीला फार आवडते. त्यातही पुस्तकांचा स्पर्श, ती वैचारिक श्रीमंती मिरवताना तिची मान जरा जास्तच ताठ होते. घरातील व्यक्तींची शिक्षण, कला, साहित्य यामधील यशाची प्रतीकं सगळ्यांना दाखवताना ती मोहरून येते. ‘बघत राहू दे तुझ्याकडे,’ अशी पाहुण्याची अवस्था करून टाकते. रोज एखादा सुविचार किंवा कविता, श्लोक, सुभाषित सांगणारा फळा कुठेही अडकवला तरी तिच्या सौंदर्यात बाधा येत नाही. उलट घराची उच्च अभिरुची दाखवत पाहणाऱ्याच्या मनात ती रेंगाळत राहते.

घर.. आपल्या पायावर उभं राहता आलं की प्रत्येकाला घराची घर-घर लागतेच. चंद्रमौळी झोपडी असो नाही तर बंगला, तो शून्यातून उभा राहताना बघण्यातली मजा काही औरच असते. खोल खणून भक्कम पायाभरणी झाली की एकमेकींशी कोन करत चार भिंती चिकटून उभ्या राहतात. मोकळ्या अवकाशाला भिंतीचं कुंपण घातलं की घराचं अस्तित्व, त्याचा आकार डोळ्यात भरू लागतो. या भिंतीच मग आपल्या मनात ‘घर’ करून राहतात. आणि सदैव आपला आधार बनतात.

रंगरंगोटी पूर्ण झाली की गृहप्रवेश करताना याच भिंतीवर लाल कुंकवाने स्वस्तिक रेखाटून, हाताचे ठसे उमटवून शुभ लाभ लिहिल्यावर तिचं रूपच पालटतं. तिला घरपण येतं. आपल्या रक्षणाची जबाबदारी तिच्यावर सोपवून आपण निर्धास्त होऊन जातो. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ ही आपली इच्छा लगेच पुरी करत ती आपल्याला काय, कधी, केव्हा, कसे असे काळाचे भान आणून देते. त्याची फडफडणारी पानं उगवणाऱ्या दिवसाचं वैशिष्टय़ सांगत सुट्टीकडे लक्ष वेधून घेत खूश करतात. ही भिंत घरभर कामालाच लागते.

स्वयंपाकघरात वेदनेचे घाव सोसत कडाप्पाची मांडणी किंवा मोडय़ुलर किचनचा सेट संभाळते. शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करत आपलं आरोग्य सांभाळते. सगळी विजेची बटणं हाताशी ठेवते. गॅस सावधपणे जपून वापरा, असं सुचविण्यासाठी सतत मीटर दाखवत राहते. स्वत:मध्ये चौकोनी भगदाड पाडून आपल्या सुखासाठी वाऱ्याला आत-बाहेर मुक्त प्रवेश देते. शिवाय या भगदाडातून म्हणजे खिडकीतून बाहेर डोकावण्याची संधी आणि जगाशी संपर्क घडवून आणते. सोयीसाठी, जागा वाचवण्यासाठी हवं तेव्हा वापरण्यासाठी जेवणाचं टेबल घट्ट पकडून आनंदाने उभी राहते, अगदी लहान मुलांनी लपाछपी खेळताना डोळे झाकावे आणि उघडावे तसे. घराच्या सौंदर्यात बाधा येऊ नये म्हणून पाण्याचे पाइप, विजेच्या तारा स्वत:च्या पोटात दडवते. जिथे जिथे आधार हवा तिथे तिथे तो द्यायला समर्थ उभी राहते. नाही म्हणायला हवं तेव्हा खिळा टोचलात की आपलं लक्ष नाहीसं बघून केव्हा तरी त्याला बाहेर ढकलून देते.

कधी कधी एकाच वेळी दोन विरुद्ध ठिकाणी लक्ष घालते, वरच्या अध्र्या भागातून एका बाजूची अडगळ लपवते तर परस्पर विरुद्ध दिशेने खालच्या अध्र्या भागातून प्रेक्षणीय वस्तू जपण्यासाठी पारदर्शक होते; पुढच्या बाजूला पुरुषाचा मुखवटा आणि मागच्या बाजूला स्त्रीचा मुखवटा लावून नृत्य करणाऱ्या नृत्यांगनेसारखी सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन स्वयंपाकघरातून काम करता करता गृहलक्ष्मीला पलीकडच्या खोलीतील व्यक्तीशी सहज संवाद साधता यावा, पदार्थाची देवाणघेवाण करता यावी यासाठी चौकोनी मोकळ्या खिडकीसाठी आनंदाने स्वत:मध्ये जागा देते. दिवसाकाठी किती तरी श्रम वाचतात म्हणून गृहिणी पावलोपावली भिंतीला धन्यवाद देते. असं असूनसुद्धा एखादी जाडी व्यक्ती वाट अडवून उभी असली किंवा त्या व्यक्तीमुळे उजेड, प्रकाश अडवला जात असेल तर गमतीने ‘काय मधे भिंतीसारखी उभी आहेस,’ असा उद्धार झाला की भिंतीला जरा वाईट वाटते, पण संत-प्रवृत्तीने ते शब्द स्वत:कडे न घेता ती परतवून लावते, साहजिकच प्रश्नच मिटतो. कधी मधेमधे येते म्हणून तिच्या अस्तित्वावरच गदा येते. अशा वेळी कडेला ठामपणे उभी राहण्यात ती धन्यता मानते.

घरातल्या सगळ्यांच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्या अंगाखांद्याला चिकटलेल्या कपाटातून सांभाळायला तिला फार आवडते. त्यातही पुस्तकांचा स्पर्श, ती वैचारिक श्रीमंती मिरवताना तिची मान जरा जास्तच ताठ होते. घरातील व्यक्तींची शिक्षण, कला, साहित्य यामधील यशाची प्रतीकं सगळ्यांना दाखवताना ती मोहरून येते. ‘बघत राहू दे तुझ्याकडे,’ अशी पाहुण्याची अवस्था करून टाकते. रोज एखादा सुविचार किंवा कविता, श्लोक, सुभाषित सांगणारा फळा कुठेही अडकवला तरी तिच्या सौंदर्यात बाधा येत नाही. उलट घराची उच्च अभिरुची दाखवत पाहणाऱ्याच्या मनात ती रेंगाळत राहते. कधी कधी ‘निरोप तुज देते’ अशीही भूमिका तिला पार पाडावी लागते. घरातील बालगोपाळांचा शाळा शाळा खेळताना फळ्यावर गोळा झालेलं अक्षरधन, आकडेमोड, खडूचा पांढरा स्प्रे आणि खोटय़ाखोटय़ा विद्यार्थ्यांना शांत बसविण्यासाठी तिला दिलेले पट्टीचे खोटे फटके ती आनंदाने सहन करते. शाळा सुटल्याची गंमत निरखताना काहीही तिच्या अंगावर आपटून केलेल्या घंटानादाने ती शहारते, थरथरते. अक्षरओळख नसलेल्यांची रेघोटय़ांच्या रूपातली बाळलेणी मिरवताना गुदगुल्या होत ती लेकुरवाळी होते. उदयोन्मुख भावी कलाकारांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देताना ती जणू सजीव होते. मुलांनी तिच्याकडे फेकलेले चेंडूचे टप्पे त्यांच्या काळजीने हळुवार परतवत ती खेळकर होते. एखादं छोटं पिल्लू तिला हळूच बोचकारतं, तिच्यातील माती खातं, कधी रंगात येऊन जिभेने चाटतंसुद्धा. त्यांनी असा वेडेपणा करू नये म्हणून बोचकारल्याच्या खुणा पटकन न मिटवता घरातल्या मोठय़ांचे तिकडे लक्ष वेधून घेण्याचा ती भिंत प्रयत्न करते. छोटय़ाच्या नखामध्ये किंचित प्रमाणात शिरून त्याला रडवायचा प्रयत्न करते. जेणेकरून त्याच्या रडण्यामुळे त्याच्या ‘या’ खेळाकडे मोठय़ांचे लक्ष जाऊन त्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होईल.

घरातली ज्येष्ठ पिढी तिला टेकून बसण्यासाठी कायम धडपडत असते. तेव्हा त्यांच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी असते. त्या सर्वाचं घरातलं अस्तित्व, सहवास याची ती भुकेली असते. गुळगुळीत फरशीवरून चालताना आधारासाठी संपूर्ण हात न टेकवता (संपूर्ण हात टेकवला तर तळहाताला धूळ लागेल) फक्त पाची बोटांची वरची टोकं टेकवत चालण्याची वृद्धांची सवय. त्यामुळे भिंतीवर ठरावीक ठिकाणी जणू तारकापुंजच अवतरतात. ‘त्या’ नक्षीकामासाठी भिंत आसुसलेली असते. वारली जमातीत लग्नघरी पहिली मोराची रेघ, दुसरी हिमायदेवीची, तिसरी पंचशिर रेघ, चौथी वाघदेवाचं प्रतीक असलेले चौकाचं चित्र काढलं की घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही अशी आदिवासींची श्रद्धा आहे.

तिला ओकीबोकी न ठेवता घरातल्यांनी अभिमानाने मागच्या पिढीचे आणि कौतुकाने पुढच्या पिढीचे लावलेले फोटो बघायला आणि आठवणींना उजाळा द्यायला पाहुणे आवर्जून भिंतीजवळ जातात. ती जवळिक, ते घरपण तिला फार भावते. घरातील मुलांचा शाळेतील हस्तव्यवसाय सर्वाना बघता यावा म्हणून कुठलीही जागा ती बहाल करते. कोणी एखादे ठरावीक दिवसांनी बदलणारे म्युरल किंवा पेंटिंग लावून रसिकतेचा स्पर्श करतात. इंटिरिअर डेकोरेटर तर सतत ‘तिच्याकडे’ बघत शोभादर्शकाप्रमाणे वेगवेगळ्या सजवण्याच्या कल्पना करत राहतो. रंगरंगोटी करून तिचे लाडही पुरवले जातात. डोहाळजेवण, बारसं, पूजा असं काही असलं की तिला झिरमिळ्यांनी सजवलं जातं. दिव्यांच्या माळेने ती लुकलुकते. वाढदिवस असला की तर हॅपी बर्थडेचा हार तिला घट्ट पकडून ठेवावाच लागतो. अशा वेळी वयाच्या वाढीतल्या टप्प्यांची नोंद घेणाऱ्या फोटोंचा कोलाज प्रत्येकाला दाखवत ती हसवत ठेवते.

कधी कधी धुवाधार पावसाच्या माऱ्याला तोंड देताना तिचे डोळे पाणावतात. स्वत:वरच चिडून पोपडय़ांच्या रूपाने गालही फुगतात. तिची ही दशा घराला बेचैन करते. खरं तर सगळ्या घरगुती गोष्टी चार भिंतींच्या आड गुप्त ठेवण्याकडेच तिचा कल असतो. पण बोलणाऱ्याला आवाजाची पट्टी संभाळता येत नाही. मग कोणी जवळ येऊन कान देऊन ऐकण्यासाठी ‘कान’ लावला की ती पलीकडचे ‘शब्द’ पटकन् कानात सांगून टाकते. त्यामुळे ‘भिंतीला कान असतात’ असा टोमणा तिला निष्कारण ऐकावा लागतो.

दिवसभर रिकामं घर, शांतता तिला खायला उठते. खरं तर सोयीसाठी घराची विभागणी वेगवेगळ्या खोल्यांत करण्यासाठी सतत उभं राहणं हा तिचा उद्देश. प्रत्येकासाठी तिने वेगळी खोली केली नाही. पण आजकाल सगळे घरात असले तरी आपापल्या बंद खोलीत असतात. प्रत्यक्ष बोलाचाली न होता तिसऱ्याशीच सूत जमवतात. त्याची मध्यस्थी घेतात. हे तिला खटकते. मनामनातल्या भिंती तिला नको असतात. या भिंती गगनचुंबी इमारतीच्या भिंतीशी स्पर्धा तर करणार नाहीत ना, या विचाराने मात्र ती क्षणात कोसळते. आपले हात तिला सावरण्यासाठी सक्षम आहेत का?

सुचित्रा साठे
vasturang@expressindia.com