‘अगदी ठणठणीत प्रकृती आहे. शतकाचा काय शतकांचा उंबरठा पार करू शकेल,’

– इति स्ट्रक्चरल ऑडिटर.

दचकलात ना! तर हे मत व्यक्तीच्या संदर्भात नाही तर वास्तूच्या संदर्भात आहे. ही वास्तू म्हणजे ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटीतील प्लॉट नंबर चारवर असलेला, ठळकपणे नजरेत भरणारा ‘वैद्य बंगला’.

१९३० साली ४०/४१ प्लॉटस् असलेली ही ब्राह्मण सोसायटी अस्तित्वात आली. हमरस्त्याने गेलं तर स्टेशनपासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आणि मागच्या बाजूने गेलं तर एक पाय घरांत तर दुसरा पाय फ्लॅटफॉर्मवर ठेवावा इतकी जवळ. दाभोळजवळच्या अंजनवेलचे त्र्यंबक श्रीधर वैद्य जवळच्याच नाखवा चाळीत राहत होते. ‘स्वत:चे घरं’ हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या त्र्यंबक वैद्य यांनी समयसूचकता दाखवत त्वरित चार नंबरचा जवळपास पाचशे वाराचा प्लॉट खरेदी केला. आता ‘घर पाहावे बांधून’ हा अनुभव घ्यायचा होता. त्यासाठी आपले परममित्र परशुराम भावे यांच्याकडे शब्द टाकला. भावे पीडब्ल्यूडीमध्ये सिव्हिल इंजिनीअर असून ब्रिटिशकालीन कळवा पुलाच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते. त्यांनी मैत्रीच्या नात्याला जागत मान्य केले, पण एका अटीवर. ते म्हणाले, ‘मी बांधून देईन, पण माझ्या मनाप्रमाणे.’ त्र्यंबक वैद्य आपल्या मित्राची योग्यता ओळखून होते. त्यामुळे त्यांनी लगेच ग्रीन सिग्नल दिला.

..आणि ‘भावे प्रयोग’ उत्तम रीतीने पार पडल्यामुळे सुबक, टुमदार ‘वैद्य बंगला’ उभा राहिला. त्र्यंबक वैद्य यांना चार मुलगे व चार मुली. मोठय़ा एकत्र कुटुंबाचा विचार करून तळमजल्यावर सहा व पहिल्या मजल्यावर सहा खोल्या बांधण्यात आल्या. अध्र्या भागावर कौलं आली तर अध्र्या भागात थोडी गच्ची व त्याला जोडून एक निवांत खोली बांधण्यात आली. ब्रिटिश शैलीनुसार उंचीला दिलेलं प्राधान्य. ‘येता जाता कडी लावावी’ ही सूचना देणारा गळ्यात अडकवलेला फलक, खालच्या भागात कुत्र्यामांजरांच्या पिल्लांनी आत घुसखोरी करू नये म्हणून लावलेली जाळी, एक भाग कायमस्वरूपी बंद ठेवलेला, शिवाय जराही न कुरकुरणारं असं हे भक्कम फाटक उघडून वैद्य बंगल्याच्या आत शिरता येते. नुकतंच बोलायला लागलेल्या लहान मुलाला आपण संपूर्ण नाव सांगण्याचा आग्रह करतो तसं ‘वैद्य बंगला, प्लॉट नं ४, ब्राह्मण सोसायटी’ अशी ठळक आणि ठसठशीत ओळख लगेच नजरेस पडते. वाडय़ाचा किंवा किल्ल्याचा दिंडी दरवाजा असावा, तसेच भक्कम दरवाजा उघडतो.

समोर एका अखंड फळीच्या उंची दरवाजामागे लपलेल्या तीन खोल्या, उजव्या बाजूला बंदिस्त व्हरांडा आणि त्याला लागून दोन फळीच्या दारांनी एकापाठोपाठ एक चिकटलेल्या दोन खोल्या, उजवी व डावी बाजू जोडणारी मध्ये दारं असा तळमजल्याचा आराखडा. हीच रचना पहिल्या मजल्यावर, दारं, खिडक्या, देवघर, त्यांच्यावरचं भिंतीतलं कपाट या सगळ्यासाठी खास बर्मा टिकचा वापर. सगळ्या कडय़ा, कोयंडे, हॅण्डल, षटकोनी बिजागरं पितळेची. खोलीची उंची खूपच, त्यावर उतरती कौलं, त्या वरच्या जागेत थाटलेले पोटमाळे आणि तिथे जाण्यासाठी बाजूला लोखंडी शिडय़ा. जमिनीवर, जिन्यावर उत्तम कोबा केलेला. खोल्यांचे घनफळ जास्त आणि वायूविजन उत्तम त्यामुळे नैसर्गिक गारवा. एसीला पर्याय म्हणून व्हरांडय़ातल्या खिडक्यांनी वाळ्याच्या पडद्याचे घुंघट ओढून घेतल्यामुळे मंद सुगंधी झुळुक घरात बागडत असते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी, मळसूत्रीसारखे (रस्र्१्रं’) जिने आहेत. ते सर्वाची परीक्षा घेत असतात.

बहुतेक कोणाचीही एकदा तरी साष्टांग नमस्कार घातल्याशिवाय सुटका झालेली नाही. बंगल्याच्या मागे दोन शौचालयं, न्हाणीघर, कोळशाची खोली. बंगल्याभोवती अंगणात पायांना गुदगुल्या करत इतस्तत: पसरलेल्या दूर्वा आणि लेकुरवाळी केळींची रोपं.

तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि टिकाऊपणा यांचा मेळ साधून भाव्यांनी निर्माण केलेल्या या वैद्य बंगल्यात भावे तळमजल्यावर काही दिवसच वास्तव्याला होते. पहिल्या मजल्यावर त्र्यंबक वैद्यांचं भरलं गोकुळ होतं. रेल्वेतील नोकरीव्यतिरिक्त त्र्यंबक वैद्यांचा लोण्याचा व तेलाचा व्यवसाय होता. या व्यापातूनही सज्जनगडासाठी समर्थसेवा म्हणून ते न चुकता भिक्षा मागण्यासाठी दारोदार हिंडत असत. नामस्मरणावर भर देत यांचं आखीव रेखीव जगणं होतं. काळानुरूप त्यांच्या चारी मुलांनी संसार थाटले. मधल्यादारांना कडय़ा लागल्या. ‘वैद्य बंगला’ खालीवर गजबजून गेला.

आता त्र्यंबक वैद्य हयात नाहीत. त्यांच्या चार मुलांपैकी ज्यांचा जन्म या बंगल्यात झाला ते यशवंत वैद्य सपत्नीक संगीत साधना करत तिथे राहत आहेत. त्यांचे आणि बंगल्याचे एकच वय आहे. दोघेही सहस्रचंद्र्शन घेऊन नवव्या शतकाकडे वाटचाल करत आहेत. शिवाय पुढच्या पिढय़ा आहेतच. बोलता बोलता यशवंत वैद्य यांच्या पत्नी नीलावहिनीनी काही आठवणींना उजाळा दिला. त्यांचा स्वत:चा ‘दाखवण्या’चा कार्यक्रम ज्यावेळी पहिल्या मजल्यावर झाला त्यावेळी डाव्या बाजूच्या झोपाळ्याच्या खोलीत समस्त महिला वर्ग आणि उजव्या बाजूच्या खोलीत सर्व पुरुषवर्ग अशी विभागणी होती. दुसरी आठवण म्हणजे त्र्यंबक वैद्यांचे हिशोबाचे काम, पुढच्या पिढीचा अभ्यास गच्चीतल्या खोलीत होत असे. काही कुटायचे असल्यास तळमजल्यावर जाऊनच ते काम केले जाई आणि घराला जपले जाई.

या बंगल्याची खासियत म्हणजे ‘अजूनी यौवनांत मी’ म्हणत तो जसा बांधला होता तसाच आजतागायत आपली प्रतिमा जपत उभा आहे. मोडकळीला आलाय, भेगा पडल्या आहेत, दारं उतरली आहेत, कडय़ा लागत नाहीत, वाळवी लागलीय, अशी ‘वय’ वाढल्याची कुठलीच चिन्हं बंगल्याच्या आत, बाहेर दिसत नाहीत. याचं श्रेय परशुराम भावे यांना जातं. वैद्य मंडळींनी एकच केलं, तर पाच वर्षांनी न चुकता रंगरंगोटी केली. तीसुद्धा सुरुवातीपासून आतापर्यंत बॅटलशीप ग्रे या एकाच रंगाला हाताशी धरून. त्यामुळे बंगल्याचा चेहरामोहरा, देखणेपणा दिवसेंदिवस उजळतच गेला. बंगल्याने इतर ‘रंग’ दाखवलेच नाहीत. अंतर्गत सजावट करण्याच्या उद्देशाने भिंतीत खिळा मार, भोकं पाड हा उद्योग करून भिंतींना वैद्य मंडळींनी जराही दुखावले नाही. याचाच परिणाम म्हणून ब्रिटिश शैलीत बांधलेल्या या बंगल्याचे रूप, डौल आजूबाजूला त्याच्याच ‘वळणा’चे बंगले असतानाही प्रथमदर्शनी प्रेमात पडण्याजोगे राहिले आहे.

आजकाल सहनिवासाने चाळिशी गाठली की पुनर्विकासाचे वेध लागलेले असतात. ब्राह्मण सोसायटीतले शेजारीपाजारी बंगले ही ‘माना’ उंच करू लागलेले आहेत. परंतु ‘वैद्य बंगला’ मात्र अंतरंगातील उंचीला ओळखून आहे. बदलाचे वारे थोपवण्यासाठी ‘जुनं’ ते ‘सोनं’ जपण्याचं औषध ‘वैद्यां’शिवाय कोणाला माहिती असणार? त्यासाठी समस्त वैद्य मंडळी कौतुकास पात्र आहेत, नाही का?

वैद्य बंगल्याची खासियत म्हणजे तो जसा बांधला होता तसाच आजतागायत आपली प्रतिमा जपत उभा आहे. मोडकळीला आलाय, भेगा पडल्या आहेत, दारं उतरली आहेत, कडय़ा लागत नाहीत, वाळवी लागलीय, अशी ‘वय’ वाढल्याची कुठलीच चिन्हं बंगल्याच्या आत, बाहेर दिसत नाहीत. याचं श्रेय परशुराम भावे यांना जातं. वैद्य मंडळींनी एकच केलं, तर पाच वर्षांनी न चुकता रंगरंगोटी केली. तीसुद्धा सुरुवातीपासून आतापर्यंत बॅटलशीप ग्रे या एकाच रंगाला हाताशी धरून. त्यामुळे बंगल्याचा चेहरामोहरा, देखणेपणा दिवसेंदिवस उजळतच गेला. बंगल्याने इतर ‘रंग’ दाखवलेच नाहीत.