सततच्या बदलीमुळे सामान आवराआवरीचा थोडा त्रास व्हायचा पण अनेक नवी गावे, नवे प्रदेश पाहायला मिळायचे. नव्या लोकांना भेटता येत असे. कोकणात बदली झाल्यावर मिळालेला एक समृद्ध अनुभव..

आमची सरकारी नोकरी असल्यामुळे दर २/३ वर्षांनी बदलीचा प्रसंग यायचा. मुलांना मजा वाटायची आता दुसऱ्या गावाला जायचे म्हणून. पण आम्हा दोघांना मात्र चिंता वाटायची. नवीन गाव, नवीन घर, माणसंही नवीन, येथील सामानाची आवराआवर परत नव्या घरी जाऊन लावावी लागे, पण जावे तर लागायचेच. मग या चिंता झटकून नवीन गावाचा विचार, नवीन परिसर, नवीन माणसे, त्यांचे स्वभाव, त्यांचे राहणीमान, गावागावांच्या पद्धती-  खाण्याच्या, राहणीमानाच्या. तेथील चालीरीतींच्या. नवनवीन अनुभव, ओळखी व्हायच्या, मजा वाटायची. कोकणात पाऊस खूप तर मराठवाडय़ात अगदी बेताचा. कोकणातील शेते छोटी छोटी, चौकोनात पाडलेली तर देशावर आपली नजर ठरणार नाही एवढी मोठ मोठी.

आमची कोकणात बदली झाली तेव्हा पावसाळा होता. आता घर बघायचे कसे? पण नशीब, आम्हाला अगदी छान घर मिळाले. ते एका घरंदाज कुटुंबाचे घर होते. ते तेथील वतनदार असल्यामुळे मोठे घर, मोठे आवार, घराच्या मागे वाडी,  मागेच शेतभातीही होती. आवारातच एक छोटं घर त्यांनी आम्हाला भाडय़ाने दिलं होतं.

त्या गृहस्थांचे घर मोठे होते. स्वयंपाक घर, माजघर, वरची ओटी, खालची पडवी शिवाय चारी बाजूला पडव्या व वर दुमजली माडी. धान्य साठविण्यासाठी कोठार होते. घरात माणसेही भरपूर होती. आजी-आजोबा, त्यांची २ मुले, त्यांच्या बायका, २ नाती, २ नातू  व लग्न झालेली बाहेरगावी राहात असलेली मुलगी. घराच्या आजूबाजूला नारळ-पोफळीची, आंब्या-फणसाची, चिकू, पपई, शेवगा, रातांब्याची झाडे होती.  पुढील बाजूस सोनचाफा, पारिजात, जास्वंद, तगर, बेलाचं झाड, गुलाब, मोगरा अशी सुगंधित झाडे लावलेली होती. त्याची निगराणी करण्यासाठी माळी होता. मागील अंगणात तुळशी वृंदावन व उंबराचे झाड होते अशा रम्य ठिकाणी जागा मिळाल्यामुळे आम्ही खूश होतो.

मुले शाळेत गेली, मिस्टर कामावर गेले की मला दिवसभर काही काम नसायचे. मग भरत काम, विणकाम, शिवण चालायचे. कधी कधी कंटाळा यायचा मग त्यांच्या घराकडे आणि घरातील धावपळीकडे बघत बसायचं. कधी त्या बोलवत गप्पा मारायला, पण रोज रोज किती जायचं आणि गेले तर ते प्रत्येकजण कामात गर्क म्हणून नुसते मध्ये मध्ये त्यांच्या धावपळीकडे न्याहाळत बसायचे, हळूहळू घरातील बायकांशी गट्टी झाली आणि मग ये-जा सुरू  होऊन आम्ही त्यांच्याच घरातले केव्हा झालो ते कळलेच नाही. मी सासर-माहेरच्या १० माणसांतील असल्यामुळे आपल्याला एक छान घर मिळाले म्हणून मोहरून गेले. मुले तर एकदम खूशच.

त्यांच्या घरात कामाला बायका माणसे बरीच वर्षांपासूनची होती. जो तो काम वेळेवर व्यवस्थित करून जात असे. आजी, आजोबांची मात्र करडी नजर सर्वाकडे असे. त्यांचा धाक व शिस्त दिसत असे. दोघेही फणसाच्या गऱ्याप्रमाणे, फणस वरून खडबडीत, काटेरी; पण आत गोड रसाळ गरे अगदी तशीच ती दोघं होती. पावसाळा संपला, नवरात्र संपले, दसरा उजाडला, दिवाळीला शेतातील धान्य घरात कोठारात साठवणीला आणले गेले. नंतर शेतात वाल, चवळी, मूग, मटकी, राजगिऱ्याची पेरणी, परत गडी माणसे शेतात राबायला लागली.

दर २-३ महिन्यांनी कोठारातील भाताच्या साली काढून भात दळणी व्हायची. मोठय़ा दगडी जात्यावर भात भरडले जायचे मग त्याचे बेने तांदूळ तयार मग त्याची उखळी, मुसळाने हात सडणी व्हायची ती अशी की तांदळाचा चुरा होता कामा नये पण ते अख्खेही राहिले पाहिजेत. मग अख्खे तांदूळ, तुकडा तांदूळ, जाड कणी, बारीक कणी व कोंडा असे सर्व प्रकार आजींच्या देखरेखी खाली वेगवेगळे व्हायचे; मग तांब्या पितळेच्या त्यांच्या ठरलेल्या त्यांच्या हंडय़ात, तपेल्यात साठवले जायचे. तांदुळाचा कोंडा निघायचा तो टाकून न देता त्यांतील जाड कोंडा गुरांना व बारीक कोंडयाची कोंडेकड करून ती वाळवून, भाजून, तळून भाताशी खायची.  आजी अगदी काही म्हणून वाया घालवत नसत व सांगत, ‘अगं, हा कोंडा खूप पौष्टिक असतो. आता दोन- तीन महिन्यांपूर्वी कोंडेकड हा पदार्थ मी टीव्हीवर एक नवीन रेसिपी म्हणून पाहिला.

भात दळणी झाल्यावर तांदळाचा तूस निघायचा त्याची गोलाकार पसरणी व्हायची त्यावर मधोमध एक गोरी (शेणाची) पेटवून ठेवायची की हळूहळू जळत जळत त्याची राखुंडी व्हायची. आजी आणि आजोबा त्यांनीच दात घासायचे, बाकीजण ब्रश टूथपेस्ट वापरायचे. त्या आजी म्हणत बघा आमचे दात कसे आहेत ते. मग त्या रांगोळीची वेगवेगळी वाटणी व्हायची.  दात घासायची कणा रांगोळी काढायची, साठवणीचे धान्यात मिसळण्याची, भांडी घासायची वगैरे त्या आजी सांगत. पूर्वी लाइट नव्हते तेव्हा कंदील चिमण्यांच्या काचा या रांगोळीनेच आम्ही साफ करायचो, ऐकायला मजा वाटायची, आजी फार समजूतदारपणे सांगायच्या म्हणून तर घरात सुना- नातवंडे एकत्र नांदत होती.

उन्हाळ्यात शेतातून वाल, चवळी, मुग, मटकी, हरभरे, पावटे, राजगिरा यायचा. ती कडधान्ये त्यांच्या नाती सारवलेल्या अंगणात वाळत टाकायच्या, त्या नाती गमतीने त्या धान्याचे निरनिराळे आकार करून वाळत घालायच्या. ५-७.. ५-७ उन्हे देऊन भरून ती तुसाची रांगोळी मिसळून डब्यात भरून ठेवायच्या. त्यांच्या आया त्यांना मदत करायच्या; पण आजी कौतुकाने हिने केले, तिने केले असे सांगायच्या व पाठीवर शाबासकीची थाप द्यायच्या. अशा कोकणातील बदलीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.

कुंदा देवधर