बाग फुलवण्यासाठी टेरेस हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्वच्छ ऊन, स्वच्छ वारा व ऐसपस जागा, निवांतपणा ही टेरेसची वैशिष्टय़े असतात. टेरेसवर प्रतिकूल परिस्थिती (कडक ऊन, उष्ण वारा, माती नाही) असली तर ती नियंत्रित नक्की असते.
 टेरेसचे वॉटर प्रूफिंग केले असेल तर खबरदारी म्हणून ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टिक पेपर सर्वात तळाशी वापरून, त्यावर सरळच्या सरळ लांब विटाचे वाफे साकारता येतात. टेरेसचे बांधकाम थोडे जुने किंवा गळतीची शक्यता वाटल्यास  टेरेसवर १ इंच जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर विटा रचाव्यात व त्यावर प्लॅस्टिक पेपर अंथरून विटांचे वाफे तयार करावेत.
टेरेसप्रमाणे फ्लॅटच्या बाल्कनी/गॅलरीत अशी बाग फुलवता येईल. अगदी ५ बाय १० इतकी जागा असेल तरी चालते. अशा जागेच्या नियोजनासाठी शक्य असल्यास लोखंडी पायऱ्यांची मांडणी करून घ्यावी. प्रत्येक पायरी ही ८ इंच रुंदीची असली तरी चालते. २ फुटांच्या रुंदीच्या मांडणीत ८ इंचाच्या ३ पायऱ्या करता येतात. येथे आयताकृती/सपाट बुडाच्या मातीच्या, प्लॅस्टिकच्या कुंडय़ा किंवा नर्सरी बॅगही रचून ठेवता येतात.
बाल्कनी/गॅलरीला सुरक्षा म्हणून लोखंडी ग्रिल लावता येते. याचाही कल्पकतेने वापर करून कुंडय़ा ठेवण्यासाठी पायरी किंवा कुंडी बसेल अशी गोल िरग करून घ्यावी. कुंडय़ा, पिशव्या हलवताना सहजपणा येतो.