भाजपच्या १२३ पैकी ८८ आमदार नितीन गडकरी मुख्यमंत्री व्हावे या मताचे असल्याचा दावा गडकरी समर्थकांकडून केला जात आहे. दरम्यान, येथील तीन आमदारांनी गडकरींसाठी जागा सोडण्याची तयारी जाहीरपणे दर्शवल्याने भाजपमधील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे.
राज्यात सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण यावरून गेल्या दोन दिवसापासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेल्याने त्यांच्याच गळय़ाात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल असे वातावरण असतांना अचानक काल मंगळवारी वेगवान घडामोडी झाल्या. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालानंतरच्या आगमनाचे निमित्त साधत भाजपच्या आमदारांनी सायंकाळी महालच्या वाडय़ावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
विदर्भातील ४४ पैकी ४२ आमदार यावेळी उपस्थित होते. हे आमदार केवळ आशीर्वाद घेण्यासाठी आले होते असा दावा गडकरींच्या गोटातून करण्यात येत असला तरी या आमदारांच्या वतीने बोलताना माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री व्हावे असे जाहीर मत व्यक्त केल्याने या शक्तिप्रदर्शनामागील हेतू उघड झाला. मला मुख्यमंत्रीपदात रस नाही असे आजवर सांगणारे गडकरीसुध्दा पक्ष श्रेष्ठी ठरवेल तो निर्णय मान्य असेल असे बोलू लागले.
महालच्या वाडय़ावर बुधवारी पहाटेपर्यंत या आमदारांकडून गडकरींची मनधरणी करणे सुरू होते. आता गडकरीसुध्दा राज्यात येण्यास तयार झाले आहे, असा दावा या समर्थक आमदारांनी आज करणे सुरू केले आहे.
 दरम्यान, गडकरी यांना विधानसभेवर निवडून जाता यावे यासाठी शहरातील तीन आमदारांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. शहर अध्यक्ष व पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे सुधाकर कोहळे व हिंगणाचे आमदार समीर मेघे यांनी आज आमदारकी सोडण्याची तयारी जाहीरपणे दर्शवली.

भाजपचे राज्यातील १२३ पैकी ८८ आमदार गडकरींच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. त्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्री होणे योग्य आहे.
-सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते