निवडणुकीची धामधुम सुरू झाली, अन टिळक पुतळ्याजवळील भाजपच्या कार्यालयालयासह धंतोली आणि गणेशपेठमधील प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. या निवडणुकीच्या लगीनघाईमध्ये कुणी जेवला की नाही.. बैठकीचे निरोप सगळ्यांना पोहोचले की नाही, खुच्र्या-सतरंज्यांची व्यवस्था ठाक झाली आहे ना,  मतदारसंघात पत्रक, झेंडे पोहचले की नाही.. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची व्यवस्था झाली आहे ना.. अनेक लहानमोठी कामे असली, तरी नागपुरातील भाजप कार्यकर्ते निर्धास्त असतात. सगळे व्यवस्थित होणार, हे त्यांना माहीतही असते. कारण, या सगळ्यावर आनंदराव ठवरे यांची नजर असते..  
भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आनंदराव हे एक अजब रसायन आहे. त्यांच्या नावात आनंद आहेच, त्यामुळे कोणतेही काम करताना ते आनंदीच दिसतात. एखादे काम पूर्ण होईपर्यंत क्षणाचीही विश्रांती न घेणाऱ्या आनंदरावांच्या चेहऱ्यावर कधी कुणाला तणावाची सुरकुतीही दिसत नाही. त्यामुळे, त्यांच्या आसपास वावरणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही आनंदीच दिसतात. जनसंघापासूनच पक्षकार्याशी नाळ जुळलेल्या आनंदरावांनी आजपर्यंत ना कुठले पद मागितले ना कुठलीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच पक्षात काम करणार असे ते निक्षूनच सांगत असतात. अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांसारख्या अनेक नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जडलेच, पण पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचे सुखदुखाचे अनेक क्षणही त्यांनी वाटून घेतले. पक्षापलीकडच्या अनेकांशीही आनंदरावांचे आपुलकीचे नाते आहे.  
चहाच्या टपरीवर काम करताना रामचंद्र बाजीराव आणि महादेव राजुरकर यांच्यामुळे १९६४ मध्ये आनंदराव जनसंघाच्या कामात दाखल झाले, आणि त्यांनी उत्तर नागपुरात पक्षबांधणीची जबाबदारी स्वीकारली. ज्या भागात पक्षाचे नावदेखील पोहोचले नव्हते त्या ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम केल्यानंतर १९७२ पासून त्यांच्यावर टिळक पुतळ्याजवळील भाजपच्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. आजतागायत आनंदराव तीच जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यालयात कुणाला एखादी गोष्ट सापडत नसेल, तर तो हक्काने आनंदरावांकडे योते, आणि आनंदराव ती शोधून देतात. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदरावांची भेट झाली नाही, तर चैन पडत नाही. पक्षाची जाहीर सभा असली किंवा बैठक असली की त्याचे नियोजन करण्यामध्ये त्यांना विश्वासात घेतले जाते. त्यामुळे आनंदरावाशिवाय अनेकांचे पान हलत नाही. आजही सतरंजी टाकण्यापासून बैठकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निरोप देण्याचे काम करीत असतात. निवडणूक असली आनंदरावांचे मत विचारल्याशिवाय निर्णय होत नाही. ज्या काळात भाजप कुठेच नव्हती त्या काळापासून आनंदरावांनी शहरात आणि ग्रामीण भागात कधी पायी तर कधी सायकलने फिरत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले. कधी वाहन नसेल तरी ते कार्यालयाकडे पायी निघतात. कार्यालय प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असली तरी पक्ष देईल ते काम करण्यासाठी सदैव तत्पर असतात. टिळक पुतळ्याजवळील भाजपचे कार्यालय हे ग्रामीणचे कार्यालय असल्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या कार्यकर्त्यांची विचारपूस करीत असतात. ोक्षाचे अनेक नेते धावपळीत असले तरी आनंदराव मात्र पक्षाच्या कार्यालयात फायली आणि कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात व्यस्त दिसतात. मतदारसंघातील गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असतो, आणि कोणत्या गल्लीतील कोणता कार्यकर्ता कोणत्या कामासाठी कामाचा आहे, हेही आनंदरावांनाच नेमके माहीत असते. पक्षाच्या कामात जो आनंद आहे तो दुसऱ्या कामात नाही असे मानणारे आनंदराव म्हणजे केवळ निवडणुकीतीलच नव्हे, तर भाजपच्या पक्षाकार्यालयातील ‘बारमाही नारायण’ म्हणून पक्षाची सेवा करीत असतात. .