पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तृत्व, नेतृत्व आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे कर्तृत्व यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाटेचे वातावरण तयार करून सर्वाधिक जागा मिळविण्याची करामत भाजपला साधली असली, तरी सरकार स्थापन करण्यासाठी स्वबळाचे संख्याबळ मात्र जनतेने बहाल केले नसल्याने सत्तास्थापनेचा भाजपचा मार्ग काहीसा काटेरीच ठरला आहे.
निवडणुकीत ज्यांच्यावर शत्रू समजून शरसंधान केले, त्यांच्याच पाठिंब्याच्या जोरावर भाजपला राज्यात सरकार बनवावे लागणार हे स्पष्ट असले तरी सत्तास्थापनेसाठी फारशी घाई न करता, ‘थंडा करके खाओ’ नीती अवलंबिण्यावरच भाजपचा भर राहील, असे संकेत मिळत आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने सहाजिकच, सरकारस्थापनेसाठी राज्यपालांकडून भाजपलाच प्रथम विचारणा होणार असून, भाजपने नकार दिला तरच अन्य पर्यायांचा विचार राज्यपाल करू शकतात. भाजपचे संख्याबळ पाहता, स्वबळावर पूर्ण सत्ता मिळविणे या पक्षाला शक्य नसले तरी सरकार स्थापनेची सर्वाधिक संधी मात्र याच पक्षाकडे झुकलेली असल्याने भाजपदेखील राज्यपालांच्या निमंत्रणाचा स्वीकार करेल, हेही स्पष्ट आहे. साहजिकच, बहुमताचा १४५ चा जादूई आकडा हाती नसल्याने, विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी भाजपला स्वीकारावी लागेल, आणि त्यासाठीची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा अवधीदेखील मिळेल. त्यामुळे, लाटेवर स्वार होऊनही बहुमत न मिळालेल्या भाजपला सत्तास्थापनेच्या मार्गातील काटे कमी करण्याचे जोरदार प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत.
काँग्रेस आघाडीमधून बाहेर पडून स्वबळावर चाळिशी पार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे स्वतहूनच जाहीर केले आहे. परिणामी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यात भाजपला फारशी अडचण येणार नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार उभे करण्यासाठी पक्षातूनच तीव्र विरोध असल्याने अर्थातच, राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपचा पहिला पर्याय असणार नाही, असे पक्षाच्या सूत्रांचे मत आहे. त्याऐवजी, शिवसेनेसोबत भाजपची नैसर्गिक जवळीकअसून या पक्षासोबत जुळवून घेण्यावरच भाजपचा भर राहील, असेही सांगण्यात येते. तसे झाले, तर भाजप आणि शिवसेनेची निवडणूकीनंतरची युती अस्तित्वात येऊ शकते असे या सूत्रांचे मत आहे. तूर्तास तरी, अगोदर सत्ता स्थापन करून नंतर संख्याबळ जमविण्याचा काटेरी मार्ग स्वच्छ करावा, अशीच मानसिकता पक्षात प्रबळ असल्याचे दिसते.
स्वबळावर लढताना भारतीय जनता पक्षाने तब्बल १२३ जागांवर विजयश्री मिळवली आणि राज्यातील सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष होण्याचा मान मिळवला. निवडणुकीचे हे निकाल लागल्यानंतर राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. केव महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश, गोवा, दिल्ली अशा इतर राज्यांमध्येही भाजप कार्यकर्त्यांना उधाण आले होते.