बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यास तयार नसलेल्या शिवसेनेचीच कोंडी करण्याची रणनिती भाजपने आखली असून, स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर भाजप स्वबळावर सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. त्याचबरोबर विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करताना राष्ट्रवादीला तटस्थ राहण्यास सांगून बहुमताची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीही पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळेच भाजपकडून अद्याप शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याशी पाठिंब्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्याचवेळी १९९५ सालचा पॅटर्न स्वीकारण्यास आपण तयार नसल्याचेही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही स्बबळावर सत्ता स्थापन करू आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, हा शिवसेनेचा दावा मतमोजणीनंतर फोल ठरला आहे. शिवसेनेला केवळ ६३ जागांवर विजय मिळवण्यात यश आले असून, उर्वरित सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी भाजपचे १२२ उमेदवार स्वबळावर विजयी झाले असून, त्यांना राष्ट्रीय समाज पक्षासह अपक्षांनीही पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला २३ जागांचीच आवश्यकता आहे. या स्थितीत शिवसेनेचा कोणताही दबाव स्वीकारायचा नाही, अशी रणनिती भाजपने आखली आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा घेण्यासही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अनुकूलता दर्शविली असल्याचे समजते.
भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडीसाठी भाजपचे निरीक्षक म्हणून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि सरचिटणीस जे. पी. नड्डा मंगळवारी मुंबईत येणार होते. त्यांची विमानाची तिकीटेही तयार होती. मात्र, सोमवारी रात्री उशीरा हा दौरा रद्द करण्यात आला. काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना राजनाथसिंह यांनी आपण दिवाळीनंतरच मुंबईत जाऊ, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजनाथसिंह मुंबई दौऱयामध्ये उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार होते. मात्र, आत्ता शिवसेनेची कोणतीच मदत घ्यायची नाही, असे ठरल्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही निवडक पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी आम्ही कोणाचेही ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, असे सूचक वक्तव्य केले होते.