देशात अजूनही नरेंद्र मोदी यांची लाट असून, सुनामीप्रमाणे ती इतर पक्षांच्या नेत्यांना उदध्वस्त करण्याचे काम करते आहे, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यातील मतदारांनी पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये संध्याकाळी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेसोबतची युती तोडण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना शहा म्हणाले, जागावाटपामध्ये आम्हाला शिवसेना जेवढ्या जागा देऊ करीत होती. त्यापेक्षा जास्त जागा आम्ही निवडून आणल्या आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांचा बळी देऊन आम्ही कोणाबरोबरही युती करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात आमची कोणतीही बोलणी झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजपच सत्ता स्थापन करेल आणि तिथे भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असेही शहा यावेळी म्हणाले.