निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून अडून बसलेल्या आणि ज्यांना जागा देण्यासाठी भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली त्या महायुतीतील काही मित्रपक्षांना या निवडणुकीत भोपळा फोडण्यातही यश आलेले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढविलेल्या १३ पैकी सर्वच जागांवर त्यांचे उमेदवार पराभूत झाले असून, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनाही बीडमधून पराभवाचा झटका बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला दौंडमधील एका जागेवर यश मिळाले असून, येथील पक्षाचे उमेदवार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रमेश थोरात यांचा पराभव केला. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने तीन ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकाही ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये १३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी पंढरपूरमधील संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. पण त्याचाही निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नाही आणि या ठिकाणी कॉंग्रेसचे भारत भालके यांनी परिचारक यांचा पराभव केला. स्वाभिमानी संघटनेची ताकद असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातही पक्षाला यश मिळवता आले नाही.
दुसरीकडे भाजपच्या चिन्हावर बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱया विनायक मेटे यांनाही तेथील मतदारांनी नाकारले आहे. बीडमधील विधानसभेच्या सहा जागांपैकी पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. केवळ बीडमध्येच मतदारांनी मेटे यांना नाकारल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यात ५ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ दौंडमध्येच त्यांना यश मिळाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील निवडणुकीत रासपच्या राहुल कुल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रमेश थोरात यांचा पराभव केला.