अखंड महाराष्ट्र ठेवून राज्याचा विकास करण्याचे आश्वासन कोणता पक्ष देत असेल, तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार केला जाईल. मात्र, सध्यातरी मी स्वतःहून कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. अद्याप माझ्याकडे पाठिंबा मागण्यासाठी कोणी आलेले नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, उध्दव यांनी दुरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना राज्यातील विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. एकूण ६३ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे आभार मानले.
ते म्हणाले, शिवसेना आपल्या परंपरेपासून कधीही दूर होणार नाही. मराठी माणसाचे हित आणि स्वाभिमान जपण्याचे काम शिवसैनिक कायम करतील. अखंड महाराष्ट्र ठेवून राज्याचा विकास कोणी करणार असेल, तर त्यांना पाठिंबा देण्याचा आम्ही विचार करू. मी स्वतःहून कोणालाही पाठिंबा द्यायला जाणार नाही.
शिवसेनाप्रमुखांना दुःख देणाऱयांना आम्ही हरवले आहे. लोकसभेमध्ये काही जणांना हरवले होते आत्ता विधानसभेतही काही जणांना हरवले आहे, याचा उल्लेख करून त्यांनी सर्वसामान्य व्यक्ती आमच्या प्रेम करतोय, हीच शिवसेनेची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना या निवडणुकीत एकाकीपणाने आणि सर्वसामान्य मतदारांच्या आशीर्वादावर लढली याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.